केएमपी एस्पायर एफसीची डीएफए रायसेनविरुद्ध ४-४ अशी बरोबरी - एआयएफएफ महिला युवा लीग
केएमपी एस्पायर एफसीची डीएफए रायसेनविरुद्ध ४-४ अशी बरोबरी
- एआयएफएफ महिला युवा लीग
पुणे, २6 जुलै: एआयएफएफ महिला युवा लीगमधील (१७ वर्षांखालील) गटवार साखळीतील (अ गट) दुसऱ्या सामन्यात केएमपी एस्पायर एफसीने डीएफए रायसेनविरुद्ध जिद्द आणि आक्रमक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. सामन्याच्या अंतिम टप्प्यात संघातील एका खेळाडूला बाहेर जावे लागले तरी १० खेळाडूंसह ४-४ अशी बरोबरी साधली.
डीएफए रायसेनने प्रतिस्पर्धी संघाच्या चुकांचा फायदा उठवत सुरुवातीला २-० अशी आघाडी घेतली. लक्ष्मी कुमारीने (१२ व्या मिनिटाला) क्रॉसद्वारे गोल खाते उघडले. त्यानंतर १५ व्या मिनिटाला केएमपी एस्पायर एफसीच्या बचावपटूंमधील समन्वयाच्या अभावामुळे त्यांना आणखी एक गोल मिळाला. केएमपी एस्पायर एफसीने २५ व्या मिनिटाला शानदार प्रत्युत्तर दिले. याइफाबी थोकचोम हिच्या अचूक क्रॉसवर थौडम मालेमंगनबी देवी हिने चेंडूवर नियंत्रण मिळवत डीएफए रायसेनच्या बचावफळीला चकवून डाव्या कोपऱ्यातून गोल नोंदवला.
केएमपीचा संघ लय पकडत असतानाच, एका लांबच्या 'क्लियरन्स'मुळे डीएफए रायसेनला पुन्हा आघाडी मिळाली आणि मध्यंतरापर्यंत ती कायम राहिली.
दुसऱ्या सत्रात केएमपी एस्पायर एफसीने वर्चस्व गाजवत उत्कृष्ट पुनरागमन केले. ५४ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी बचावपटूने चेंडू दूर करण्याचा (क्लियरन्स) प्रयत्न केला, परंतु, तो तिच्या पायाला लागून गोलरक्षकाच्या डोक्यावरून स्वतःच्याच गोलपोस्टमध्ये (स्वयंगोल) गेला. त्याचा फायदा केएमपी एस्पायरला झाला. चार मिनिटांनंतर, सयानी चक्रवर्ती हिने हवेतून आलेल्या एका सुंदर पासवर (चिप थ्रू-बॉल) सुरेख गोल केला. ६५ व्या मिनिटाला इपशिता गवारी हिने अत्यंत कठीण कोनातून (टाइट अँगल) चपळाईने गोल करत केएमपी एस्पायर एफसीला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली.
७६ व्या मिनिटाला सामन्याने पुन्हा एक नाट्यमय वळण घेतले. प्रमुख खेळाडू थौडम मालेमंगनबी देवी हिला दुसऱ्यांदा यलो कार्ड दाखवले गेल्याने तिला मैदान मैदानाबाहेर जावे लागले. केएमपी एस्पायर एफसीला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला. याचा फायदा घेत ८१ व्या मिनिटाला कॉर्नर किकवर कुमारी कोमल हिने हेडरद्वारे गोल केला आणि सामना ४-४ असा बरोबरीत आणला.
आघाडी गमावल्यामुळे झालेली निराशा असूनही केएमपी एस्पायर एफसीने कठीण परिस्थितीतही विलक्षण जिद्द, लढाऊ वृत्ती आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी एक महत्त्वपूर्ण गुण मिळवला. दोन सामन्यांनंतरही अपराजित राहताना त्यांनी दमदार आगेकूच केली आहे.
Comments
Post a Comment