शंभराव्या साहित्य संमेलनासाठी स्थळांची पाहणीरविवारी स्थळ आणि तारखांची होणार घोषणा


शंभराव्या साहित्य संमेलनासाठी स्थळांची पाहणी

रविवारी स्थळ आणि तारखांची होणार घोषणा

 

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुण्यात आयोजित करण्यात येत असलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी साहित्य परिषद, साहित्य महामंडळ, आयोजक संस्था समर्थ युवा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तीन स्थळांची पाहणी केली. स्थळ निश्चितीची घोषणा रविवारी (दि. १४) करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद समर्थ युवा फाऊंडेशनच्या सहकार्याने शंभरावे साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्यात येत आहे. यंदाचे शंभरावे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळावा यासाठी स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे प्रस्ताव दिला होता. त्या अनुषंगाने या तीनही स्थळांची पाहणी आज करण्यात आली.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण, समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर तर स्थळ निवड समितीतील ॲड. लखनसिंह कटरे (विदर्भ साहित्य संघ), रामचंद्र काळुंखे (मराठवाडा साहित्य परिषद, संभाजीनगर), प्रा. प्रतिभा सराफ (मुंबई मराठी साहित्य संघ, कार्यवाह), पुरुषोत्तम सप्रे (बृहन महाराष्ट्र साहित्य परिषद, भोपाळ) तसेच साहित्य महामंडळाचे कोश विश्वस्त सुनील महाजन, राजन लाखे  यांनी आज (दि. १३) तीनही स्थळांची पाहणी केली.

उद्‌घाटन सत्र, समारोप समारंभ, इतर कार्यक्रमांसाठी येणाऱ्या साहित्य रसिकांना संमेलनस्थळी येण्याच्या दृष्टीने तसेच पुस्तक प्रदर्शन, वाहन तळ यासाठी जागेची उपलब्धता याची प्रामुख्याने पाहणी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी स्थळ पाहणी समितीतील सदस्यांचे स्वागत केले. या वेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे, रजिस्ट्रार डॉ. प्रफुल्ल पवार, बागेश्री मंठाळकर, अतुल अग्निहोत्री उपस्थित होते.

स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरिल आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाम मुडे यांनी संयोजनाविषयी माहिती दिली.

संमेलन स्थळ आणि संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यासाठी रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीनंतर दुपारी संमेलन स्थळ आणि तारखांची घोषणा करण्यात येणार आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश