मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत MPSC विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक; उद्याचा विद्यार्थी मोर्चा स्थगित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत MPSC विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक; उद्याचा विद्यार्थी मोर्चा स्थगित
मुंबई, दि. १४ जुलै – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आज मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून आयोजित या बैठकीत सुमारे अर्धा तास सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी उद्या MPSC चे अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले. सद्यस्थितीत ऑनलाईन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही, तसेच भविष्यात ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विचार झाला तर सर्व स्पर्धा परीक्षा एकाच वेळी त्या पद्धतीने घेता येईल अशी सक्षम व विश्वासार्ह यंत्रणा उभारल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच, १७ जुलैपर्यंत सुरू असलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट 'क') अर्ज प्रक्रियेबाबतही पुनर्विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिली.
या चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी सद्यस्थितीत ऑनलाईन परीक्षेचा निर्णय स्थगित करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याने, उद्या आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय विद्यार्थी प्रतिनिधींनी घेतला आहे.
उद्या MPSC अध्यक्ष व सचिव यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींसोबत पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये पुढील भूमिका आणि निर्णयाची सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल.
या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री महोदयांसमोर आपली भूमिका मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे विद्यार्थी प्रतिनिधींनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार, राजेश पांडे आणि राज देशमुख यांनीही विद्यार्थ्यांची भूमिका प्रभावीपणे मांडली. त्यांच्या सहकार्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
बैठकीस उपस्थित विद्यार्थी प्रतिनिधी शिष्टमंडळ
किरण निंभोरे (वास्तव कट्टा)
शिवराज मोरे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र युवक काँग्रेस)
प्रमोद पाटील
लेषपाल जवळगे (सरहद)
अक्षय जैन (महाराष्ट्र युवक काँग्रेस)
अनिकेत देशमाने (महाराष्ट्र विद्यार्थी संघटना)
नितीन आंधळे (विद्यार्थी प्रतिनिधी)
अर्चना शहा (काँग्रेस)
गणेश उबाळे (महाराष्ट्र युवक काँग्रेस)
Comments
Post a Comment