स्वराज्य टिकावे आणि सुराज्य घडावे यासाठी वंदे मातरम...'**खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी कथन केला राष्ट्र मंत्राचा महिमा

*'स्वराज्य टिकावे आणि सुराज्य घडावे यासाठी वंदे मातरम...'*

*खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी कथन केला राष्ट्र मंत्राचा महिमा*

पुणे: प्रतिनिधी

अनेकांच्या त्याग आणि बलिदानाने मिळालेले स्वराज्य टिकवण्यासाठी आणि सुराज्य घडवण्यासाठी युवा पिढीवर राष्ट्र प्रेमाचे संस्कार घडवणे आवश्यक असून त्यासाठीचे सामर्थ्य 'वंदे मातरम' या राष्ट्र मंत्रात आहे, अशा शब्दात खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी वंदे मातरम या गीताचा महिमा कथन केला. यावेळी त्यांनी सध्या संपूर्ण वंदे मातरम युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याची आग्रही अपेक्षा व्यक्त केली.

नागरी सोशल फाउंडेशनच्या शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'संपूर्ण वंदे मातरम गायन' स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात खासदार कुलकर्णी बोलत होत्या. या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, वंदे मातरमचे अभ्यासक मिलिंद सबनीस, नागरिक सोशल फाऊंडेशनचे विश्वस्त अमेय सप्रे, स्पर्धेच्या समन्वयक डॉ.  शीतल गोडबोले, स्मिता देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला विद्यार्थी,,पालक आणि शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

वंदे मातरम या गीताचे स्मरण होत असताना कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना दुर्गा मातेच्या रूपात लक्ष्मी, सरस्वती आणि साक्षात भारत मातेचे ही दर्शन घडले. त्यांनी आपल्या गीतात भारत मातेचे केलेले वर्णन प्रेरणा देणारे, भारावून टाकणारे आहे. प्रत्येक शब्द मनाला आणि मेंदूला भिडणारा आहे. या गीताच्या गायन आणि श्रवणाने राष्ट्रासाठी कार्य करण्याची उत्कट प्रेरणा प्राप्त होते, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारतात वंदे मातरम या गीतालाही राष्ट्रगीताचाच दर्जा प्राप्त असेल, असे नमूद करून ठेवले होते. मात्र, त्यानंतर दीर्घकाळ सत्ताधाऱ्यांकडून हा दर्जा डावलण्यात आला. या गीताबद्दल बुद्धिभ्रंश करण्यात आला. विशिष्ट समाज घटकाचा अनुनय करण्यासाठी वंदे मातरम ला डावलण्यात आले. मात्र, विद्यमान सरकारने वंदे मातरम या गीताला सन्मान प्रदान करणारे विधेयक संमत केले आहे, असेही खासदार कुलकर्णी यांनी नमूद केले.

भारताला मिळालेले स्वातंत्र्य सहजपणे मिळालेले नाही. हे स्वातंत्र्य बिना खड्ग, बिना ढाल, मिळाल्याचा अपप्रचार केला जातो. मात्र, त्यात तथ्य नाही. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी देहाची ढाल करून शरीरावर शस्त्र झेलून बलिदान दिले आहे. मोठ्या त्यागातून मिळालेले हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सक्षम युवा पिढी घडवण्याचे कार्य आपण सर्वांनी करणे आवश्यक आहे, असेही कुलकर्णी म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमेय सप्रे यांनी केले, तर स्पर्धा आयोजनामागील भूमिका डॉ. शीतल गोडबोले यांनी विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गोडबोले यांनी केले तर आभार स्मिता देशपांडे यांनी मानले. 

*चौकट*

*स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे*

*इयत्ता पहिली ते चौथी*

प्रथम - आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल 

द्वितीय - बालशिक्षण मराठी विद्यालय, डेक्कन 

तृतीय - नवीन मराठी शाळा

उत्तेजनार्थ - बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी 

*इयत्ता पाचवी ते सातवी*

प्रथम - अभिनव इंग्लिश मिडियम स्कूल 

द्वितीय -  आर. एम. शहा विद्यालय  

तृतीय - एन. ई .एम. एस. 

उत्तेजनार्थ - परांजपे विद्यालय, माधव गोळवलकर गुरुजी विद्यालय, अभिरुचि गुरुकुल

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*