फोर्स मोटर्सकडून भारतात २,००,००० वे मर्सिडीज-बेंझ इंजिन सादर
फोर्स मोटर्सकडून भारतात २,००,००० वे मर्सिडीज-बेंझ इंजिन सादर
भारत, १८ जून २०२६: फोर्स मोटर्स लिमिटेडने आज पुण्यातील चाकण येथील आपल्या अत्याधुनिक इंजिन निर्मिती प्लांटमधून २,००,००० वे इंजिनच्या रोल-आऊटची घोषणा केली. मर्सिडीज-बेंझसोबत त्यांच्या उत्पादन सहयोगातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
इंजिन निर्मितीच्या क्षेत्रात फोर्स मोटर्स आणि मर्सिडीज-बेंझ यांच्यातील सहयोग १९९७ पासून सुरू झाला आहे आणि आता त्याचे रूपांतर एका व्यापक भागीदारीत झाले आहे. यामध्ये भारतात तयार होणाऱ्या मर्सिडीज-बेंझच्या सर्व कार आणि एसयूव्हींसाठी इंजिन आणि अॅक्सल्स तयार करण्याचा समावेश आहे.
२,००,००० व्या इंजिनचे हे संपादन विश्वास, तांत्रिक उत्कृष्टता, सामायिक मूल्ये आणि भारतातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या परस्पर कटिबद्धतेवर आधारलेले नाते अधोरेखित करतो. फोर्स मोटर्सने उत्पादित केलेले हे विशेष २,००,००० वे ६-सिलिंडर एम२५६ इंजिन मर्सिडीज-बेंझ जीएलएस ४५० या मॉडेलमध्ये बसवण्यात आले आहे.
फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया आणि मर्सिडीज-बेंझ एजीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य समाविष्ट असलेल्या मर्सिडीज-बेंझच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक टप्पा साजरा करण्यात आला:
डॉ. जोर्ग बुर्झर, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी. चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, डेव्हलपमेंट अँड प्रोक्युरमेंट
श्री. मथायस गायसेन, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी. सेल्स अँड कस्टमर एक्स्पीरिअन्स
श्री. मायकेल शिबे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी. प्रॉडक्शन, क्वॉलटी अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट
या प्रसंगी दोन्ही कंपन्यांचे इतर मान्यवर आणि पाहुणे उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. संतोष अय्यर, मर्सिडीज-बेंझ इंडियाचे कार्यकारी संचालक आणि ऑपरेशन्स प्रमुख श्री. व्यंकटेश कुलकर्णी आणि फोर्स मोटर्स लिमिटेडचे ऑपरेशन्सचे कार्यकारी संचालक श्री. प्रशांत इनामदार यांचा समावेश होता.
या महत्त्वपूर्ण टप्प्याचे महत्त्व आणि मर्सिडीज-बेंझसोबत दीर्घकालीन सहयोगाबाबत मत व्यक्त करत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसन फिरोदिया म्हणाले, “मर्सिडीज-बेंझ भारतात आपला विस्तार करत असताना फोर्स मोटर्स सर्वोत्तम उत्पादन क्षमता, उत्कृष्ट कार्यपद्धती आणि भारतात जागतिक दर्जाच्या ऑटोमोटिव्ह घटकांच्या निर्मितीमध्ये योगदान देऊन त्यांच्या या वाढीला पाठबळ देण्यासाठी कटिबद्ध आहे. २,००,००० वे इंजिन हा केवळ उत्पादनाचा आकडा किंवा मैलाचा दगड नाही, तर विश्वास, अचूकता आणि सामायिक उद्दिष्टावर आधारलेल्या अर्ध्या शतकाच्या सहयोगाची गाथा आहे. फोर्स मोटर्सचा चाकण येथील प्लांट मर्सिडीज-बेंझच्या जागतिक मानकांची तंतोतंत पूर्तता करण्यासाठी खास उभारण्यात आला आहे. या प्लांटमधून बाहेर पडणारे प्रत्येक इंजिन फोर्स मोटर्सच्या इंजिनिअरिंग एक्सलन्स (अभियांत्रिकी उत्कृष्टता) आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रिसिजन (उत्पादनातील अचूकता) प्रती असलेल्या अढळ कटिबद्धतेचे प्रतीक आहे. ही कटिबद्धता जवळपास २,००,००० वेळा यशस्वीपणे पाळणे, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.”
हा ऐतिहासिक टप्पा केवळ प्लांटपर्यंत मर्यादित नसून त्याचे महत्त्व त्यापलीकडे देखील आहे. फोर्स मोटर्स आणि मर्सिडीज-बेंझ यांच्यातील हे नाते भारत-जर्मन औद्योगिक सहयोगाचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण उदाहरण आहे, ज्याने भारतातील ऑटोमोटिव्ह उत्पादनाचे निकष शांतपणे आणि सातत्याने उंचावले आहेत. ऑटोमोटिव्ह क्षेत्र झपाट्याने बदलत असलेल्या आजच्या काळात, जिथे जागतिक पुरवठा साखळी प्रामुख्याने विश्वासार्हता, गुणवत्ता, अचूकता आणि जवळीक शोधत आहे, तिथे ‘मेक इन इंडिया' संकल्पनेला अनुसरून भारतामध्ये जर्मन दर्जाचे इंजिनिअरिंग देण्याची फोर्स मोटर्सची ही क्षमता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणण्याजोगी व आदर्श आहे.
Comments
Post a Comment