महाराष्ट्राच्या एअरोस्पेस क्षेत्राला नवी झेप; जामको इंटिरिअर्सचे पुण्यात अत्याधुनिक केंद्र
महाराष्ट्राच्या एअरोस्पेस क्षेत्राला नवी झेप; जामको इंटिरिअर्सचे पुण्यात अत्याधुनिक केंद्र
पुणे, २२ जून २०२६ : विमान कॅबिन इंटिरिअर्स क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी जामको इंटिरिअर्सने पुण्यात आपल्या अत्याधुनिक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन केले आहे. सात दशकांहून अधिक काळाचा जपानी एअरोस्पेस अभियांत्रिकी वारसा असलेल्या कंपनीची ही गुंतवणूक भारताला जागतिक विमान अभियांत्रिकी नेटवर्कमधील महत्त्वाचा भाग बनवणार असून महाराष्ट्राच्या एअरोस्पेस आणि प्रगत अभियांत्रिकी परिसंस्थेला नवी चालना देणार आहे.
जामको इंटिरिअर्सच्या जागतिक विस्तार धोरणातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, पुण्यातील हे केंद्र विमान कॅबिनच्या संपूर्ण उत्पादन अभियांत्रिकीची जबाबदारी सांभाळणार आहे. संकल्पना विकास, प्रणाली रचना, सविस्तर डिझाइन, प्रमाणन सहाय्य, ड्रॉइंग रिलीज आणि कॉन्फिगरेशन नियंत्रण यांसारखी महत्त्वाची कामे या केंद्रातून केली जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अभियंत्यांना जागतिक दर्जाच्या एअरोस्पेस प्रकल्पांमध्ये थेट योगदान देण्याची संधी मिळणार आहे.
जामको इंटिरिअर्स ही वाइडबॉडी विमानांसाठी लागणाऱ्या कॅबिन प्रणालींची जगातील प्रमुख पुरवठादार कंपनी आहे. बोईंग ७८७ आणि ७७७ विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १०० टक्के लॅव्हेटरीज तसेच बोईंग ७८७ आणि एअरबस ए३५० विमानांतील मोठ्या प्रमाणातील गॅली प्रणालींचा पुरवठा कंपनीकडून केला जातो. कंपनीच्या उत्पादनांमध्ये लॅव्हेटरीज, गॅलीज, बिझनेस क्लास आसने, ब्रँडिंग पॅनेल्स, विंडो शेड्स आणि गॅली इन्सर्ट्स यांचा समावेश आहे.
जागतिक गुंतवणूक संस्था बेन कॅपिटलच्या पाठबळामुळे जामको इंटिरिअर्सला दीर्घकालीन क्षमता विकासात गुंतवणूक करण्याचे बळ मिळाले आहे. पुण्यातील अभियंते कंपनीच्या जागतिक प्रकल्प, उत्पादन आणि प्रमाणन नेतृत्व संघांसोबत थेट काम करत आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतील.
जामको इंटिरिअर्सच्या कार्यकारी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केट शेफर म्हणाल्या, “विमान कंपन्यांसाठी प्रवासी अनुभव सुधारण्यामध्ये आणि ब्रँडची वेगळी ओळख निर्माण करण्यामध्ये विमान कॅबिन इंटिरिअर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे. प्रगत कॅबिन उपाययोजनांची वाढती मागणी लक्षात घेता अभियांत्रिकी उत्कृष्टता हा निर्णायक स्पर्धात्मक घटक ठरत आहे. पुण्यातील आमची गुंतवणूक भारताच्या अभियांत्रिकी क्षमतेवरील आमच्या दीर्घकालीन विश्वासाचे प्रतीक आहे.”
भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व्यावसायिक विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक मानला जातो. भारतीय विमान कंपन्यांकडून वाइडबॉडी विमानांच्या ताफ्याचा विस्तार होत असताना तसेच विमानांच्या आधुनिकीकरणाची गरज वाढत असताना अत्याधुनिक कॅबिन इंटिरिअर्स अभियांत्रिकीची मागणीही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जामको इंटिरिअर्सचे पुणे केंद्र भारतातील विमानन उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
जामको इंटिरिअर्सचे मुख्य परिचालन अधिकारी संजीव सेन म्हणाले, “भारताच्या विमान वाहतूक उद्योगाच्या विकासाचा पुढील टप्पा केवळ विमानांच्या ऑर्डरवर किंवा प्रवासी संख्येवर अवलंबून राहणार नाही, तर जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी क्षमता निर्माण करण्यावर ठरेल. पुणे सेंटर ऑफ एक्सलन्स हे भारतात उच्च-तंत्रज्ञान क्षमता, संपूर्ण अभियांत्रिकी मालकी आणि जागतिक दर्जाचे नवोपक्रम विकसित करण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचा महत्त्वाचा भाग आहे.”
जपान, अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी, संयुक्त अरब अमिराती, फिलिपाइन्स आणि सिंगापूरमध्ये उपस्थिती असलेल्या जामको इंटिरिअर्सच्या जागतिक नेटवर्कमध्ये पुणे आता एक पूर्ण विकसित अभियांत्रिकी केंद्र म्हणून सामील झाले आहे. या केंद्रातून एफएए, ईएएसए आणि डीजीसीएच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार काम केले जाणार असून, महाराष्ट्रातील पुढील पिढीतील एअरोस्पेस अभियंत्यांना जागतिक विमानन क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.
Comments
Post a Comment