*"पाच फुटाचा बच्चन" मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर
*"पाच फुटाचा बच्चन" मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर*
*एकपात्री नाटक ते सिनेमा : पाच फुटाच्या बच्चनचा दैदीप्यमान प्रवास.*
*'पाच फुटाचा बच्चन' चित्रपटात तरूण कीर्तनकार मुलीची गोष्ट उलगडणार*
*कौस्तुभ रमेश देशपांडे यांचं लेखन, दिग्दर्शन*
नाटकाचं रुपांतर चित्रपटात होण्याच्या आजवरच्या यशस्वी परंपरेत आता आणखी एका सिनेमाचे नाव जोडले जाणार आहे. एकपात्री प्रायोगिक नाटक असलेली ‘पाच फुटाचा बच्चन’ ही गोष्ट आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिलेवहिले टीजर पोस्टर आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे .
कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज् यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, किशोर कदम, आशय कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील, विनोद वणवे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक शेटे यांचं छायांकन, सौरभ प्रभुदेसाई यांचं संकलन, शंतनु-दिनेश यांचं ध्वनी आरेखन आहे. तसेच निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिलेले असून प्रदीप आवटे यांनी गीतलेखन केलेले आहे. या सगळ्यात ‘पाच फुटाचा बच्चन’ नक्की कोण साकारणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या टीजर पोस्टरनंतर ‘पाच फुटाचा बच्चन’ या सिनेमाच्या आकर्षक चित्रशीर्षकाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या टीजर पोस्टरवरुन हा चित्रपट विठ्ठल भक्ती, वारकरी संप्रदाय, कीर्तन परंपरा याच्याशी निगडीत आहे असे दिसत आहे. एक तरुण कीर्तनकार मुलगी आणि तिच्याभोवती रिंगण करून कीर्तनात दंग झालेले वारकरी असे हे चित्र आहे. या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे.
दिग्दर्शक कौस्तुभ देशपांडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘पाच फुटाचा बच्चन’या एकपात्री नाटकाचा प्रयोग झाला. पहिल्याच प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या प्रयोगांनाही तुफान प्रतिसाद मिळत राहिला. मुंबई-पुण्यासह गावोगावी या नाटकाचे प्रयोग केले. अनेक पुरस्कारांमध्ये नामांकन, पुरस्कार मिळाले, महोत्सवांमध्ये नाटकाचं सादरीकरण झालं. नाटकावर येत असलेल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह वाढत होता. या नाटकावर चित्रपट होऊ शकतो याची जाणीव होत होती. निर्माते राहुल कर्णिक यांनी या नाटकाचा चित्रपट करण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे नाटकाचे प्रयोग योग्य टप्प्यावर थांबवून आम्ही चित्रपट निर्मितीच्या कामाला सुरुवात केली . अस्सल मातीतली कथा भव्य स्वरुपात पडद्यावर चित्रित करण्यासाठी लागणारा तांत्रिक संघ तयार करून सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, खडकवासला, पुणे आणि कोल्हापूर इथे गेल्या वर्षभरात चित्रीकरण केलेले आहे. आता ‘पाच फुटाचा बच्चन’ प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे.
Comments
Post a Comment