पर्यावरण रक्षणासाठी पुणेकरांनी एकत्र येण्याची गरज : ॲड. वंदना चव्हाणपर्यावरण दिनानिमित्त गंगोत्री होम्सतर्फे ‘१४ ट्रीज् फाऊंडेशन’ व ‘ग्राम ऊर्जा’ संस्थांना पुरस्कार
पर्यावरण रक्षणासाठी पुणेकरांनी एकत्र येण्याची गरज : ॲड. वंदना चव्हाण
पर्यावरण दिनानिमित्त गंगोत्री होम्सतर्फे ‘१४ ट्रीज् फाऊंडेशन’ व ‘ग्राम ऊर्जा’ संस्थांना पुरस्कार
पुणे : पुणे शहर देशाला दिशा दर्शविणारे आहे. पण पुण्याची सध्याची पर्यावरणीय स्थिती अत्यंत खराब आहे. राज्य शासनाने एफएसआयची जणू काही खैरात वाटली आहे. यातून मोठ्या प्रमाणात गृह निर्मिती होणार असली तरी शहराला लागणाऱ्या पायाभूत सुविधा कुठून निर्माण करणार हा मोठा प्रश्न आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये अद्याप पुणे नाही. पण नजिकच्या भविष्यकाळात प्रदूषित शहरांमध्ये पुण्याचा समावेश होऊ शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी, पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक असून शहरात सुशासनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी खासदार, पर्यावरण अभ्यासक ॲड. वंदना चव्हाण यांनी केले.
पर्यावरण संवर्धन, शाश्र्वत विकास आणि हरित जीवनशैलीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘१४ ट्रीज् फाऊंडेशन’ला गंगोत्री होम्स वायू पुरस्काराने तर गंगोत्री होम्स ऊर्जा पुरस्काराने ‘ग्राम ऊर्जा’ या संस्थेला सन्मानित करण्यात आले. ॲड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. गंगोत्री होम्सचे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे मंचावर होते. मानपत्र व रोख रक्कम रू. ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात ‘१४ ट्रीज् फाऊंडेशन’चे डॉ. प्रवीण भागवत, अनंत तायडे आणि ‘ग्राम ऊर्जा’चे अंशुमन लाठ, समीर नायर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या आवारातील म. ए. सो. सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुण्याच्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पुण्याचे नागरिक म्हणून आपण काय करू शकतो याचा विचार प्रत्येकाने करावा, अशी अपेक्षा व्यक्त करून ॲड. वंदना चव्हाण पुढे म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून पर्यावरणाचा अभ्यास असणाऱ्या अशासकीय संस्थांमधील तज्ज्ञ व्यक्ती असाव्यात अशी अपेक्षा असते. परंतु तसे होताना दिसत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्या पुढे म्हणाल्या, पुढील पिढीला निरोगी आयुष्य देण्यासाठी अक्षय उर्जा निर्मिती करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून प्रदूषण शोषून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. या करिता मुळापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रास्ताविकात गणेश जाधव यांनी गंगोत्री होम्सच्या पर्यावरणविषयक उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरण रक्षणासंदर्भात कृतिशील उपक्रम राबविणाऱ्या संस्थांची समाजाला माहिती व्हावी आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे राजेंद्र आवटे यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. प्रवीण भागवत म्हणाले, जागतिक तापमान वाढ हा विषय सरकारचा आहे, असे समजून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकाने केवळ १४ झाडे लावावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘१४ ट्रीज् फाऊंडेशन’ कशा पद्धतीने कार्य करते याविषयी त्यांनी अवगत केले.
अंशुमन लाठ म्हणाले, वीज आणि पाण्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकते याची जाणीव असल्यामुळे वीज आणि पाण्यासाठी कार्य सुरू करण्यात आले. ‘ग्राम ऊर्जा’ संस्थेने या दृष्टीने केलेल्या कार्याची फळे आज दिसू लागली आहेत.
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या युनिक फिचर्सच्या महा-अनुभव मासिकाचे प्रकाशक आनंद अवधनी, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या पुणे चॅप्टरच्या माजी अध्यक्षा आर्किटेक्ट डॉ. पूर्वा केसकर, ऑरेंज काऊंटी ग्रुपचे संचालक संदीप सोनिग्रा यांचा पुरस्कार निवड समितीत समावेश होता. त्यांचा ॲड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करणे आवश्यक : सुरेश प्रभू….
सुरेश प्रभू यांनी दृकश्राव्य माध्यमातून मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, उद्योग, सेवा आणि कृषी क्षेत्रासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे. परंतु पारंपरिक ऊर्जा मर्यादित स्वरूपात असल्यामुळे तिचा अतिवापर करणे योग्य नाही. या करिता अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करणे आवश्यक आहे. देश आर्थिक प्रगती करत असताना माणसाचे जीवनमान घसरत गेले तर या प्रगातीचा काहीच उपयोग होणार नाही. हे लक्षात घेऊन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जैववैविध्यता जपून ठेवत शाश्वत विकास करणे ही काळाची गरज आहे.
Comments
Post a Comment