महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेतील वारसा स्थळाची रंगीत रेखाचित्रे काढली'अर्बन स्केचर्स' तर्फे त्यात बीएनसीएतील दहा विद्यार्थिनींसह सत्तर जण सहभागी
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेतील वारसा स्थळाची रंगीत रेखाचित्रे काढली
'अर्बन स्केचर्स' तर्फे त्यात बीएनसीएतील दहा विद्यार्थिनींसह सत्तर जण सहभागी
पुणे, दि. १२ ऑगस्ट २०२६ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या आवारातील कर्वे यांची कुटीसह,चिंतन अंगण, वस्तूसंग्रहालय आणि महर्षी कर्वे व बाया कर्वे यांच्या समाधी स्थळाची रंगीत रेखाटने 'अर्बन स्केचर्स' या संस्थेच्या सत्तर जणांनी रेखाटली. त्यामध्ये डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) दहा विद्यार्थिनींचा समावेश होता. रेखाटनातून महर्षी कर्वे संस्था तसेच शहराचा वारसा जपण्याचा हा उपक्रम आहे. सध्या चालू असणाऱ्या मुसळधार पावसाची पर्वा न करता हा उपक्रम मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आला.
बीएनसीएच्या प्रभारी प्राचार्य डॉ. शुभदा कमलापूरकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम संस्थेच्या आवारात आयोजित करण्यात आला. त्यांनी संस्थेच्या परिसराची व तेथील महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांची माहितीही दिली. या उपक्रमाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या की, भारतरत्न महर्षी कर्वे यांची ही संस्था गेली १३० वर्षे महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अग्रणी आहे. संस्थेतील अशा प्रकारच्या रेखाटनामधून महर्षी कर्वे संस्थेच्या वास्तूचे दस्ताऐवजीकरण झाले. या उपक्रमात महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक समितीचेही सहकार्य लाभले. अर्बन स्केचर्सच्या या उपक्रमातून पुणे शहराची समृद्ध सांस्कृतिक व स्थापत्य परंपरा आणि शहरातील महत्वाच्या 'लॅण्डमार्क्स'चे रेखाचित्रांमधून जतन केले जाते,असे त्या म्हणाल्या.
'अर्बन स्केचर्स' संस्थेच्या पुणे विभाग प्रमूख आर्किटेक्ट गायत्री गोडसे म्हणाल्या की, महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था ही पुण्यातली ऐतिहासिक व मान्यवर संस्था आहे. हिरवाईने नटलेल्या या परिसराचे बारीक निरीक्षण करून त्याची रेखाटने काढण्यात आली. त्यातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या या संस्थेच्या कामाला कलात्मक अभिवादन करता आले. संस्थेच्या आवारात रेखाटनांमधून आम्हाला महर्षी कर्वे यांचा वारसा समजावून घ्यायला मदत झाली.
जागतिक अर्बन स्केचर्स ही एक चळवळ असून या उपक्रमात शहरातील वारसा स्थळे, सार्वजनिक स्थळे, गजबजलेले रस्ते आणि सतत बदलणारे शहरी स्वरूप याचे रेखाटन केले जाते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्केचिंग करणाऱ्या या उपक्रमाचे नेतृत्व आर्किटेक्ट गायत्री गोडसे, फराह इराणी आणि संदीप खाटपे करत आहेत.
Comments
Post a Comment