३रा नाफा फिल्म फेस्टिव्हल : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होणाऱ्या नाफा महोत्सवात पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर, ११ पुरस्कारप्राप्त लघुपटांचे स्क्रीनिंग; जागतिक व्यासपीठावर मराठी सिनेमाची नवी भरारी!*
*३रा नाफा फिल्म फेस्टिव्हल : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होणाऱ्या नाफा महोत्सवात पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर, ११ पुरस्कारप्राप्त लघुपटांचे स्क्रीनिंग; जागतिक व्यासपीठावर मराठी सिनेमाची नवी भरारी!*
*'तु मी आणि अमायरा', 'न आवडती गोष्ट', 'द्विधा', 'पारो' आणि 'फ्रेम' या चित्रपटांसोबतच 'अनडॉक्युमेंट डॉट पीडीएफ' या लघुपटाचे नाफा महोत्सवात वर्ल्ड प्रीमिअर!*
*सॅन होजे (कॅलिफोर्निया) | प्रतिनिधी :* मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळवून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरत असलेला तिसरा नाफा चित्रपट महोत्सव येत्या ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सॅन होजे येथील ऐतिहासिक कॅलिफोर्निया थिएटरमध्ये भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवात यंदा मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार तांत्रिक व आशयघन कलाकृतींचा उत्कृष्ट संगम अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांच्या कालावधीत पाच मराठी चित्रपटांचे वर्ल्ड प्रीमिअर होणार असून, ११ निवडक पुरस्कारप्राप्त लघुपटांचे विशेष स्क्रीनिंग देखील होणार असल्याने जगभरातील मराठी रसिकांसाठी हा महोत्सव एक वेगळी पर्वणी ठरणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी नमूद केले आहे.
यंदाच्या महोत्सवात जागतिक प्रथम प्रदर्शन होणाऱ्या चित्रपटांमध्ये 'तु मी आणि अमायरा', 'न आवडती गोष्ट', 'द्विधा', 'पारो' आणि 'फ्रेम' या चित्रपटांचा समावेश आहे. प्रेम, कुटुंब, सामाजिक वास्तव, स्त्री-अस्तित्व, नातेसंबंध आणि मानवी भावविश्व अशा विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य आणि सर्जनशीलतेची झलक पाहायला मिळणार आहे. याशिवाय 'ब्रह्मकमळ', 'बटरस्कॉच', 'एक सुवर्ण प्रवास', 'हायफन', 'अनडॉक्युमेंटेड', 'पान्हा', 'एच-१ बी ऑर नॉट टू बी', 'बबनराव इन लव्ह विथ एला', 'केकी' यांसह एकूण ११ पुरस्कारप्राप्त लघुपटांची निवड या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. 'अनडॉक्युमेंट डॉट पीडीएफ' या लघुपटाची निर्मिती नाफाने केली असून, अमेरिकेतील सध्याच्या 'इमिग्रेशन' या संवेदनशील सामाजिक वास्तववादी विषयावर आधारित आहे. या लघुपटाद्वारे समकालीन आणि विचारप्रवर्तक विषयाची अत्यंत प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. या लघुपटाचा वर्ल्ड प्रीमिअर NAFA Film Festival 2026 मध्ये होणार असून 'Undocumented.pdf' सर्वांसाठी कुतूहलाचा विषय आहे.
यंदाच्या महोत्सवाविषयी बोलताना नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, "नाफासाठी हे वर्ष अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक आहे. महाराष्ट्र शासनाचे लाभलेले सहकार्य आणि पाठबळ ही केवळ प्रशासकीय भागीदारी नसून मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रवासाला नवी ऊर्जा देणारी प्रेरणादायी ताकद आहे. शासनाच्या या सहकार्यामुळे मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर अधिक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाले असून, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. यंदा नाफा चित्रपट महोत्सवासाठी भारत, अमेरिका आणि इतर देशांतून विक्रमी संख्येने चित्रपट प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यामुळे अंतिम निवड प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक ठरली. प्रत्येक चित्रपटाचे मूल्यमापन केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने नव्हे, तर तो जागतिक प्रेक्षकांच्या मनाला किती स्पर्श करतो, त्याचा आशय किती प्रभावी आहे आणि त्याचे सादरीकरण किती दर्जेदार आहे, या निकषांवर करण्यात आले आहे."
ते पुढे म्हणाले, "चित्रपटांचे परीक्षण करताना एकूण परिणामकारकता, दिग्दर्शन, पटकथा, संकलन, अभिनय आणि छायांकन या सहा प्रमुख निकषांच्या आधारे स्वतंत्र गुणांकन करण्यात आले. चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विचार निर्माण करतो का, भावनिक प्रभाव निर्माण करतो का, दिग्दर्शनात नावीन्य आहे का, पटकथा प्रभावी आहे का, संकलन कथेला गती देते का, अभिनयातून पात्रांचे भावविश्व प्रभावीपणे उभे राहते का आणि छायांकन कथेला दृश्यात्मक समृद्धी देते का, याचा अत्यंत बारकाईने विचार करण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया अनुभवी परीक्षकांनी अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पूर्ण केली. स्वप्ना वाघमारे-जोशी, आदित्य पटवर्धन, अनिकेत ढवळे, नितीन अडसूळ, डॉ. गौरी घोलप, भालचंद्र कुलकर्णी आणि दिलीप राणे यांसारख्या मान्यवरांनी विविध विभागांतील चित्रपटांचे परीक्षण केले. यावर्षी भारतातील सर्वोत्तम तीन लघुपट, अमेरिकेतील सर्वोत्तम तीन लघुपट, भारतातील सर्वोत्तम चित्रपट, आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम तीन व्हर्टिकल स्वरूपातील मायक्रोड्रामा अशा विविध श्रेणींमध्ये निवड करण्यात आली आहे. आजचा मराठी सिनेमा आशय, तांत्रिक गुणवत्ता आणि सादरीकरणाच्या बाबतीत जागतिक दर्जाशी स्पर्धा करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे या निवड प्रक्रियेतून प्रकर्षाने जाणवले."
महाराष्ट्र राज्य शासनाचा भारताबाहेरील अधिकृत चित्रपट महोत्सव म्हणून मान्यता मिळालेला, सॅन होजे येथे आयोजित करण्यात येणारा नाफा हा तीन दिवसीय महोत्सव केवळ चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित नसून मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक सांस्कृतिक सेतू म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नवोदित आणि प्रस्थापित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि जगभरातील मराठी चित्रपटप्रेमी यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे कार्य नाफा सातत्याने करत आहे. यंदाच्या महोत्सवातून मराठी चित्रपटसृष्टीची वाढती गुणवत्ता, जागतिक दृष्टीकोन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होत असलेली विश्वासार्ह ओळख अधिक दृढ होणार असून, मराठी सिनेमाच्या जागतिक विस्ताराच्या प्रवासातील हा आणखी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
Comments
Post a Comment