कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी बुद्धिची जोड आवश्यकच : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी बुद्धिची जोड आवश्यकच : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी
मीडिया इनक्युबेशन सेंटर आणि शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन सुरू करण्याची कुलगुरूंची ग्वाही
पत्रकारिता, माध्यम उद्यमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावर कार्यशाळा
पुणे : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स) उपयुक्त आहे; पण कृत्रिम बुद्धिमत्तेला काही मर्यादाही आहेत. माध्यमांना हे तंत्रज्ञान वृत्त बनवून देईल, पण त्या वृत्तामध्ये नाविन्यता आहे का हे जाणून घ्यावे लागेल. कारण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संकलित झालेल्या माहितीतूनच एखादे वृत्त मिळू शकते. वृत्तामध्ये नाविन्यता आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच मानवी बुद्धिमत्ता वापरणे आवश्यक आहे. असे जर झाले तरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग माध्यमांमध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकेल, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. विद्यापीठामध्ये मीडिया इनक्युबेशन सेंटर आणि शंतनुराव किर्लोस्कर अध्यासन सुरू करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग, पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सहयोगाने पुणे मॅनेजमेंट असोसिएशन (पीएमए)च्या सेंटर ऑफ एक्सलन्स (मिडीया अँड एन्टरटेन्मेंट) तर्फे मंगळवारी (दि. २८) पत्रकारिता, माध्यम उद्यमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, प्रसाद मिरासदार, ज्येष्ठ लेखक व अभ्यासक डॉ. अच्युत गोडबोले मंचावर होते.
डॉ. सुरेश गोसावी पुढे म्हणाले, माध्यम प्रतिनिधीने एखाद्या व्यक्तीला बोलते करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून बोलते करणे यात खूप फरक आहे. एआय उपकरण तुम्हाला बोलते करू शकेल का हा प्रश्न आहे.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या उपक्रमांची माहिती देऊन प्रसाद मिरासदार यांनी रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मीडिया इनक्युबेशन सेंटर सुरू करावे आणि पीएमएचे अध्यक्ष शंतनूराव किर्लोस्कर यांच्या नावे विद्यापीठामध्ये असलेले अध्यासन पुन्हा सुरू करावे, अशी विनंती करत या दोन्ही उपक्रमांसाठी पीएमए सहकार्य करेल अशी ग्वाहीही दिली.
डॉ. संजय तांबट यांनी प्रास्ताविक केले.
‘एआय आणि माध्यम उद्यमता’ या विषयी बोलताना डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, माणूस, माणसाचा स्पर्श, माणसाचा हस्तक्षेप हा प्रत्येक क्षेत्रात गरजेचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणसाने एकत्र येऊन काम केल्यास त्याचा प्रचंड परिणाम होईल. एआय तंत्रज्ञानामुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे जगातील जास्तीतजास्त ३० टक्के नोकऱ्या जाऊ शकतात आणि उरलेल्या नोकऱ्यांची कार्यपद्धती बदलू शकते. तसेच नवनवीन क्षेत्रात नोकऱ्यांची उपलब्धता वाढू शकते. त्यासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आवश्यक आहे.
एआय तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी ‘एआय युगातील करियर : संधी व आव्हाने’ या विषयावर, थिंक बँकचे संस्थापक विनायक पाचलग यांनी ‘डिजटल माध्यमे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयी तर ‘पत्रकारिता, माध्यम उद्यमता आणि एआय टुल्स’ या विषयी एआय तज्ज्ञ डॉ. अमेय पांगारकर यांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन तुषार रूपनर यांनी केले. दिवसभर झालेल्या या कार्यशाळेत १७५ हून अधिक पत्रकार आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment