शिष्यांची प्रगती पाहून मी कृतार्थ : प्रा. सुभाषचंद्र बोंडेशिष्य परिवारातर्फे प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान


शिष्यांची प्रगती पाहून मी कृतार्थ : प्रा. सुभाषचंद्र बोंडे

शिष्य परिवारातर्फे प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

पुणे : मला आयुष्यात उत्तम गुरू, मार्गदर्शक लाभले, त्यातूनच माझे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. वडिलांनी माझ्यावर आत्मविश्वास दाखविल्याने मी खऱ्या अर्थाने घडलो. आपल्या हातून पुढची पिढी घडावी या निरपेक्ष भावनेने मी कार्यरत राहिलो. मी दिलेल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून शिष्य पुढे गेले याचे समाधान लाभल्याने मी आज कृतार्थ आहे. शिष्यांनी केलेली प्रगती पाहून मला गुरू म्हणून भरभरून आनंद मिळतो आहे. ‘गुरू से चेला सवाई’ ही उक्ती माझ्याबाबतीत खरी ठरली आहे, अशा भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांनी व्यक्त केल्या.

स्थापत्य अभियांत्रिकी शैक्षणिक व सल्ला सेवा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रा. सुभाषचंद्र बोंडे त्यांचा त्यांच्या शिष्य परिवारातर्फे सोमवारी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरुड, चंद्रकांत गोडसे, जयंत इनामदार, रवींद्र चौधरी, अजित भाटे मंचावर होते. या विशेष सत्कार सोहळ्यास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसह उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

प्रास्ताविकात प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांच्या कार्याविषयी माहिती देऊन रवींद्र चौधरी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी अवगत केले. प्रा. बोंडे यांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. सुनील भिरुड म्हणाले, प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांनी आपल्या कार्याची मोहोर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कामकाजावर उमटविली होती. त्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. शिक्षकापेक्षा विद्यार्थी मोठा झाला की शिक्षकही मोठा होतो हे प्रा. बोंडे यांच्या विषयी अनेकदा खरे ठरले आहे.

आशीर्वादरूपी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ अभियंता चंद्रकांत गोडसे म्हणाले, प्रा. बोंडे यांचा विविध अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभव, व्यासंग मोठा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना घडविताना फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून कसे शिकविता येईल याचे उत्तम मार्गदर्शन केले. त्यांचे अनेक विद्यार्थी देश-परदेशात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत, याचे विशेष कौतुक.

जयंत इनामदार म्हणाले, अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेत असताना प्रा. बोंडे यांनी नेहमीच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यावर भर दिला त्यामुळे कसे शिकायचे व काय शिकायचे याचे आकलन होत गेले. ज्याचा उपयोग व्यवसाय सुरू करताना मोठ्या प्रमाणात झाला. त्यांच्या मार्गदर्शनाने आयुष्यात अनेक शिष्यांना ज्ञानासह आत्मविश्वासही मिळाला आहे.

अजित भाटे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरी अथवा व्यवसाय करताना गुणांपेक्षाही कामाचा प्रत्यक्ष अनुभव मोलाचा ठरतो. अशावेळी प्रा. बोंडे यांचे मार्गदर्शन किती महत्त्वाचे होते हे समजले. विषय समजावून सांगण्याची हातोटी, शिस्त आणि सातत्याने मोलाचे मार्गदर्शन यातून प्रा. बोंडे यांनी अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत.

मेजर जनरल डॉ. श्रीपाल म्हणाले, प्रा. बोंडे यांची निर्णय क्षमता, स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील ज्ञान अतिशय उच्च दर्जाचे असून अणुऊर्जा चाचणी करताना अंडरग्राउंड हार्डन्ड बंकर्स तयार करण्यासाठी प्रा. बोंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याविषयात त्यांना बंकर मॅन ऑफ इंडिया अशी ओळख मिळावी.

प्रा. बोंडे यांनी गुरू म्हणून दिलेले संस्कार प्रेरणा, ज्ञान देण्याची हातोटी, विद्यार्थ्यांवर दाखविलेला विश्वास, निर्णय क्षमता असे प्रा. बोंडे यांचे विविध पैलू उलगडून दाखविताना कृतज्ञ झालेल्या प्रकाश मेढेकर, पुष्कर कानविंदे, डॉ. व्ही. डी. बाफना, ज्ञानेश्वर सावंत, अप्पासाहेब भोसले आदी शिष्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन नीरजा आपटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दिलीप चौधरी यांनी केले

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश