सीआयआय ग्रीनप्रो समिट 2026 चे उद्घाटन · कार्बन न्युट्रालिटी साध्य करण्यासाठी भारतामध्ये प्रचंड कार्यक्षमता





सीआयआय ग्रीनप्रो समिट 2026 चे उद्घाटन
 · कार्बन न्युट्रालिटी साध्य करण्यासाठी भारतामध्ये प्रचंड कार्यक्षमता

पुणे,30 जुलै 2026 : जगभरातील उद्योग शाश्वततेच्या दिशेने वाटचाल करत असताना कार्बन न्युट्रल उत्पादने जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठरतील.कार्बन न्युट्रालिटीच्या बाबतीत भारतामध्ये प्रचंड कार्यक्षमता आहे,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.
 
द कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) पुणे तर्फे हॉटेल वेस्टीन येथे ९व्या ग्रीनप्रो समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. मुल्यसाखळीतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित उत्पादनांचे योगदान ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र सरकारच्या राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.दीपक म्हैसेकर, ग्रीन प्रॉडक्टस ॲन्ड सर्व्हिसेस कौन्सिलचे अध्यक्ष व वॉल्वो ग्रुप इंडिया प्रा.लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमल बाली, सीआयआय पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष व के.के.नाग प्रा.लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मिलन नाग, आयजीबीसी, ग्रीनप्रो आणि सीआयआय सीआयईएसचे कार्यकारी संचालक एस.कार्तिकेयन, व्हीकेई एनव्हायर्नमेंटलचे संचालक डॉ.पूर्वा केसकर , ग्लोबल इकोलेबलिंग नेटवर्कचे अध्यक्ष व सीआयआय जीबीसीचे कार्यकारी संचालक के.एस.वेंकटगिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
याप्रसंगी ग्रीनप्रो कोल्हापूर फाऊंड्री क्लस्टर रिपोर्टचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर ओईएमसाठी हरित पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये नेतृत्व दर्शवत उल्लेखनीय योगदानासाठी टीव्हीएस मोटर कंपनी तसेच पुरवठा साखळीमध्ये ग्रीन चॅम्पियन्स म्हणून ब्रेक्स इंडिया प्रा.लि.फाऊंड्री डिव्हीजन आणि ल्युमॅक्स इंडस्ट्रीज लि.चा गौरव करण्यात आला.

आपले बीजभाषण करताना महाराष्ट्र सरकारच्या राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले की,विकास आणि शाश्वतता हे एकत्रितपणे पुढे जायला हवे.एक राष्ट्र व जागतिक समुदाय म्हणूनही आपण विकास थांबवू शकत नाही,तो जबाबदारीने आणि शाश्वतपणे साधला जाईल याची आपण खात्री केली पाहिजे.आपल्या शाश्वततेच्या प्रवासामध्ये लक्षणीयरित्या सुधारणा झाल्या आहेत.वृक्षारोपण सारख्या उपक्रमांपासून ते कार्बन ट्रेडिंग ते उत्पादनाच्या जीवनचक्र आधारित पर्यावरण व्यवस्थापनासारख्या आधुनिक उपक्रमांपर्यंत पोहचलो आहोत. कार्बन न्युट्रालिटीच्या बाबतीत भारतामध्ये प्रचंड कार्यक्षमता आहे.हे साध्य करण्यासाठी अनेक मार्ग असून उर्जा कार्यक्षमता हा सर्वांत प्रभावी मार्गांपैकी एक आहे.उद्योग नाविन्यपूर्ण उत्पादने आणत असताना अधिकाधिक उत्पादने कार्बन न्युट्रल होत जातील आणि आपण केवळ आर्थिक दृष्टीकोनातून ते कार्बन सजग अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करू.
 
ग्रीन प्रॉडक्टस ॲन्ड सर्व्हिसेस कौन्सिलचे अध्यक्ष व वॉल्वो ग्रुप इंडिया प्रा.लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कमल बाली म्हणाले की, सध्याचे जग अनेक परिवर्तनशील बदलांचे साक्षीदार आहे आणि त्यापैकी सर्र्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पर्यावरणीय व परिसंस्थेविषयी होत असलेले परिवर्तन. आज आपण जी उत्पादने तयार करतो,जे तंत्रज्ञान स्विकारतो आणि जी भागीदारी विकसित करतो,त्यातूनच भविष्यातील उद्योगांची स्पर्धात्मकता आणि लवचिकता निश्चित होणार आहे.आशादायक बाब म्हणजे जगातील सर्वांसाठीच या प्रवासाची सुरूवात एकाच टप्प्यावरून सुरू होत आहे,मात्र जे देश अधिक वेगाने आणि कटिबध्दतेने पुढे जातील,तेच देश नेतृत्व करतील.
 
ग्लोबल इकोलेबलिंग नेटवर्कचे अध्यक्ष व सीआयआय जीबीसीचे कार्यकारी संचालक के.एस.वेंकटगिरी म्हणाले की,शाश्वतता ही केवळ एक अनुपालनाची आवश्यकता न राहता,वेगाने एक निर्णायक गरज बनत आहे. ग्राहक, गुंतवणूकदार आणि जागतिक पुरवठा साखळ्या अधिकाधिक हरित उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करत असून अधिक पारदर्शकतेची वाटचाल करत आहेत.भारतीय उत्पादकांना जागतिक स्तरावर अग्रणी म्हणून स्वत:ला स्थापित करण्याची प्रचंड संधी आहे.हरित मूल्य साखळ्या केवळ उत्सर्जन कमी करत नाहीत,तर अभिनवता ,लवचिकता आणि दीर्घकालीन व्यावसायिक वाढीला देखील चालना देतील.आज शाश्वतता स्विकारणाऱ्या उत्पादकांना मोठ्या जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळत आहे.


ग्रीनप्रो आणि सीआयआय सीआयईएसचे कार्यकारी संचालक एस.कार्तिकेयन म्हणाले की, जगभरात शाश्वततेचा प्रवास कमी कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने विकसित होत चालला आहे.हे परिवर्तन हवामानविषयक वचनबध्दता,जबाबदार खरेदी पध्दती,पुरवठा साखळीमध्ये डी-कार्बनायझेशन आणि कमी कार्बन उत्सर्जन करणारी उत्पादने व उपायांची वाढती मागणी यामुळे घडत आहे.ग्रीनप्रो ने आजवर ५४ उत्पादन श्रेणींमधील ८१० हून अधिक कंपन्यांच्या १५,८०० हून अधिक उत्पादनांना इको लेबल ने प्रमाणित केले आहे.यातून शाश्वत उत्पादनाप्रती भारतीय उद्योगांची वाढती वचनबध्दता दिसून येते.आजच्या काळात बाजारपेठा या पारदर्शकता आणि पर्यावरणीय कामगिरीला अधिकाधिक प्राधान्य देत आहेत.त्यामुळे आम्हाला खात्री आहे की,ग्रीनप्रो-प्रमाणित उत्पादनांचा स्वीकार वाढतच राहील.


Comments

Popular posts from this blog

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न