इस्कॉन' तर्फे श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव पुण्यात रविवारी (दि. १९ जुलै) आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद


'इस्कॉन' तर्फे श्री श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव पुण्यात रविवारी (दि. १९ जुलै) 
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद

पुणे : जगन्नाथ पुरी येथे साज-या होणा-या रथयात्रा उत्सवाप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजित जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला रविवार, दिनांक १९ जुलै रोजी दुपारी १ वाजता टिळक रस्त्यावरील स.प.महाविद्यालय येथून प्रारंभ होणार आहे. ओडिसामधील जगन्नाथ पुरी येथे रथयात्रा मोठया उत्साहात साजरी होते. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये रथयात्रा होणार आहे. रथयात्रेच्या दिवशी इस्कॉन कात्रज-कोंढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांना खास दर्शनासाठी रथावर आणले जाते, अशी माहिती इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला इस्कॉन मंदिराचे जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस, स्वागत प्रमुख राधिका विनोद प्रभू, सौम्य निताई प्रभू, अ‍ॅड. अभिजित साकुरकर, सहस्र तीर्थ प्रभू, अमर सोनवणे आणि भक्त सेवा प्रभू असे भक्तगण उपस्थित होते.
 
रथयात्रेचे उद्घाटन इस्कॉन संस्थेचे संन्यासी प.पू. लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर यांच्यासह पुणे शहरातील सर्व आमदार, नगरसेवक, पुणे महापालिकेतील पदाधिकारी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दुपारी १२ वाजता स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे, असे मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले यांनी सांगितले.
 
मान्यवरांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती झाल्यानंतर १ वाजता रथयात्रेला प्रारंभ होईल. स.प.महाविद्यालय, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, शगुन चौक, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे स.प.महाविद्यालय येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे. ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत मोठया उत्साहात होणार असून यामध्ये अनेक संन्यासी व महापुरुष सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता आरती, दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रथयात्रेतील रथाची उंची २० फूट इतकी असून फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी रथावर सजावट केली जाणार आहे. हा रथ इस्कॉनचे पदाधिकारी आणि सर्व भाविक ओढणार आहेत.

समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. जवळपास २० हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोपानंतर होणार आहे. रथयात्रा मार्गावर १ लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात येणार आहेत.
रथयात्रेचे समन्वयक श्रीमान अनंतगोप प्रभू म्हणाले, भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा लोकांना दर्शन, आशीर्वाद आणि कृपा देण्यासाठी रस्त्यावर येतात. जगन्नाथ पुरी येथे शतकानुशतके ही रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे लाखो लोक जमतात. परंतु जगन्नाथ पुरी येथे प्रत्येकजण वैयक्तिकरित्या जाऊ शकत नाही. त्यामुळे इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली.

पुण्यातील रथयात्रेमध्ये २० हजार भक्त सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल आणि ओरिसा प्रांतातील पारंपरिक वाद्याच्या गजरात हरे कृष्ण महामंत्राच्या घोषात जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा असा जयघोष करीत रथयात्रा मार्गस्थ होणार आहे. रथयात्रेमध्ये कारंजे आणि हाइड्रॉलिक हत्ती हे विशेष आकर्षण आहे, असे पुजारी कौस्तुभ प्रभू आणि रूप गोस्वामी प्रभू यांनी सांगितले. रथयात्रा ही विश्व शांती आणि भक्तीचा समन्वय आहे. जगाचे स्वामी जगन्नाथ हे मंदिरातून भक्तांना दर्शन देण्यासाठी रस्त्यावर येतात. सर्व नागरिकांनी भगवंतांच्या दिव्य रथयात्रेत सहभागी होऊन त्यांची कृपा प्राप्त करावी, असे आवाहन इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांनी केले आहे. 

इस्कॉन संस्थेचे पुण्यात कात्रज कोंढवा रस्ता, कँप आणि निगडी येथे मंदिरे आहेत. पुणे शरातील रथयात्रेचे हे १० वे वर्ष आहे. या बरोबरच मंदिरातर्फे विमान नगर, उंडरी, कोथरूड, खराडी, बावधन, विशालनगर, धायरी, शिरूर, शिरवळ, भोर, दौंड आदी ठिकाणी अशाच प्रकारच्या भव्य रथयात्रा पुढील आठवड्यात आयोजित केल्या जाणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न