खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा…

खेळ मांडियेला मूर्तीलेपनाचा… 
 प्रस्तावना : महाराष्ट्रातल्या भक्तीपरंपरेचे केंद्रस्थान म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग! हा पांडुरंग म्हणजे केवळ पाषाणाची मूर्ती नाही, तर साक्षात्‌ परब्रह्म आहे. त्याची प्रचिती शतकानुशतके अनेकांनी घेतली असल्यामुळेच ऊन-पावसाची तमा न बाळगता आजही विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने लक्षावधी वारकरी पंढरपूरची वाट धरतात; पण ज्या मूर्तीच्या चरणांवर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यासह अनेक थोर संतांनी मस्तक टेकवले, त्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या नावाखाली आज धर्मशास्त्रातील जाणकारांचे, धर्माचार्यांचे मत विचारात न घेता मूर्तीवर पुन्हा एकदा रासायनिक लेपन करण्याचा अट्टाहास केला जात आहे. श्री विठ्ठलाची मूर्ती ही काही केवळ पाषाणाची शोभेची मूर्ती नाही, तर साक्षात्‌ अविनाशी चैतन्यमूर्ती आहे. त्यामुळे मूर्ती संवर्धनाच्या ‍विषयाकडे पाश्चात्त्य नजरेतून नाही, तर भक्तीमय दृष्टीने पाहायला हवे. हा रसायनाचा नाही, तर भक्तीरसाचा विषय आहे. पुरातत्त्व विभाग आणि प्रशासन याची दखल घेणार का, हा खरा प्रश्न आहे.

* दक्षिण भारतात शास्त्रोक्त पद्धतीने मूर्तीचे संवर्धन होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही? : दक्षिण भारतामध्ये कर्मकांड अधिक प्रमाणात प्रचलित आहे. तेथे काटेकोरपणे ते सांभाळले आणि पाळले जाते. आपल्याकडील आगम ग्रंथांमध्ये मूर्तीसंवर्धनाचे विधी आणि त्याविषयीचा सविस्तर तपशील दिला आहे. त्यानुसार ‍शास्त्रोक्त विधी करून दक्षिण भारतातील मूर्तींचे संवर्धन केले जाऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही, हा प्रश्न आहे. तिरुपती बालाजी मंदिर किंवा तमिळनाडूतील प्राचीन चोलकालीन मंदिरांमध्ये साधारण दर १२ वर्षांनी ‘अष्टबंध संप्रोक्षणम्’ हा विधी केला जातो. केरळ आणि तमिळनाडूतील अनेक मंदिरांमध्ये काळ्या पाषाणाच्या मूर्तींच्या संवर्धनासाठी ‘तैलाकाप्पू’ (तेल अभंग) ही प्रक्रिया केली जाते.
कांचीपुरम्‌ येथील एकांबरेश्वर मंदिरातील मुख्य शिवलिंग हे पंचभूतांपैकी ‘पृथ्वी’ तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. आख्यायिकेनुसार, हे लिंग साक्षात माता पार्वतीने वाळूपासून बनवले होते. लिंगाचे वाळूचे कण घट्ट एकत्र बांधलेले राहावेत, यासाठी त्यावर नियमितपणे ‘पुनुगु’ (एक नैसर्गिक सुगंधी अर्क) आणि चमेली यांच्या तेलाचा लेप लावला जातो. अशी पारंपरिक संवर्धनपद्धती शतकानुशतके अवलंबली जात असल्याचे मंदिरपरंपरेत मानले जाते. श्रीरंगम्‌ (तिरुचिरापल्ली) येथील भगवान विष्णूची (रंगनाथाची) महाकाय शेषशायी मूर्ती ही ग्रॅनाइट दगडाची नसून ती ‘सुधाई’ पासून बनलेली आहे. सुधाई म्हणजे चुनखडी, नैसर्गिक डिंक, औषधी वनस्पती, लाकडाचा भुसा आदींचे मिश्रण. मूर्तीची संरचना टिकून रहावी आणि हवामानातील आर्द्रतेपासून तिचे संरक्षण व्हावे, यासाठी वर्षातून दोनदा (विशेषतः ज्येष्ठ महिन्यात) ‘तैलाकाप्पू’ विधी केला जातो. यात कापूर, चंदन, आणि विशिष्ट औषधी वनस्पतींपासून तयार केलेले कोमट तेल संपूर्ण मूर्तीला लावले जाते. यामुळे मूर्तीच्या पृष्ठभागाचे संरक्षण होते, आर्द्रता व झीज यांचा परिणाम कमी होतो आणि मूर्तीचे दीर्घकालीन संवर्धन साधले जाते. अशा स्वरूपाची कुठली प्रक्रिया ‍विठ्ठलमूर्तीच्या संदर्भात राबवली जाऊ शकत नाही का ? 

