*प्रा. सुभाष जगताप यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी : प्रा. मिलिंद जोशी

*प्रा. सुभाष जगताप यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी : प्रा. मिलिंद जोशी* 

 *‘परिस स्पर्श’ स्मरणिकेचे दिमाखदार प्रकाशन; प्रा. सुभाष जगताप यांच्या कार्याचा गौरव* 

पुणे : तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीहिताच्या कार्याचा गौरव करणाऱ्या ‘परिस स्पर्श’ या स्मरणिकेचे प्रकाशन पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे उत्साहात पार पडला.

फ्रेंड्स अकॅडमी माजी विद्यार्थी समिती, सासवड आणि इंद्रायणी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना, तळेगाव दाभाडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘सकाळ’चे माजी संपादक मल्हार अरणकल्ले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी बदलत्या शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना शिक्षक आणि प्राध्यापकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित राहता कामा नये, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांना योग्य दिशा देणे, संस्कार व मूल्यांची जडणघडण करणे आणि त्यांच्या भवितव्याची जबाबदारी स्वीकारणे ही शिक्षकांची खरी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

“या संदर्भात प्रा. सुभाष जगताप यांचे कार्य आदर्शवत आहे. विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून त्यांना ज्ञानासोबत संस्कार, मूल्ये आणि जीवनदृष्टी देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे ते केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत,” असे गौरवोद्गार प्रा. जोशी यांनी काढले.

प्रा. सुभाष जगताप यांनी आपल्या मनोगतातून शैक्षणिक प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांसोबतच्या विविध आठवणी सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा आवर्जून उल्लेख केला. आपल्या यशामध्ये विद्यार्थ्यांचे प्रेम, सहकार्य आणि विश्वास यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्हार अरणकल्ले यांनीही प्रा. सुभाष जगताप यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जगताप यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उलगडताना त्यांनी अनेक रंजक किस्से सांगून उपस्थितांची मने जिंकली. प्रा. जगताप यांच्या कार्याचे आणि त्यांच्या स्वभावातील आपलेपणाचे कौतुक करत अरणकल्ले यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

‘परिस स्पर्श’ ही स्मरणिका वेदांतश्री प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी वेदांतश्री प्रकाशनचे संपादक सुनील उंब्रजकर, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, प्राचार्य रावसाहेब जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश धोत्रे यांनी केले. आभार कैलास राऊत यांनी मानले, तर सूत्रसंचालन वर्षा पुरंदरे बालगोपाल यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*