आम्ही पण लष्करात जाऊन देशसेवा करणार*... (आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलांनी व्यक्त केल्या भावना) . ७००० एकरचा भव्य विस्तार ,
*आम्ही पण लष्करात जाऊन देशसेवा करणार*... (आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलांनी व्यक्त केल्या भावना) . ७००० एकरचा भव्य विस्तार , नौदल वायुदल आणि भूदल या तिन्ही दलांचा एकत्रित संगम, चित्रपटात पाहिलेले विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन प्रत्यक्षात पाहण्याचा योग अश्वदळ, जहाज हे सर्व स्वप्नात पाहिलेले सत्य आज या चिमुकल्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात साकारले. याची सर्व माहिती देताना खाकी वर्दीच्या आत असलेल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय प्रेमाने हृदयपूर्वक साधलेला संवाद यामुळे अर्धापूर, जि. नांदेड येथील शेतकऱ्यांची मुले हरखून गेली होती. हे सर्व पाहून परत निघताना *भारत माता की जय* ही घोषणा देताना त्या सर्वांच्या डोळ्यात देशप्रेमाविषयीची तीव्र भावना आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले.
*आम्हाला वडील नाहीत तरीपण आम्ही खूप अभ्यास करू आणि सैन्यात भरती होऊन तुमच्यासारखीच देशसेवा करू* असे अभिवचन या मुलांनी एनडीए अधिकाऱ्यांना देताच हे अधिकारी सुद्धा गहिवरून गेले.
निमित्त होते भोई प्रतिष्ठान आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ, नांदेड यांच्या वतीने गेली १२ वर्षे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या *पुण्यजागर* या प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या एनडीए भेटीचे.
नांदेड ,अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले भोई फाउंडेशन आणि अर्धापूर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने शिक्षणासाठी गेली बारा वर्षे दत्तक घेण्यात आली आहेत. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ निमित्ताने या विद्यार्थ्यांची जगप्रसिद्ध असणाऱ्या लष्करी प्रशिक्षण संस्था- एन.डी.ए. पुणे येथे शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली होती.
भारताचे माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या संकल्पनेतून सुमारे सात हजार एकर मध्ये साकारलेल्या या भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या प्रशिक्षण केंद्र परिसरात हे विद्यार्थी अक्षरशः रमून गेले होते. देशासाठी लढणारे सैनिक तयार करण्यासाठी त्यांना भावनिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अतिशय सक्षम करण्यासाठी दिले जाणारे खडतर प्रशिक्षण, या गोष्टींची माहिती देणारी चित्रफीत सुद्धा या मुलांना दाखविण्यात आली. भारत पाक युद्धामध्ये आपल्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण जिंकलेला पाकिस्तानच्या झेंडा हा उलटा करून लावलेला पाहून तर विद्यार्थ्यांसोबतच सर्वांनीच आपल्या शूर योद्धांना चे स्मरण करून त्यांना मनोमन वंदन केले. एका वेळेस 2200 विद्यार्थी बसू शकतील एवढी प्रशस्त आणि अत्याधुनिक मेस पाहताना मात्र एके ठिकाणी एका टेबलवर जेवणाचे ताट आणि त्यासमोर तिरकी करून ठेवलेली मोकळी खुर्ची पाहून विद्यार्थ्यांचे कुतूहल जागे होताच याविषयी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की जे आपले जवान युद्धामध्ये बेपत्ता झाले आहेत त्यांची आठवण म्हणून रोज त्यांच्यासाठी इथे जेवणाचे ताट ठेवले जाते, त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. हे ऐकताच सर्वजण भावनाविवश झाले.
*या उपक्रमाचे संयोजक, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनाची भूमिका स्पष्ट करताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता, देशप्रेम आणि देशसेवा याविषयीच्या भावना वाढीस लागण्यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देऊन *सेवा परमो धर्म:*
( Service Above Self ) *हा मंत्र अक्षरश:जगणाऱ्या आपल्या सैन्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले*.
*दुर्गा क्षीरसागर आणि नियती इंगोले या विद्यार्थ्यांनी इथून निघताना अक्षरशः देशसेवेचे आणि देश प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या वास्तूला वंदन करून येथील पवित्र माती सोबत घेतली आणि आणि तिला मनोमन वंदन केले*.
*भाविक काशीला जाऊन गंगा घेऊन येतात पण आम्ही भारतमातेच्या या वास्तूची माती आठवण म्हणून सोबत घेऊन जात आहोत.एक दिवस आम्ही नक्की प्रवेश परीक्षा पास करून एनडीए मध्ये येऊ असा संकल्प या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी केला*.
भोई प्रतिष्ठानचे मार्गदर्शक (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले आणि एअर कमांडर ( निवृत्त) श्री आर एम श्रीधरन, ब्रिगेडियर (प्रशासन ), विनोद कुमार , लेफ्टनंट कर्नल दलजीत सिंग, भोई प्रतिष्ठानचे समन्वयक श्री हेमंत गोसावी, श्री विजय घाणेकर, श्री प्रमोद परदेशी, श्री मनोज चौधरी,श्री चंद्रकांत दोमा यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
Comments
Post a Comment