बीएनसीए संशोधन केंद्रातील पीएच. डी. विषय देशासमोरील आव्हांनासाठी उपयुक्तडॉ. रावसाहेब लटपटे यांच्या उपस्थितीत '२५ डॉक्टरेट सारांश पुस्तका'चे प्रकाशन
बीएनसीए संशोधन केंद्रातील पीएच. डी. विषय देशासमोरील आव्हांनासाठी उपयुक्त
डॉ. रावसाहेब लटपटे यांच्या उपस्थितीत '२५ डॉक्टरेट सारांश पुस्तका'चे प्रकाशन
पुणे, दि. ६ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) संशोधन विषय हे आपल्या देशासमोरील विविध आव्हानांना तोंड द्यायला नक्कीच उपयोगी ठरतील. तसेच संशोधन केंद्राने केलेल्या मार्गदर्शनानुसार तिथे पदवी घेतलेले २५ पीएच.डी. धारक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दीष्टानुसार घडले आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब लटपटे यांनी सांगितले. त्यांच्या उपस्थितीत २५ डॉक्टरेट मिळवलेल्यांच्या सारांश पुस्तकाचे प्रकाशन झाले.
२०१२ ते २०२५ या १३ वर्षांमध्ये बीएनसीए संशोधन केंद्रातील मार्गदर्शकांनी २५ पीएच.डी. धारक घडवले. त्यांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा बीएनसीएच्या आवारातील आयएसडीएस सभागृहात 'जागतिक पर्यावरण दिनी' नुकताच संपन्न झाला. या प्रकाशनप्रसंगी पीएच.डी. धारकांसह बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे, ज्येष्ठ आर्किटेक्ट डॉ. गोपाळ कान्हेरे,संशोधन केंद्राचे मार्गदर्शक व समन्वयक डॉ. मीरा शिरोळकर, मार्गदर्शक डॉ. वसुधा गोखले, डॉ. अभिजित नातू, तसेच डॉ. पराग नारखेडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थित पीएच.डी. धारकांना व त्यांच्या मार्गदर्शकांना डॉ. लटपटे, डॉ. कश्यप आणि डॉ. कान्हेरे यांच्या हस्ते सत्कार करताना महर्षी कर्वे यांच्या प्रतिमा व रोपटे असणारी कुंडी भेट देण्यात आली.
डॉ. लटपटे पुढे म्हणाले की, देशापुढे आणि जगापुढे हवामानाचे गंभीर प्रश्न, वाढते शहरीकरण, भूराजकीय बदल आणि आर्टिफिशियल इंटेलीजन्ससारखे प्रश्न आ वासून उभे आहेत. ते प्रश्न सोडवण्यास यातील संशोधन विषय उपयोगी ठरतील. आर्किटेक्चर सारख्या तांत्रिक क्षेत्रातील डिझाईन आणि तंत्र यातील संशोधनाची वाढती गरज लक्षात घेता बीएनसीएच्या संशोधन केंद्राने केलेले हे कार्य अभिनंदनास पात्र आहे. विकसित भारतासाठी ते कार्य नक्कीच उपयोगी ठरेल.
आपल्या सगळ्यांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस असल्याचे डॉ. कश्यप यानी यांनी सांगितले. ते म्हणाले की, हे सर्व पीएच.डी. धारक व त्यांचे मार्गदर्शक यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून हे संशोधन कार्य तडीस नेले आहे. संशोधन केंद्राची संकल्पना डॉ. कान्हेरे यांच्या पाठपुराव्यामुळेच प्रत्यक्षात येऊ शकली. पूर्ण झालेल्या सर्व पीएच.डी.चे विषय हे समाजाभिमूख असून ते भविष्यात कपाटबंद न राहता समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. यातील प्रत्येक पीएच.डी. धारकाने संशोधन मार्गदर्शक होऊन पुढच्या पिढ्यांचे उत्तरदायित्त्व निभावले पाहिजे.
डॉ. वसुधा गोखले म्हणाल्या की, कठोर अकादमिक शिस्तीमुळेच सर्व पीएचडी धारकांना कार्य पूर्णत्वास नेता आले. यातून आपल्याला खूप काही नवे शिकता आले.डॉ. अभिजित नातू यांनीही आपल्याला ऐतिहासिक वारसा जतन, शहर नियोजन यांसारखे नवे विषय दहा जणांना मार्गदर्शन करताना शिकता आले, असे सांगितले.
डॉ. मीरा शिरोळकर यांनी आपल्या प्रास्ताविकात आजवरच्या कारकिर्दीत ५० पीएच.डी.ची नोंदणी झाली असून पीएच. डी धारकांचे अर्धशतक पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त केला. प्रा. महेश बांगड यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment