सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत 9 देशातील खेळाडू सहभागीस्पर्धेत एकूण 15,000 डॉलर रकमेची भव्य पारितोषिके ही प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा "पुणे महापौर चषक" म्हणून ओळखली जाणार - पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे

सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत 9 देशातील खेळाडू सहभागी

स्पर्धेत एकूण 15,000 डॉलर रकमेची भव्य पारितोषिके 

ही प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा "पुणे महापौर चषक" म्हणून ओळखली जाणार - पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे

पुणे, 22 ऑगस्ट, 2026: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृती करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स 19 वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत 9 देशातील 304 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. हि स्पर्धा पी.ई.सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये 25 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत रंगणार आहे.

पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) चे मानद सर चिटणीस सीए रणजीत नातु यांनी सांगितले की, जगभरात कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स 19 वर्षांखालील प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा केवळ चार देशांमध्ये आयोजित केली जात असते. यातील दोन स्पर्धा युरोपमध्ये, दोन आशिया खंडात होत असतात. विशेष म्हणजे आशिया खंडात एक स्पर्धा इंडोनेशिया तर, दुसरी स्पर्धा भारतात पुण्यात 2011 पासून पुण्यात गेली 15 वर्षे यशस्वीपणे आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत एकूण 15,000 डॉलर रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत पीडीएमबीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, खजिनदार सारंग लागू आदी मान्यवर उपस्थित होते. 

"सुशांत चिपलकट्टी हा प्रतिभावान बॅडमिंटनपटू होता. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा बॅडमिंटनपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. तसेच, या स्पर्धेतील महत्वपूर्व गुणांमुळे त्यांच्या आगामी कारकिर्दीसाठी या स्पर्धेचा नक्कीच फायदा होत आहे. विशेष म्हणजे याआधीच्या मालिकेत सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, सात्विक साईराज, श्रीकांत किदांबी, प्रियांशु राजावत, चिराग शेट्टी हे नामांकित भारतीय बॅडमिंटनपटूदेखील सहभागी झाले होते, असे सीए रणजीत नातु यांनी सांगितले. 

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, पुणे हे बॅडमिंटन या खेळाचे जन्मस्थळ आहे. ह्या खेळाचे मूळ नाव "द पूना गेम" होते जे आपल्या पुण्यनगरीच्या तत्कालीन वापरल्या जाणाऱ्या नावापासून आले होते. आपल्या पुण्यात सुरू झालेला हा खेळ आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा प्रकारांपैकी एक असून, ही प्रत्येक पुणेकरासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. भारतामध्येही क्रिकेटनंतर बॅडमिंटन हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो.

भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धा तसेच इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा गौरव वाढविला आहे. पुणे शहरानेही अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच देशाला दिले असून त्यांनी जागतिक स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटना (PDMBA) ही पुणे जिल्हा व पुणे महानगर क्षेत्रातील बॅडमिंटन खेळाची अधिकृत संघटना असून, या भौगोलिक क्षेत्रात बॅडमिंटन खेळाचे नियमन, विकास, प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी पार पाडते. ही संघटना महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची संलग्न सदस्य असून, त्या माध्यमातून भारतीय बॅडमिंटन संघटना (BAI) आणि बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) यांच्याशी संलग्न आहे.

PDMBA मार्फत वर्षभर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अशा विविध दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले जाते. त्यापैकी "इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल ग्रैंड प्रिक्स (India Junior International Grand Prix IJIGP)" ही स्पर्धा विशेष उल्लेखनीय आहे. गेली जवळपास दोन दशके सातत्याने आयोजित होत असलेली ही स्पर्धा पुण्यातील ख्यातनाम बॅडमिंटनपटू स्वर्गीय सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मृतीस समर्पित आहे.

दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आयोजित होणारी ही स्पर्धा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय दिनदर्शिकेचा भाग असून, आशिया तसेच जगभरातील अनेक देशांतील उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात. काही वर्षांपूर्वी या स्पर्धेस "ग्रैंड प्रिक्स" हा प्रतिष्ठेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे तिचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि प्रतिष्ठा वृद्धिंगत झाली आहे. "ग्रैंड प्रिक्स" या दर्जाच्या जगामध्ये फक्त ४ स्पर्धा होतात ज्यातील २ यूरोप मधे तर २ आशिया खंडात होतात. त्यातील भारत देशामध्ये फक्त एक स्पर्धा होते आणि ती स्पर्धा म्हणजे आपल्या पुण्यात होणारी IJIGP ही स्पर्धा असून पुणे शहराच्या दृष्टीने ही गौरवाची बाब आहे. आज ही स्पर्धा पुणे शहराच्या क्रीडा परंपरेचे जागतिक स्तरावर प्रभावी प्रतिनिधित्व करीत आहे.पुण्यात जन्मलेल्या या खेळाला पुणेकरांच्या वतीने विशेष सन्मान मिळावा तसेच या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी भर पडावी तसेच या उद्देशाने इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल ग्रैंड प्रिक्स (IJIGP) हि स्पर्धा या पुढे "पुणे महापौर चषक (Pune Mayor's Trophy)" म्हणून ओळखली जाईल. अशी आम्ही घोषणा करीत आहोत.

या मान्यतेमुळे स्पर्धेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठा अधिक उंचावेल. तसेच जगभरातील विजेत्या खेळाडूंना पुणे महानगरपालिकेच्या "पुणे महापौर चषक" च्या स्वरूपात सन्मान स्वीकारण्याचा विशेष गौरव लाभेल. व पुणेकरांना देखील या उदयोन्मुख आंतराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान करता येईल व यामुळे पुणे शहराची क्रीडा परंपरा आणि आंतरराष्ट्रीय ओळख अधिक दृढ होण्यास निश्चितच हातभार लागेल.

आम्ही या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेला पुणेकरांच्या वतीने "पुणे महापौर चषक" हा सन्मान प्रदान करीत आहोत.

स्पर्धेत भारत, युएइ, अमेरिका, इंडोनेशिया, थायलंड, नेपाळ, मलेशिया, नेदरलँड, भूतान या 9 देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील विशेषतः राज्यातील खेळाडूंना व प्रेक्षकांना त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच, हि स्पर्धा 19 वर्षांखालील मुले व मुली एकेरी, 19 वर्षांखालील मुले व मुली दुहेरी गट आणि मिश्र अशा पाच गटात पार पडणार आहे. 
 

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*