शिक्षण संस्था चालवताना नैतिकतेशी तडजोड नको**अॅड. एस. के. जैन यांचे मत : पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार जैन यांना प्रदान*
*शिक्षण संस्था चालवताना नैतिकतेशी तडजोड नको*
*अॅड. एस. के. जैन यांचे मत : पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीतर्फे स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार जैन यांना प्रदान*
पुणे : शिक्षण संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत असल्याशिवाय ती चालत नाही, परंतु ते करताना नैतिकतेवर तडजोड होता कामा नये. पैसा कितीही मिळू शकतो; परंतु आपण किती लोकांचे जीवन घडवणार की बिघडवणार, याचा विचार करायला हवा. शिक्षण संस्था चालवायची आहे म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात, या वृत्तीला रोखण्याचा प्रयत्न झाला नाही, तर समाजाचे भविष्य चांगले होईल, असे मला वाटत नाही. सगळ्याच शिक्षण संस्था वाईट नाहीत, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एस. के. जैन यांनी व्यक्त केले.
पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, पुणे यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक गुरुवर्य स्व. मोरेश्वर गोपाळ चाफेकर यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारा स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार २०२६ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अॅड. एस. के. जैन यांना प्रदान करण्यात आला. सदाशिव पेठ येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, उपमहापौर परशुराम वाडेकर, संस्थेचे अध्यक्ष महादेव माने, उपाध्यक्ष डॉ. कल्याण वाघ, खजिनदार संजय लोंढे, मानद सचिव संदीप घोलप तसेच संचालक मंडळातील राज मुजावर, शिवाजी कामथे, विजय कचरे, धोंडीबा तरटे, डॉ. मंगल शिंदे, पुष्पक कांदळकर, दत्तात्रय हेगडकर, हर्षा पिसाळ, भगवान निक्रड आणि तज्ज्ञ संचालक विठ्ठल रणशूर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप रुपये २५,००१/- चा धनादेश, मानपत्र, पुणेरी पगडी आणि शाल असे होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ॲड. एस. के. जैन यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी ५० हजार रुपयांचा धनादेश दिला.
डॉ. एस. के. जैन म्हणाले, शिक्षक हे शैक्षणिक संस्थांचे नोकर नाहीत. शिक्षण संस्थेने शिक्षकांसाठी मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक बनावे. शिक्षकांना केवळ आदेश देण्याचे काम संस्थेने करू नये. संस्थेचा प्रमुख घटक हा शिक्षक असतो. त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे.
शिक्षकांना नोकरीसाठी मुलाखतींना जावे लागणे ही वेदनादायी बाब आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) खरोखर गरज आहे का, याचाही विचार व्हायला हवा. शिक्षकांना समाजात सन्मानाने शिक्षक म्हणून काम करता आले पाहिजे. शिक्षकांचा मान जोपर्यंत राहील, तोपर्यंत समाज योग्य मार्गावर राहील, असेही जैन यांनी सांगितले.
डॉ. अनिल पाटील म्हणाले, जगातील सर्वोत्तम अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्या दारात आणून ठेवला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे प्रथमच शिक्षण क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय काम झाले आहे.
खाजगी क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी केवळ पदवी नव्हे, तर कौशल्य महत्त्वाचे आहे. केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन उपयोग नाही. जग झपाट्याने बदलत आहे आणि त्या बदलांनुसार आपणही स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. तुम्ही कसे शिकाल आणि कसे शिकवाल, याला आज विशेष महत्त्व आहे. उद्याच्या गरजांनुसार तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देत असाल, तरच त्याला खरे महत्त्व आहे. कारण आजच्या काळात स्पर्धा मोठी आहे.
प्रास्ताविकात महादेव माने म्हणाले, सहकार्याच्या भावनेतून पतपेढीची स्थापना झाली. आपल्या संस्थेचे ध्येय शिक्षकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार, विश्वास आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आर्थिक सेवा उपलब्ध करून देत त्यांची सर्वांगीण प्रगती साधणे हे आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन संस्था केवळ आर्थिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे.
ते पुढे म्हणाले, आधार योजना, देश-विदेश सहल, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला, निवृत्त सभासदांचा सन्मान, गुणवंत सभासद व गुणी पाल्यांचा गौरव तसेच तिळगूळ समारंभ अशा विविध उपक्रमांद्वारे संस्था सभासदांच्या जीवनात आनंद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत आहे. डॉ. मंगल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संजय लोंढे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment