केएमपी ॲस्पायर एफसीचा रूट एफसीवर ६-१ असा दणदणीत विजय- एआयएफएफ महिला (१७ वर्षांखालील) युवा लीग

केएमपी ॲस्पायर एफसीचा रूट एफसीवर ६-१ असा दणदणीत विजय
- एआयएफएफ महिला (१७ वर्षांखालील) युवा लीग 

पुणे, २२ एप्रिल: केएमपी ॲस्पायर एफसीने रूट एफसीवर ६-१ असा दणदणीत विजय मिळवत एआयएफएफ महिला (१७ वर्षांखालील) युवा लीगची धडाकेबाज सुरुवात केली. तसेच जेतेपदासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून आपली ओळख निर्माण केली.

केएमपी ॲस्पायर एफसीचा सामन्याच्या सुरुवातीपासून आपल्या आक्रमक खेळाचे आणि गुणवत्तेचे प्रदर्शन केले. दुसऱ्याच मिनिटाला फॉरवर्ड यईफाबी थोकचोमने उत्कृष्ट कॉर्नर किकवर उत्तम नियंत्रण मिळवून चेंडू एकाथौडम मालेमंगनबी देवी हिच्याकडे सोपवला. तिने कोणतीही चूक न करता गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.

२९ व्या मिनिटाला एका उत्कृष्ट चालीद्वारे त्यांनी आपली आघाडी दुप्पट केली. सयानी चक्रवर्तीने अचूक 'थ्रू-बॉल'सह प्रतिस्पर्धी संघाची बचावफळी भेदली आणि यईफाबी हिला चेंडू पास केला. यईफाबी हिने पुढे आलेल्या रूट एफसीच्या गोलकीपरला चकवत केएमपी ॲस्पायर एफसीची आघाडी २-० अशी वाढविली.

दुसऱ्या हाफमध्ये केएमपी ॲस्पायर एफसीने प्रतिस्पर्ध्यांना प्रतिकाराची संधी दिली नाही. पेनल्टी एरियामध्ये रूट एफसीची बचावफळी भेदत यईफाबीने (५२ व्या मिनिटाला) सामन्यातील तिचा दुसरा गोल नोंदवला. चार मिनिटांनंतर तिने सयानी चक्रवर्तीसाठी गोलची संधी निर्माण केली. तिच्या पासवर सयानीने पेनल्टी क्षेत्राबाहेरून मारलेला शानदार फटका थेट गोलजाळीच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात जाऊन विसावला.

इपशिता गवारीने ५८ व्या मिनिटाला उजव्या बाजूने (फ्लँक) वेगाने मुसंडी मारली आणि चेंडू मालेमंगनबी हिच्याकडे सोपवला. त्यावर तिने तिचा दुसरा गोल पूर्ण केला. रूट एफसीने ८३ व्या मिनिटाला एक गोल करत आघाडी कमी केली तरी सूर गवसलेल्या केएमपी ॲस्पायर एफसीने लगेचच आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. ८५ व्या मिनिटाला सयानीने पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बचाव फळीच्या वरून अचूक पास दिला. हा पास बदली खेळाडू बुमी बायोरकडे गेला. रूट एफसीच्या पुढे आलेल्या गोलकीपरला चकवत तिने गोलसंख्या सहावर पोहोचवली.

थौडम मालेमंगनबी देवी आणि यईफाबी थोकचोम यांचे प्रत्येकी दोन तसेच सयानी चक्रवर्ती आणि बुमी बायोरचा प्रत्येकी एक गोलच्या जोरावर केएमपी ॲस्पायर एफसीने मोठ्या फरकाने विजयी सलामी दिली. तसेच आक्रमकता, संयम आणि सांघिक खेळाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. या विजयामुळे त्यांनी केवळ तीन मौल्यवान गुण मिळवले नाही तर पुणेस्थित संघाने राष्ट्रीय जेतेपद पटकावण्यादृष्टीने आगेकूच केली.

केएमपी ॲस्पायर एफसी संघ: 

गोलरक्षक : तनिष्का देवरे, निशा
बचावपटू: तीर्थ सालियन, ईशा मेहेर, ताशा पारकर, एरीना लैश्राम, मैबम ऑलिंपिया देवी, इरोम देविया चानू, तोनंबम तानिया देवी, मायानलंबम कल्पना देवी
मिडफिल्डर: इपशिता गवारी, नौरेम टीना देवी, कुमकुम सूत्रधार, सयानी चक्रवर्ती, बुमी बायोर, माहिलू तयांग, नयना नेगी
फॉरवर्ड: यईफाबी थोकचोम, थौडम मालेमंगनबी देवी

संघ अधिकारी (सपोर्ट स्टाफ):
मुख्य प्रशिक्षक: रणजीत आर. जोशी
संघ प्रशिक्षक : अभिषेक परदेशी
संघ व्यवस्थापक : प्रिया राठोड
फिजिओथेरपिस्ट : डॉ. अपूर्वा डहारे 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न