कॅन्सरवर मात करणाऱ्या ‘विजेत्यां’च्या जिद्दीचा एम ओ सी कॅन्सर केयर तर्फे विशेष सन्मान


कॅन्सरवर मात करणाऱ्या ‘विजेत्यां’च्या जिद्दीचा एम ओ सी कॅन्सर केयर तर्फे विशेष सन्मान

 

*पुणे, २१ जून २०२६ :* धैर्य, जिद्द आणि आशा या मुल्यांवर आधारित, एम ओ सी कॅन्सर केयर पुणे यांनी आयोजित केलेल्या ‘विजेता – स्ट्रॉन्ग माइंड्स अगेन्स्ट कॅन्सर या विशेष उपक्रमात कॅन्सरवर मात केलेल्या किंवा तशी जिद्द उराशी बाळगणाऱ्या २०० हून अधिक विजेत्यांचा गौरव करण्यात आला. कॅन्सरच्या आव्हानात्मक प्रवासात खंबीरपणे उभे राहून आयुष्याचा प्रवास न थांबवणाऱ्या व्यक्तींना समर्पित हा कार्यक्रम होता.

 

पुण्यात आयोजित करण्यात आलेला ‘विजेता’ हा कार्यक्रम कॅन्सरवर मात करण्यासाठी मानसिक बळ किती महत्त्वाचे असते याचा प्रभावी संदेश देणारं प्रतीक ठरला. कॅन्सरमुक्त झालेले रुग्ण, कॅन्सरला दीर्घकालीन आजाराप्रमाणे स्वीकारून आपल्या आयुष्याची उद्दिष्टे पूर्ण करणारे व्यक्ती, तसेच सध्या उपचार घेत असूनही सकारात्मक दृष्टिकोनाने लढा देणारे रुग्ण – प्रत्येकाची कहाणी प्रतिकूल परिस्थितीतही उभारी घेण्याची प्रेरणा देणारी होती.

 

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कॅन्सर विजेत्यांनी आपल्या संघर्ष, चिकाटी आणि आशेचे खास प्रवास एकमेकांशी मनमोकळेपणाने शेअर केले. त्यांच्या अनुभवांमधून कॅन्सरशी सामना करताना येणाऱ्या मानसिक व शारीरिक आव्हानांची जाणीव झाली, तसेच कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजाच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित झाले.

 

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री *श्रुती मराठे* यांनी कॅन्सर विजेत्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीचे कौतुक करत त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून इतरांना बळ मिळत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सुप्रसिद्ध साहित्यिक *कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)* यांच्या नात *पियू आरोळे-शिरवाडकर* यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

यावेळी बोलताना एम ओ सी कॅन्सर केयर, पुणे येथील वरिष्ठ कर्करोगतज्ञ *डॉ. मंगेश मेखा* म्हणाले, “कॅन्सर हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा एखादा अध्याय असू शकतो मात्र; संपूर्ण आयुष्य नव्हे. ‘विजेता’च्या माध्यमातून आम्हाला अशा व्यक्तींचा गौरव करायचा होता, ज्यांनी कॅन्सरशी सामना करताना असामान्य मानसिक ताकद, सकारात्मकता आणि आशा दाखवली. त्यांच्या प्रवासातून हे सिद्ध होते की, आशा आजाराच्या परिस्थितीतही आयुष्य अर्थपूर्ण, समृद्ध आणि आनंददायी जगता येते.”

 

याचवेळी एम ओ सी कॅन्सर केयर, पुणे येथील वरिष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. रवी वाटेगावकर म्हणाले, “कॅन्सरविरोधातील लढ्यात एकमेकांना आधार देणाऱ्या आणि मानसिकदृष्ट्या खंबीर असणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणणारी मोठी चळवळ म्हणून ‘विजेता’ हा उपक्रम विकसित करण्याचा आमचा मानस आहे.”

 

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या *श्रुती मराठे* म्हणाल्या, “या सर्व प्रेरणादायी व्यक्तींना भेटण्याचा अनुभव अत्यंत भावनिक आणि नम्र करणारा आहे. खरे बळ हे संकट नसण्यात नसते, तर प्रत्येक दिवशी त्या संकटाला सामोरे जाण्याच्या धैर्यात असते. येथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीची सकारात्मकता, जिद्द आणि लढाऊ वृत्ती विलक्षण प्रेरणादायी आहे. आशा आणि आत्मविश्वास किती मोठी ताकद असते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.”

 

एम ओ सी कॅन्सर केयर चे वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. तुषार पाटील म्हणाले, “प्रत्येक कॅन्सर रुग्णाला आर्थिक, भौगोलिक किंवा इतर कोणत्याही अडथळ्यांपलीकडे सर्वोत्तम दर्जाचे उपचार मिळायला हवेत, असा आमचा ठाम विश्वास आहे. कॅन्सरचा प्रवास रुग्णांसाठी अधिक सोपा, सुलभ आणि सकारात्मक करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ‘विजेता’ हा त्याच उद्दिष्टाशी सुसंगत असलेला उपक्रम असून अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्पर प्रेरणेतून रुग्णांचा प्रवास अधिक सुलभ करण्याचे कार्य तो करतो.”

 

या कार्यक्रमामुळे कॅन्सर विजेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकमेकांशी संवाद साधण्याची, अनुभव शेअर करण्याची आणि परस्पर प्रेरणा घेण्याची संधी मिळाली. अनेकांसाठी हा कार्यक्रम समान अनुभवातून गेलेल्या इतर व्यक्तींना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून नवी प्रेरणा घेण्याचा महत्त्वपूर्ण मंच ठरला.

 

कॅन्सर उपचारांमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे रुग्णांचे आयुर्मान आणि जीवनमान दोन्ही सुधारत असताना, ‘विजेता’ सारखे उपक्रम कॅन्सरविषयीचा दृष्टिकोन बदलण्यास मदत करत आहेत. चर्चा आजारापुरती मर्यादित न राहता, कॅन्सरवर मात केलेल्या व्यक्तींच्या जिद्दीचा, आशेचा आणि मानवी आत्मविश्वासाचा उत्सव साजरा करण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे.

 

एम ओ सी कॅन्सर केयर अँड रिसर्च सेंटर विषयी:-

 

एम ओ सी कॅन्सर केयर अँड रिसर्च सेंटर ही भारतातील आधुनिक, सर्वात मोठी कॅन्सर केअर साखळीस्वरुप संस्था असून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि दिल्ली-एनसीआर या चार राज्यांमध्ये तिचे ३० हून अधिक कॅन्सर उपचार केंद्रांचे नेटवर्क आहे. ६० हून अधिक कर्करोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एम ओ सी कॅन्सर केयर अत्याधुनिक, उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, जागतिक मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित उपचारपद्धती आणि अनुभवी तज्ज्ञांच्या साहाय्याने रुग्णांच्या घराजवळ, वाजवी दरात कॅन्सर उपचार उपलब्ध करून देते.

--

--

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश