टाटा मोटर्सच्या कौशल्य उपक्रमाद्वारे २३,००० हून अधिक तरुणांचे सक्षमीकरण, ५,००० पेक्षा जास्त तरूणांना मिळाला रोजगारभारतात नेक्स्ट-जनरेशन गतिशीलता कर्मचारीवर्गाची उभारणी


टाटा मोटर्सच्या कौशल्य उपक्रमाद्वारे २३,००० हून अधिक तरुणांचे सक्षमीकरण, ५,००० पेक्षा जास्त तरूणांना मिळाला रोजगार
भारतात नेक्स्ट-जनरेशन गतिशीलता कर्मचारीवर्गाची उभारणी

मुंबई, १३ जुलै २०२६: वर्ल्ड युथ स्किल्‍स डे च्‍या पूर्वसंध्येला टाटा मोटर्स आपल्या प्रमुख 'कौशल्य' उपक्रमाद्वारे भारतातील तरुणांच्या आकांक्षा आणि यशाचा गौरव करत आहे. हा देशातील सर्वात मोठा उद्योग-नेतृत्वित कौशल्य उपक्रम आहे. शिक्षण आणि रोजगारक्षमता यांमधील तफावत दूर करण्‍यासाठी डिझाइन केलेल्या या उपक्रमात २३,००० हून अधिक तरुणांनी नोंदणी केली आहे, ५,००० पेक्षा जास्त पदवीधरांना १०० टक्‍के प्लेसमेंट दरासह रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत, ज्यामध्ये ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय प्लेसमेंट्सचा समावेश आहे.

भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करत असताना कौशल्य उपक्रम प्रगत उत्पादन, ऑटोमेशन आणि उदयोन्मुख मोबिलिटी तंत्रज्ञानामध्ये भविष्य-सज्ज कौशल्ये असलेल्या तरुणांसाठी अर्थपूर्ण करिअरचे मार्ग तयार करत आहे. यामुळे कुशल टॅलेंटसाठी उद्योगाची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होत आहे.

रोजगारक्षमतेच्या पलीकडे जाऊन कौशल्य उपक्रम उत्पादन क्षेत्रातील करिअरसाठी वंचित किंवा प्रतिनिधित्व कमी असलेल्या घटकांनाही संधी मिळवून देत आहे. यामध्ये महिलांचा सहभाग २१ टक्‍के आहे, तर २५ टक्‍के सकारात्मक कृती प्रवर्गातील आहेत. यासह भविष्यासाठी अधिक वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि न्याय्य कर्मचारीवर्ग उभारण्याप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

टाटा मोटर्सचे चीफ ह्युमन रिसोर्सेस ऑफिसर सीताराम कांडी म्हणाले, “भारतामधील उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता आणि गतिशीलतेच्या आकांक्षा येथील कर्मचारीवर्गाच्‍या गुणवत्तेवर आधारित असतील. कौशल्य उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही टेक्निकल शिक्षण, औद्योगिक अनुभव आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांची सांगड घालणाऱ्या संधी निर्माण करून कुशल व्यावसायिकांच्या भावी पिढीमध्ये गुंतवणूक करत आहोत. हा उपक्रम तरुणांना अर्थपूर्ण करिअर घडवण्यास मदत करत आहे, आणि वेगाने प्रगत व तंत्रज्ञानावर आधारित होत चाललेल्या ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी आवश्यक असलेल्या कुशल टॅलेंटची साखळी दृढ करत आहे. आमच्या प्रशिक्षणार्थ्यांनी मिळवलेल्‍या उत्कृष्ट प्लेसमेंट निकालामधून निदर्शनास येते की, प्रासंगिक, रोजगारक्षम आणि भविष्य-सज्ज कौशल्ये निर्माण करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहयोग प्रभावी ठरते. आम्ही या उपक्रमाचा विस्तार वाढवण्यासाठी आणि भारताच्या विकासामध्ये सहभागी होण्यासाठी अधिकाधिक तरुणांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

२०२१ मध्ये सुरू झालेला आणि पुणे, जमशेदपूर, लखनौ, पंतनगर, साणंद आणि धारवाड येथील उत्पादन केंद्रांमध्ये कार्यरत असलेला हा उपक्रम 'कमावा आणि शिका' (अर्न-अँड-लर्न) मॉडेल अंतर्गत पूर्णपणे प्रायोजित डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स कोर्स प्रदान करतो. उद्योग तज्ज्ञांच्या मदतीने तयार केलेला आणि गतिशीलतेच्या भविष्याला आकार देणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी सुसंगत असलेला अभ्यासक्रम क्लासरूममधील शिक्षणासह टाटा मोटर्सच्या उत्पादन केंद्रांमधील प्रत्यक्ष शॉप-फ्लोअरचा (कारखान्यातील कामाचा) उत्तम अनुभव एकत्र आणतो. प्रशिक्षणार्थी यामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमेशन, आयओटी आणि इंडस्ट्री ४.० मधील कौशल्ये आत्मसात करतात.

हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना टाटा मोटर्सच्या विस्तारित परिसंस्‍थेमध्ये पद्धतशीर प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, ज्यामध्ये डीलरशिप्स, पुरवठादार, विक्रेते, टाटा ग्रुप कंपन्या, इतर ऑटोमोबाईल उत्पादक आणि आंतरराष्ट्रीय नियोक्ते यांचा समावेश आहे. कौशल्यचे माजी विद्यार्थी आज विविध उद्योगांमध्ये आपले योगदान देत आहे, जिथे ते टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लि., टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लि., झायडस, जेएसडब्ल्यू ग्रीनटेक, सुब्रोज, स्पिनी, विप्रो यांसारख्या नामांकित कंपन्‍यांमध्ये कार्यरत आहेत. या उपक्रमाने जागतिक स्तरावर करिअरच्या संधी देखील खुल्या केल्या आहेत, ज्या अंतर्गत ५० पदवीधरांना स्लोव्हाकियातील नित्रा येथील जग्वार लँड रोव्हरच्या उत्पादन केंद्रात रोजगार मिळाला आहे.


image.png
सध्या स्लोव्हाकियातील जग्वार लँड रोव्हरमध्ये कार्यरत असलेल्या आणि डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्सच्या माजी प्रशिक्षणार्थी अनिता केंदे बेठेकर आपला अनुभव सांगत म्हणाल्‍या, “महाराष्ट्रातील एका दुर्गम आदिवासी गावातून आल्यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगात जागतिक स्तरावर करिअर करणे एकेकाळी माझ्या कल्पनेच्या पलीकडे होते. टाटा मोटर्सच्या कौशल्य उपक्रमाने मला कौशल्ये, अनुभव आणि आत्मविश्वास दिला, ज्‍यामुळे मी संधींचा पाठपुरावा करू शकले, ज्यांचा मी कधी विचारही केला नव्हता. आज मला अभिमान वाटतो की, मी माझ्या गावातील आणि आसपासच्या परिसरातील पहिली मुलगी आहे, जिच्याकडे स्वतःचा पासपोर्ट आहे आणि स्लोव्हाकियामध्ये जग्वार लँड रोव्हरसोबत करिअर घडवत आहे. हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी आणि आपल्या परिस्थितीपलीकडे जाऊन स्वप्न पाहण्याची हिंमत करणाऱ्या प्रत्येक तरुण मुलीसाठी अभिमानाचा स्रोत आहे.”



Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न