४० वर्षीय महिलेच्या अवयवदानातून पाच जणांना मिळाले नवजीवनमहिलेचे संपूर्ण आयुष्य निःस्वार्थीपणा आणि कुटुंबाप्रती असलेल्या अपार समर्पणाचे प्रतीक


४० वर्षीय महिलेच्या अवयवदानातून पाच जणांना मिळाले नवजीवन
महिलेचे संपूर्ण आयुष्य निःस्वार्थीपणा आणि कुटुंबाप्रती असलेल्या अपार समर्पणाचे प्रतीक

पुणे, १३ जुलै २०२६ : दौंड येथील ४० वर्षीय विमा प्रतिनिधी (इन्शुरन्स एजंट) महिलेच्या अवयवदानातून पाच जणांना मिळाले नवजीवन मिळाले आहे. मेंदूमृत घोषित झाल्यानंतर कुटुंबीयांनी अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

रस्ते अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानंतर या महिलेला उपचारासाठी ७ जुलै रोजी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. तिला ९ जुलै रोजी मेंदूमृत घोषित करण्यात आले. या दुःखद प्रसंगी तिच्या कुटुंबीयांनी अवयवदानासाठी संमती दर्शवून आपल्या वैयक्तिक दुःखाचे रूपांतर इतरांसाठी आशेच्या किरणात केले.

१० जुलै २०२६ रोजी अवयव काढण्याची (ऑर्गन रिट्रिव्हल) शस्त्रक्रिया करण्यात आली.

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे यांनी सांगितले की, दात्याचे फुफ्फुसे, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे काढण्यात आली. यापैकी यकृत आणि एक मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण नोबल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड आणि फुफ्फुसे झेडटीसीसीच्या माध्यमातून पुण्यातील इतर रुग्णालयात ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पाठवण्यात आली.

यकृत प्रत्यारोपण हे यकृताच्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असलेल्या ५९ वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपण मूत्रपिंड निकामी झालेल्या ४९ वर्षीय महिला रुग्णावर यशस्वीरीत्या करण्यात आले.

या प्रत्यारोपण प्रक्रियेत यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. मनोज श्रीवास्तव आणि डॉ. स्मिता पारख, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. विक्रम सातव यांसह वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते व प्रत्यारोपण समन्वयक श्री. महेश तुपे व संपूर्ण प्रत्यारोपण पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे उपव्यस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले, "अत्यंत दुःखाच्या क्षणीही दात्याच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या दुःखापलीकडे जाऊन विचार केला आणि अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या असामान्य उदारतेला आम्ही मनःपूर्वक सलाम करतो. तसेच ही जीवनदायी मोहीम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या झेडटीसीसी पुणे, ग्रीन कॉरिडॉर तयार करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे आणि सर्व आरोग्यसेवा पथकांचेही आम्ही मनापासून आभार मानतो."  
 
निःस्वार्थीपणा आणि कुटुंबाप्रती अखंड समर्पण

या महिलेचे संपूर्ण आयुष्य निःस्वार्थीपणा आणि कुटुंबाप्रती असलेल्या अपार समर्पणाचे प्रतीक होते. दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झालेली,पण नंतर वडिलांच्या अकाली निधनानंतर स्वतः मात्र आईची जबाबदारी सांभाळता यावी म्हणून त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला.दुर्दैवाने एका रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांची मानवतावादी भावना मृत्यूनंतरही जिवंत राहिली. त्यांच्या अवयवदानामुळे त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांद्वारे, यकृताद्वारे आणि फुफ्फुसांद्वारे पाच जणांना नवजीवन लाभले.त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास समाजासाठी एक अमूल्य संदेश देऊन जातो—मृत्यूनंतरही अवयवदानाच्या माध्यमातून एक व्यक्ती अनेकांना जीवनदान देऊ शकते आणि अनेकांचे आयुष्य समृद्ध करू शकते.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न