कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंककरम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्रमास प्रतिसाद
- Get link
- X
- Other Apps
कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंक
करम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्रमास प्रतिसाद
पुणे : कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत असते. कविता लिहायची असेल तर त्यासाठी मनाची मशागत करावी लागते. इतरांनी काय लिहिले आहे याचेही वाचन केले पाहिजे. मनन, चिंतनातून तुम्ही घडत जाता. कविता वाचन हे एकप्रकारचे सादरीकरण असते. त्यामुळे कविता सादर करताना कुठल्या शब्दानंतर थांबावे, कोणत्या शब्दावर जोर द्यावा हे कळले तरच कवितेचे सादरीकरण उत्तम होते आणि कविता नेमकेपणाने रसिकांपर्यंत पोचते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी केले.
करम प्रतिष्ठानतर्फे आयोजित करम रजनीगंधा या कार्यक्रमाचे रविवारी सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. महाळंक बोलत होत्या. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या सदस्या स्वाती सामक, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. मीना शिंदे यांनी प्रथम सत्राचे सूत्रसंचालन केले.
द्वितीय सत्राची सूत्रे तरूजा भोसले व शीला टाकळकर यांनी सांभाळली. रेखा येळंबकर, वैजयंती आपटे व अनुराधा काळे यांचा विशेष सहभाग होता. काव्यसंमेलनात वासंती वैद्य, धनंजय तडवळकर, शैलजा किंकर, रेखा कुलकर्णी, प्रतिभा विभुते, दाक्षायणी पंडित, सुनीता टिल्लू, मीनाक्षी नवले, रेखा देशमुख, भालचंद्र कुलकर्णी, अंजली देसाई, स्मिता जोशी, सुजाता पवार, माधुरी दीक्षित यांनी कवितांचे सादरीकरण केले. नियोजन निरूपमा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, मुक्ता भुजबले यांनी केले.
प्रास्ताविकात भूषण कटककर म्हणाले, कवितेसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये कविता सादरीकरणाला बंधन नसते. सध्या एआयची चलती आहे. त्याचा धोका कवितेलाही होईल, अशी भीती आहे. पण कविता करण्यासाठीची गुणवत्ता एआयकडे नाही. त्यामुळे कवींनी समाजाचे चित्रण अधिक वास्तववादी करावे.’’
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment