केशव माधव विश्वस्त निधीतर्फे गुणवंत विद्यार्थांचा शैक्षणिक साहित्य,रोख बक्षिसे,प्रमाणपत्र व पुस्तके देऊन गुणगौरव.---- सत्कारार्थी विद्यार्थांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य.
केशव माधव विश्वस्त निधीतर्फे गुणवंत विद्यार्थांचा शैक्षणिक साहित्य,रोख बक्षिसे,प्रमाणपत्र व पुस्तके देऊन गुणगौरव.
---- सत्कारार्थी विद्यार्थांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य.
----"विद्यार्थी दशेत मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी झपाटून परिश्रम करावे"
----भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापक हरिभाऊ गोखले ह्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार प्रसंगी सल्ला.
पुणे ( प्रतिनिधी )
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ४० गुणवंत विद्यार्थांचा सत्कार,गुणगौरव व रोख बक्षिसे वितरण कार्यक्रम "केशव माधव विश्वस्त निधी" तर्फे एरंडवणे येथील छत्रे सभागृहामध्ये संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक व "ज्ञानदा प्रतिष्ठान"चे अध्यक्ष उदयन पाठक हे होते.ह्याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती संभाजी भागाचे भागसंघचालक अनिल व्यास यांची मुख्य उपस्थिती होती.
"समाजात आर्थिक मदत करण्याची भावना असणारे अनेक हात आहेत पण ही मदत योग्य व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असते.विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील "केशव माधव विश्वस्त निधी" ही संस्था गेले अनेक वर्षे सामाजिक बांधिलकीच्या भावनेने हे प्रशंसनीय कार्य करीत आहे.विद्यार्थांनी आपले शालेय जीवनात उच्च ध्येय अंगी बाळगावे त्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता असल्याचे पदार्थविज्ञान चे अभ्यासक व मार्गदर्शक हरिभाऊ धोंडो गोखले यांनी प्रतिपादन केले.केशव माधव विश्वस्त निधीद्वारा आयोजित यंदाच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते ते पुढे म्हणाले की "विद्यार्थादशेत मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी झपाटून परिश्रम करावे,अपयशाला घाबरून जाऊ नये,शिक्षणाच्या जोरावर स्वतःबरोबर समाजाचे भविष्य घडवावे.आपल्या आईवडिलांना अभिमान वाटेल असे आपल्या जीवनात कार्य करावे.उत्तम आरोग्या बरोबर विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून ज्ञान मिळवावे.शैक्षणिक वारसा नसतांना,आर्थिक पाठबळ नसतांनाही शालांत परीक्षेत तुम्ही एवढे यश मिळविले त्यामुळे तुम्ही सर्व अभिनंदनास पात्र आहात"
अध्यक्षीय भाषणात उदयन पाठक म्हणाले,"विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर चांगले संस्कार झाले पाहिजे,उत्तम नागरिक झाले पाहिजे,नैतिक मूल्ये,शिस्त,आई वडिलांप्रती आदर,सामाजिक जबाबदारी आणि आपल्या जीवनात चांगल्या सवयी विकसित केल्या पाहिजे"
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख पाहुणे हरिभाऊ गोखले यांचे प्रकाश देशपांडे ह्यांनी,उदयन पाठक यांचे स्वागत कविता शेंडे ह्यांनी तर अनिल व्यास यांचे अरविंद देशपांडे ह्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.केशव माधव संस्थेच्या विविध उपक्रमाविषयी व सेवा कार्याची सचिव अरविंद देशपांडे यांनी माहिती दिली.दरवर्षी दहावी,बारावी मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार आयोजित करीत असल्याचे यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र,प्रोत्साहनपर रोख बक्षिसे,शैक्षणिक साहित्य,सेवा सहयोगतर्फे स्कूल किट,प्रवीण दवणे लिखित "जिद्दीची गुरुकिल्ली"व स्वर्णलता भिशीकर लिखित "उजळती वाट" ही प्रेरणादायी पुस्तके देऊन चाळीस विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यात कर्वेनगरातील ज्ञानदा प्रशाला,ग.रा.पालकर,सरस्वती विद्या मंदिर मधील दहावी मध्ये प्रथम दोन आलेले मुले,मुलींचा समावेश आहे.
खुशी लाळे ह्या विद्यार्थिनीने घरच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बारावी मध्ये ९३ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होऊन गोखले इन्स्टिट्यूट मध्ये अर्थशास्त्र विषयामध्ये उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे त्यासाठी केशव माधव संस्थेने तिला तेथे प्रवेश घेण्यासाठी आर्थिक मदत केली व तिचा विशेष गौरव करण्यात आला.
याप्रसंगी वस्तीतील मुलांना संस्कार वर्ग घेऊन मार्गदर्शन करणारे प्रकाश बापट यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यविकास आधारित पुढील शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमाची माहिती दिली.तसेच दहावी व बारावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती विषयीची माहिती दिली.
विद्यार्थांच्या वतीने खुशी लाळे,अंजुम सय्यद ह्यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी "केशव माधव"चे अध्यक्ष रवींद्र जावळेकर,सचिव अरविंद देशपांडे, विश्वस्त कविता शेंडे,अमोल जोशी,योगेश देशपांडे,योगेश कुलकर्णी,प्रकाश देशपांडे,संजय वळसंगकर,प्रशांत कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विद्यार्थी,शिक्षक,पालक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment