एआयशी मैत्र आणि यंत्रासोबत संवादी असणे काळाची गरज विविध दैनिकांच्या संपादकांचे प्रतिपादन ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलती पत्रकारिता’ विषयावर परिसंवाद


एआयशी मैत्र आणि यंत्रासोबत संवादी असणे काळाची गरज

 

विविध दैनिकांच्या संपादकांचे प्रतिपादन

 

‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलती पत्रकारिता’ विषयावर परिसंवाद

 

पुणे : दैनिकांच्या न्यूजरूममध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तो वाढत जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, सकस आशयनिर्मितीसह बातमीदारीचा मानवी चेहेरा अबाधित ठेवून, यंत्रासोबतचे संवादी असणे, एआयला फक्त टूल न मानता, त्याला मित्र करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पुण्यातील विविध दैनिकांच्या संपादकांनी मंगळवारी येथे केले. ‘एआयच्या वाढत्या वापरामुळे रोजगारांमध्ये संख्यात्मक फरक जरूर पडेल, पण नव्या पद्धतीचे, नवी कौशल्ये आवश्यक असणारे रोजगार निर्माण होत राहतील’, असेही त्यांनी सांगितले. 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग, पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठान, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित कार्यशाळेत पुण्यातील विविध दैनिकांच्या संपादकांचा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलती पत्रकारिता’ या विषयावर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आज (दि. २८) परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी आणि लोकसत्ताचे निवासी संपादक सिद्धार्थ केळकर यांचा परिसंवादात सहभाग होता. सहायक प्राध्यापक योगेश बोराटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

 

श्रीधर लोणी म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दैनिकाच्या कार्यालयात सुरू झालेला आहे. तो सरसकट नसला तरी संपादनात साह्य करणे, मुद्रितशोधन, ग्राफिक्स, विविध रिपोर्ट्स, सर्वेक्षणांचे निष्कर्ष, मुलाखतींचे संकलन, संग्रहित माहितीची पुनर्रचना अशा अनेक ठिकाणी एआय वापरले जाते. एआय प्रचंड वेगाने काम करतो, कामाचे ओझे हलके करतो, स्वतःमध्ये सुधारणा करत अधिक चांगले काम करतो, हे फायदे आहेत. अर्थात आशयनिर्मिती, नाविन्य, शैली, प्रयोगशीलता, वाचकांशी बांधीलकी, त्यांचा होल्डिंग पिरीयड वाढविण्याचे प्रयत्न, फॅक्ट चेकिंग, नवा वाचक जोडण्यासाठी त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे असे अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत.

 

सम्राट फडणीस यांनी वृत्तपत्रीय कामाचे अनेक घटक ऑटोमेशन मोडवर गेल्याची वस्तुस्थिती समोर आणली. संस्थेचे प्रचंड मोठे संदर्भ ग्रंथालय ऑटो मोडवर गेल्याचे अनेक फायदे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. प्रचंड प्रमाणातील माहितीचा साठा अचूकता व नेमकेपणा आणण्यासाठी, अंतर्गत पातळीवर ट्रेनिंग माडेल विकसित केली, त्यांना नव्या डाटाही पुरवला. त्यांनी काढलेले निष्कर्ष ९५ टक्के इतके अचूक ठरल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ग्राऊंड रिपोर्टिंगमध्येही एआयचा वापर कसा करता येईल, ड्रोन रिपोर्टिंगची वाटचाल कशी असेल, याचीही माहिती त्यांनी दिली. आजवर आपण यंत्राला आदेश किंवा आज्ञा देत होतो, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आपल्याला कमांडरची भूमिका बदलावी लागेल आणि ‘कम्यूनिकेशन वुईथ द मशीन’ हा मंत्र जपावा लागेल. यंत्रासोबत आपण जितके संवादी राहू, तितके काळासोबत राहू, असे ते म्हणाले.

 

सिद्धार्थ केळकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व मान्य करूनही बातमीदारीमधील मानवी चेहेरा कायम ठेवण्याची गरज अधोरेखित केली. तोचतोचपणाला नकार, जे वापरत आहोत, त्याचे सातत्याने परीक्षण, मूल्यांकन, विश्लेषणाच्या गाळण्या, एआय हा आपला मालक नसून, तो आपला सहकारी आहे, हे जाणून वापर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

 

Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न