एनएलसी भारताच्या नेतृत्वात एनसीएसएल लेजिस्लेटिव्ह समिट २०२६ मध्ये भारतीय आमदारांचे प्रतिनिधीमंडळ सहभागीजागतिक विधायी क्षमता विकासाला मिळेल नवी दिशा
एनएलसी भारताच्या नेतृत्वात
एनसीएसएल लेजिस्लेटिव्ह समिट २०२६ मध्ये भारतीय आमदारांचे प्रतिनिधीमंडळ सहभागी
जागतिक विधायी क्षमता विकासाला मिळेल नवी दिशा
*पुणे, २९ जुलै:नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत (एनएलसी भारत) च्या इंटरनॅशनल कॅपॅसिटी एन्हान्समेंट प्रोग्राम (ICEP) अंतर्गत अमेरिकेतील शिकागो येथील मॅकॉर्मिक प्लेस येथे आयोजित ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स (NCSL) लेजिस्लेटिव्ह समिट २०२६’ मध्ये भारतीय विधिमंडळ सदस्यांच्या प्रतिनिधीमंडळाने यशस्वी सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचे नेतृत्व एनएलसी भारताचे संस्थापक डॉ. राहुल व्ही. कराड यांनी केले.
लोकशाही संस्थांना अधिक सक्षम बनविणे, ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे आणि लोकप्रतिनिधींची विधायी क्षमता वृद्धिंगत करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय संवाद, शैक्षणिक सहभाग आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम प्रशासन पद्धतींचा अभ्यास यांच्या माध्यमातून भारतीय लोकप्रतिनिधींना आधुनिक शासनव्यवस्थेतील बदलत्या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यावर्षीच्या प्रतिनिधीमंडळात देशातील १४ राज्यांतील ३४ आमदारांचा समावेश होता. हे आमदार विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात.
या समिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शासन, डिजिटल लोकशाही, सायबर सुरक्षा, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास, विधायी नवकल्पना, सार्वजनिक धोरण, वित्तीय प्रशासन आणि नागरिकांचा सहभाग* अशा विविध समकालीन विषयांवरील सत्रांमध्ये प्रतिनिधींनी सहभाग घेतला. तसेच जगभरातील लोकप्रतिनिधी, धोरणतज्ज्ञ, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांशी संवाद साधून अनुभवांची देवाणघेवाण केली.
प्रतिनिधीमंडळाने *युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी*लाही भेट दिली. येथे पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती, सार्वजनिक नेतृत्व, प्रशासनातील नवकल्पना आणि समकालीन धोरणात्मक आव्हानांबाबत सखोल माहिती घेण्यात आली. या संवादातून विधायी प्रक्रिया, धोरण रचना तसेच संशोधन आणि माहितीच्या प्रभावी वापराबाबत विधायक विचारांची देवाणघेवाण झाली.
तंत्रज्ञानाधिष्ठित आणि वेगाने बदलणाऱ्या जागतिक प्रशासन व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर, एनएलसी भारत शिक्षण, सहकार्य आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतीय लोकप्रतिनिधींना भविष्यातील धोरणात्मक आव्हानांचा समर्थपणे सामना करता यावा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मूल्यांशी त्यांची नाळ अधिक दृढ राहावी, यासाठी डॉ. राहुल कराड सातत्याने कार्यरत आहेत.
चौकट
डॉ. राहुल व्ही. कराड म्हणाले: "लोकशाही तेव्हाच अधिक सक्षम होते जेव्हा लोकप्रतिनिधी आजीवन शिकण्याची वृत्ती जपतात. इंटरनॅशनल कॅपॅसिटी एन्हान्समेंट प्रोग्रामद्वारे भारतीय लोकप्रतिनिधींना जागतिक विचारप्रवाह, नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धती आणि उत्कृष्ट संस्थात्मक अनुभवांचा परिचय करून दिला जातो. यामागचा उद्देश केवळ आंतरराष्ट्रीय अनुभव देणे नसून, प्रभावी धोरणनिर्मिती आणि उत्तम प्रशासनाद्वारे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे अर्थपूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे आहे. यातून आपल्या लोकशाही मूल्यांवरील आत्मविश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल."
शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रतिनिधीमंडळाने शिकागो येथील *फुलर्टन हॉल*ला भेट दिली. याच ठिकाणी १८९३ मध्ये स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म संसदेत आपले ऐतिहासिक भाषण दिले होते. ही भेट भारताच्या सार्वभौम बंधुभाव, शांतता आणि संवादाच्या शाश्वत संदेशाची प्रेरणादायी आठवण ठरली.
Comments
Post a Comment