आषाढी वारी पालखी सोहळ्यात 'दगडूशेठ' गणपती ट्रस्ट तर्फे लाखो वारकऱ्यांची आरोग्यसेवा
आषाढी वारी पालखी सोहळ्यात 'दगडूशेठ' गणपती ट्रस्ट तर्फे लाखो वारकऱ्यांची आरोग्यसेवा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा पुढाकार ; उपक्रमाचे ३७ वे वर्ष ; तीन पालख्यांसोबत सुसज्ज रुग्णवाहिका, डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेची विनामूल्य सोय
पुणे : ज्ञानोबा माऊली, तुकाराम... च्या गजरात कित्येक मैल पायी प्रवास करत विठ्ठल रखुमाईच्या भेटीच्या ओढीने जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची आरोग्यसेवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट च्यावतीने करण्यात आली. आषाढी वारीमध्ये संपूर्ण पायी प्रवासात तसेच प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्यसेवा, मोफत औषध वाटप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज,जगद््गुरु तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारक-यांच्या सेवेकरीता तीन सुसज्ज रुग्णवाहिका श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने पालख्यांसोबत पुण्यातून रवाना झाल्या होत्या. याशिवाय वारक-यांच्या सेवेत पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील पाठविण्यात आले होते. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असून मोठया प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येत आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी यांसह मंडळाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जातो. उपक्रमाचे यंदा ३७ वे वर्ष आहे.
डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे म्हणाले, कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणा-या वारक-यांच्या आरोग्याची काळजी घेत, आवश्यक आरोग्यविषयक सेवा त्वरीत मिळाव्यात, याकरीता या उपक्रमाचे आयोजन केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोहळ्यात सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, फलटण, तरडगाव, माळशिरस, वाखरी येथे, संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोहळ्यात लोणी काळभोर, यवत, बारामती, बेलवाडी, इंदापूर, अकलूज, वाखरी येथे आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यात सोमेश्वरनगर, बारामती, लासुर्णे, अकलूज, भंडी शेगांव, वाखरी आदी ठिकाणी आरोग्यसेवा देण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सहयोगी वैद्यकीय संस्थांतर्फे पालखी सोहळा ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास असतो, तेथे फिरता दवाखाना देखील चालविला गेला. यामध्ये त्वचा रोग, कान नाक घसा, नेत्र तपासणी, रक्तदाब, शर्करा तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या होता. या सेवेचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतला.
Comments
Post a Comment