* रासायनिक प्रक्रियेचा अट्टाहास का? : श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्यामुळे ती थांबवण्यासाठी म्हणून रासायनिक लेपन प्रक्रियेचा आग्रह धरला जात आहे. यापूर्वी जवळपास ४ वेळा अशा प्रकारे रासायनिक लेपन प्रक्रिया केली गेली होती. शेवटची प्रक्रिया वर्ष २०२० मध्ये कोरोनाच्या काळात केली गेली. त्यावेळी हे लेपन पुढे ८-१० वर्षे टिकेल, असे दावे करण्यात आले होते; पण कोरोनाकाळात दर्शन बंद असूनसुद्धा अवघ्या ६ वर्षांत पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रियेची आवश्यकता निर्माण झाली. याचा सरळ अर्थ, ही प्रक्रिया सदोष आहे; किंबहुना पांडुरंगाला मान्य नसावी, असा नाही का? यामुळे या प्रक्रियेची परिणामकारकता, तिची दीर्घकालीन उपयुक्तता आणि पर्यायी शास्त्रोक्त उपाय यांवर नव्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण होते. 

* धर्मपरंपरेचा अभ्यास नसतांना त्याच्याशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार कुणी दिला? : हा प्रश्न ‍आज भाविकांनी विचारला पाहिजे. साध्या व्यवहारातही ‘आपला ज्याचा अभ्यास नाही, त्या विषयी निर्णय घेऊ नये’, हा दंडक पाळला जातो. कुणी डॉक्टरांकडे ‍वकिली ‘केस’ घेऊन गेले, तर ते डॉक्टर त्याला ‍अधिवक्त्याकडे पाठवतील. कुणी अधिवक्त्याकडे इमारत बांधायची आहे म्हणून गेले, तर ते त्याला अभियंत्याकडे पाठवतील. मग धार्मिक क्षेत्रातील निर्णयाच्या संदर्भात पुरातत्त्व विभाग किंवा प्रशासन धार्मिक अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन का घेत नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने आणि प्रशासनाने आखलेली ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया किमान स्थगित करून त्यांनी मूर्तीशास्त्रज्ञ, आगमविद्वान, धर्माचार्य आणि संवर्धनतज्ञ यांचे मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घ्यावा, अशीच भाविकांची अपेक्षा आहे.

* वादाचे मूळ मंदिराच्या सरकारीकरणात : या सगळ्या मनमानी कारभाराला मंदिरांचे झालेले सरकारीकरण हेही महत्त्वाचे कारण आहे. सरकारीकरणामुळेच प्रशासनात धर्मशास्त्राचे अज्ञान असलेले लोक आले आणि त्यांच्या मनमानीतूनच हा रासायनिक लेपनाचा घाट घातला जात आहे. याच सरकारीकरणाचा परिणाम म्हणून देवस्थान समितीची शेकडो एकर जमीन गायब झाल्याचे आणि त्यात भ्रष्टाचार झाल्याचे समाेर आले होते. सर्व गोष्टींचे खासगीकरण करत असतांना केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का, हा रास्त प्रश्न ‍विचारत भाविकांकडून गेली काही वर्षे मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात चळवळ राबवली जात आहे; पण अद्यापही मंदिरांच्या सरकारीकरणाचे पाऊल मागे घेतलेले नाही. देवळात पुजारी कोण असावेत, देवावर अभिषेक किती वेळा करावेत, कुठले मंत्र म्हणावेत, हे प्रशासन कसे ठरवणार? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण झाल्यानंतर जे पुजारी नेमले गेले, त्यांना देवीचे अलंकार कसे घालायचे, हेही माहीत नव्हते. रुक्मिणी मातेच्या हातात घालायचे अलंकार ते गळ्यात घालत होते, कपाळावरील कुंकू नखाने खरवडून काढत होते, असा अनुभव सुप्रसिद्ध भागवताचार्यांनी सांगितला होता. हे जर मंदिर सरकारीकरणाचे फळ असेल, तर सरकारीकरणामुळे मंदिराचे सुव्यवस्थापन होत नाहीये, तर मंदिर संस्कृतीचा ऱ्हास होत आहे आणि म्हणूनच भाविकांनी ‘मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या स्वाधीन करा’, ही मागणी लावून धरली पाहिजे.

* बा विठ्ठला, सद्बुद्धी दे : पांडुरंग हा भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आहे. त्यामुळे श्रद्धाळू भाविकांच्या वतीने श्रीविठ्ठलालाच साकडे आहे, ‘हे पांडुरंगा, तू अठ्ठावीस युगे भक्तांसाठी विटेवर उभा आहेस. तुझ्या मूर्तीसंवर्धनाच्या नावाखाली सुरू असलेला हा सर्व सावळागोंधळ तू पाहतच आहेस. बा विठ्ठला, आता तूच सर्वांना सद्बुद्धी दे. हिंदु धर्माविषयी जागृती आणि श्रद्धा अधिक दृढ होऊ दे अन्‌ भागवतधर्माची पताका सर्वत्र फडकू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !
जय जय राम कृष्ण हरी !!
 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश