त्यांच्या ही हातातून साकारतोय बाप्पा*.......
*त्यांच्या ही हातातून साकारतोय बाप्पा*.......
आयुष्यातील एका वळणावर , रागाच्या भरात नकळत त्यांच्या हातून गुन्हा घडला, त्याची शिक्षा ते प्रामाणिकपणे भोगत आहेत.त्यांना नकारात्मक वातावरणातून बाहेर काढून त्यांच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून एका वेगळ्या आयुष्याचा शब्दश: श्री गणेशा येरवडा मध्यवर्ती कारागृहात संपन्न झाला.निमित्त होते कारागृहातील बंदी बांधवांना गणपती मूर्ती बनवण्याच्या प्रशिक्षणाचे. या सकारात्मक आणि विधायकते ची ही पालखी खांद्यावर पेलली होती जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांचे चिरंजीव युवा शिल्पकार विराज ज खटावकर यांनी. महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान- पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातील चांगला माणूस जागा करण्या साठी गेली बारा वर्षे प्रेरणापथ हा उपक्रम कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत या बांधवांना पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत या बांधवांनी माती मळण्यापासून ते प्रत्यक्ष गणपती मूर्ती बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे सहभाग घेतला.
महाराष्ट्र कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, कारागृह ,कागारगृह उपमहा निरीक्षक श्री योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्री सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक सौ पल्लवी कदम,सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, तुरुंग अधिकारी श्री शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा संपन्न झाली.
या प्रकल्पाचे समन्वयक आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना या बांधवांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्या हातून चांगले काम करून घेण्याच्या उद्दिष्टाने प्रेरणापथ प्रकल्प कार्यरत असून त्याला समाजाच्या विविध स्तरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी याप्रसंगी बोलताना या बंदी बांधवांमध्ये असलेल्या ऊर्जेला आणि कलात्मकतेला जर योग्य मार्ग आणि वळण मिळाले तर त्यांच्या हातून अनेक चांगल्या कलाकृती घडू शकतील आणि त्याची सुरुवात या कार्यशाळेतून झाली आहे असे सांगून माझ्या कला जीवनातल्या प्रवासातला हा अविस्मरणीय दिवस आहे असे नमूद केले. या कार्यशाळेत शिल्पकार शशिकांत राहूकर, अमित कलाल, रोहित गोळे, कागद काम निर्देशक पुंडलिक खलोलकर, शुभम मेदनकर, प्रवीण सोनवणे, संजय मोरे यांनी मार्गदर्शन केले.
*या बंदी बांधवांनी बनवलेल्या गणेश मूर्ती समाजातील विविध मान्यवरांनी खरेदी करून या मंडळींच्या वेगळ्या आयुष्याची सुरुवात करावी असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले*.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुरुंग अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी केले. शिक्षक श्री नामदेव शिंदे गुरुजी यांनी आभार प्रदर्शन केले.
Comments
Post a Comment