पुण्यात आनंदवन आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम संस्थेच्या वतीने पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण ; शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग
पुण्यात आनंदवन आणि युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम संस्थेच्या वतीने पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण ; शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग
पुणे 5 जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून २०२६ रोजी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम आणि आनंदवन फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर-महंमदवाडी परिसरातील आनंदवन फेज ५ (औतडवाडी हांडेवाडी) आणि न्याती काउंटी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या मोहिमेत निसर्गप्रेमींनी आणि विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र वन विभागाचे फॉरेस्ट कॉन्झर्व्हेटर श्री. आशिष ठाकरे यांनी सांगितले की, "झपाट्याने होणारे शहरीकरण आणि जागतिक तापमान वाढ या संकटांना तोंड देण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. लोक सहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे.”
सध्या जगभरात भेडसावणारी जागतिक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंग), सातत्याने वाढणारा उन्हाचा कडाका आणि दुर्मिळ होत चाललेल्या वनौषधींचा ऱ्हास या पार्श्वभूमीवर, आपले सामाजिक दायित्व म्हणून या समस्येविरोधात लढण्यासाठी या भव्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात साधारण ७०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, केवळ वृक्षारोपण न करता पुढील ३ वर्षे या वृक्षांचे संवर्धन आणि जोपासना केली जाणार आहे, अशी माहिती युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष डॉ. विक्रम गायकवाड यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान आनंदवन संस्थेचे श्री. विशाल पवार यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत आनंदवन फेज १ पासून फेज ७ पर्यंत झालेल्या विस्ताराची सविस्तर माहिती दिली. तसेच, युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या डॉ. सोनल भालेराव यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, संस्था गेली तीन वर्षे कळसुबाईच्या पायथ्याशी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करत आहे आणि याच उपक्रमाचा भाग म्हणून यावर्षी आनंदवन फेज ५ मध्ये ही मोहीम घेण्यात आली. हा जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम केवळ एक शासकीय सोहळा नसून, समाजाच्या हितासाठी चालवला जाणारा एक लोककल्याणकारी कार्यक्रम आहे," असे नमूद केले.
याप्रसंगी आनंदवन संस्थेचे श्री. प्रवीण कुमार आनंद, श्री. रमेश नऱ्यानी, भूपेश शर्मा, तसेच युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे डॉ. समीर ननावरे, डॉ. पुस्तके, डॉ. पाटील, डॉ. वाळके आदि मान्यवर उपस्थित होते. इंडियन डायस्पोराचे श्री. रजत कुमार आणि झेंटिव्हाचे श्री. पुरोहित यांच्यासह दिल्ली पब्लिक स्कूल, अमानोरा स्कूल, रेहान स्कूल, डी.पी.एस. स्कूल आणि ग्रेस स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. याशिवाय, नोबेल हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी डॉ. संजय पठारे, हेल्थ केअर असोसिएशनचे धनंजय कणसे, श्री. सिद्धू चव्हाण, श्री. हृषीकेश शेळके, डॉ. भूषण केदारी, श्री अडसूळ , संघर्ष अकॅडमी (उरळी कांचन) व वेलफेअर असोसिएशनचे संचालक आणि शेकडो निसर्गप्रेमी नागरिक या पर्यावरण पूरक उपक्रमात हिररीने सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment