सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॉन शनिवारी; ४ देशांतील १२०० धावपटूंचा सहभाग*
*सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॉन शनिवारी; ४ देशांतील १२०० धावपटूंचा सहभाग*
पुणे, प्रतिनिधी : वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘सिंहगड एपिक ट्रेल मॅरेथॉन २०२६’ स्पर्धा येत्या शनिवारी (२७ जून) सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी येथे पार पडणार आहे. जगभरातील ४ देश, भारतातील ३५ राज्ये आणि ६५ शहरांमधील सुमारे १२०० धावपटूंनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे.
स्वराज्याच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सिंहगड किल्ल्याच्या परिसरातील विविध पाच मार्गांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ११ किलोमीटर, २१ किलोमीटर, ३० किलोमीटर आणि ४२ किलोमीटर अशा विविध गटांमध्ये धावपटू सहभाग घेणार आहेत. डोंगर-दऱ्या, चिखलमय वाटा, कडे-कपाऱ्या आणि सिंहगडाच्या नैसर्गिक परिसरातून धावण्याचा रोमांचकारी अनुभव स्पर्धकांना या मॅरेथॉनमधून मिळणार आहे.
पर्यावरण संरक्षण, गड-किल्ल्यांचे संवर्धन, पुरातन वास्तूंचे जतन आणि नियमित व्यायामाचा संदेश या उपक्रमातून दिला जात असल्याची माहिती वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली. सिंहगड एपिक ट्रेल ही स्पर्धा इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशनशी संलग्न असून दरवर्षी जून महिन्याच्या अखेरच्या शनिवारी आयोजित केली जाते. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शूर मावळ्यांना समर्पित असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्पर्धेचे आयोजन दिग्विजय जेधे यांच्यासह अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, ॲड. राजेश सातपुते, मारुती गोळे, अमर धुमाळ आणि फाउंडेशनच्या सुमारे ४०० स्वयंसेवकांनी केले आहे.
यंदाच्या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा नियोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण इंदलकर, वन विभागाचे महादेव मोहिते, पुरातत्त्व विभागाचे विलास वाहणे, सिंहगड रोपवेचे अध्यक्ष उदयराज शिंदे तसेच घेरा सिंहगड समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Comments
Post a Comment