एफएचएस होलिस्टिको रनचे ९ ऑगस्ट रोजी आयोजनहोलिस्टिको लाईफस्टाईलतर्फे अर्धमॅरेथॉनसह इतर धावण्याच्या शर्यतीही

एफएचएस होलिस्टिको रनचे ९ ऑगस्ट रोजी आयोजन

होलिस्टिको लाईफस्टाईलतर्फे अर्धमॅरेथॉनसह इतर धावण्याच्या शर्यतीही

पुणे, २० जुलै २०२६ : फिटनेस प्रेमी, हौशी धावपटू आणि व्यावसायिक ॲथलीट्ससाठी होलिस्टिको लाईफस्टाईलतर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी एफएचएस होलिस्टिको रनचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीचा हा तिसरा मोसम आहे. हडपसरच्या एफएच सर्कल, बी.एस.तुपे रोड येथे ही स्पर्धा येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा पूना जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून, याचे व्यवस्थापन एसपीजे स्पोर्ट्स क्लब अँड अकादमीतर्फे केले जात आहे.

या स्पर्धेबद्दल बोलताना पूना जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे माजी अध्यक्ष, पूना इंटरनॅशनल मॅरेथॉनचे संस्थापक सदस्य आणि होलिस्टिको ग्रुपचे अध्यक्ष दिलीप आबा तुपे म्हणाले, एफएचएस होलिस्टिको रन ही केवळ एक धावण्याची स्पर्धा नसून तो तंदुरुस्ती, आरोग्य आणि सामुदायिक भावनेचा उत्सव आहे. प्रत्येक मोसमात आम्ही सहभागींना व्यावसायिकरित्या व्यवस्थापित शर्यतीचा अनुभव देण्याचा आणि सर्व वयोगटातील लोकांना सक्रिय जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. नवोदित किंवा अनुभवी धावपटूंसाठी असलेली ही शर्यत चार वेगवेगळ्या गटांत होणार आहे. आम्हाला खात्री आहे की तिस-या मोसमात महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील स्पर्धकही मोठ्या संख्येने सहभागी होतील. पुणे येथील या रोमांचक आणि संस्मरणीय शर्यतीच्या दिवशी प्रत्येक स्पर्धकाचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. यावेळी पत्रकार परिषदेत डॉ. प्रकाश कदम, पीडीएएचे सचिव राजू कुलकर्णी, इंद्रजीत तुपे, प्रवीण बोडके, अनिल वर्मा आणि बाजीराव कारखिले आदी मान्यवर उपस्थित होते. 

होलिस्टिको ग्रुपचे सीएचआरओ डॉ. प्रकाश कदम म्हणाले, या वर्षीच्या रनची मध्यवर्ती संकल्पना ताणतणावापासून मुक्ती अशी आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि संतुलित जीवनशैलीसाठी शारीरिक हालचालींचे महत्त्व या संकल्पनेद्वारे अधोरेखित करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजकांचा उद्देश सर्व वयोगटातील लोकांना ताणतणाव कमी करण्यासाठी, तंदुरुस्ती सुधारण्यासाठी आणि एक निरोगी समाज निर्माण करण्यासाठी धावण्याचा सोपा, पण प्रभावी मार्ग स्वीकारण्यास प्रेरित करणे हा आहे, असेही डॉ. कदम म्हणाले. 

स्पर्धा समन्वयक संदीप जोशी म्हणाले की, ही स्पर्धा २१ किमी (अर्ध मॅरेथॉन), १० किमी, ५ किमी आणि ३ किमी अशा गटांमध्ये होणार आहे. प्रत्येक नोंदणीकृत स्पर्धकाला टी-शर्ट, कॅप, गुडी बॅग, पदक, अल्पोपहार, हायड्रेशन सपोर्ट, वैद्यकीय मदत, रूटवरील मनोरंजन आणि पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. १० किमी टाइम्ड रन आणि २१ किमी अर्ध मॅरेथॉनमधील सहभागींना इलेक्ट्रॉनिक टाइमिंग चिप, अधिकृत ई-सर्टिफिकेटदेखील मिळेल आणि ते खुला पुरुष गट आणि खुला महिला गट प्रकारातील रोख पुरस्कारांसाठी पात्र असतील.

या स्पर्धेसाठी एकूण एक लाख ५२ हजार रुपयांची रोख बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. २१ किमी पुरुष आणि महिला गटातील विजेत्याला करंडक आणि २१ हजार रुपये, तर उपविजेत्याला करंडक आणि १५ हजार रुपये मिळतील. तिस-या क्रमांकावरील स्पर्धकाला दहा हजार रुपये देण्यात येणार आहे. १० किमी गटातील पुरुष व महिला विजेत्याला करंडक आणि १५ हजार रुपये, तर उपविजेत्याला करंडक आणि दहा हजार रुपये मिळतील. तिस-या क्रमांकावरील धावपटूला पाच हजार रुपये दिले जाणार आहेत. रोख पुरस्कार केवळ खुल्या गटातील पुरुष व महिला विजेत्यांनाच दिले जाणार आहे.

३ किमी आणि ५ किमीच्या स्पर्धा या बिगर-स्पर्धात्मक 'फन रन्स' आहेत आणि त्या सर्व वयोगटातील सहभागींसाठी खुल्या आहेत. १० किमी टाइम्ड रनसाठी नोंदणी करणाऱ्या धावपटूंचे वय स्पर्धेच्या दिवशी किमान १६ वर्षे असणे आवश्यक आहे, तर २१ किमी अर्ध मॅरेथॉनमधील सहभागींचे वय स्पर्धेच्या दिवशी १८ वर्षे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

होलिस्टिको ग्रुपचे प्रशासकीय प्रमुख बाजीराव कारखिले म्हणाले, धावण्याच्या माध्यमातून सर्व वयोगटातील लोकांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहित करणे हा मुख्य उद्देश आहे, तसेच सामाजिक सहभाग आणि सर्वांगीण आरोग्याला चालना देणे हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

एफएचएस होलिस्टिको रन २०२६ चे सह-प्रायोजक आहुरा बिल्डर्स, एबी आर्किटेक्ट, ए डिझाइन स्टुडिओ, बीएसएन कन्स्ट्रक्शन्स, कॅरामेला, जीएम आर्किटेक्ट, इनोव्हेन इन्फ्राकॉन, एसबी ॲलुफॉर्म, नोबल हॉस्पिटल (वैद्यकीय भागीदार), इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (वैद्यकीय भागीदार), ड्रोन मीडिया (मीडिया भागीदार) हे आहेत. पूना जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे माजी अध्यक्ष, पूना इंटरनॅशनल मॅरेथॉनचे संस्थापक सदस्य आणि होलिस्टिको ग्रुपचे अध्यक्ष दिलीप आबा तुपे यांनी ताणतणावमुक्त समाज घडवण्यासाठी या मॅरेथॉनचा पाया रचला.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नावनोंदणीसाठी https://jointhevent.com/events/fhs-holystico-run-2026-l34353 या संकेत स्थळावर भेट द्यावी. 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न