कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन‘खड्ग धारिणी तुम्हे देत मानवंदना’ गीताद्वारे कार्याचा जागर‘रे हिंद बांधवा थांब या स्थळी…’
कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन
‘खड्ग धारिणी तुम्हे देत मानवंदना’ गीताद्वारे कार्याचा जागर
‘रे हिंद बांधवा थांब या स्थळी…’
पुणे : कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना १६८व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि. १८) अभिवादन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’, ‘भरत माता की जय’, ‘राणी लक्ष्मी बाई की जय’ असा जयघोष करत आणि
‘खड्ग धारिणी तुम्हे देत मानवंदना’, ‘रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली’ अशी सामूहिक गीते सादर करत झाशीच्या राणीचा जयजयकार करण्यात आला.
बालगंधर्व रंगमंदिर चौक परिसरात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम गायकवाड, कऱ्हाडे ब्राह्ण संघ, पुणेचे अध्यक्ष अमित शहाणे यांनी सुरुवातीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नगरसेवक पुनीत जोशी, डॉ. गजानन एकबोटे यांच्यासह कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पदाधिकारी गिरीष शेवडे, मकरंद फणसळकर, सूर्यकांत सरवटे, गणेश गुर्जर, हरीभाऊ मुणगेकर, मुक्ता चांदोरकर, अनिल शेवडे, वैशाली वेर्णेकर, शुभा मोघे, राजश्री महाजनी, तेजश्री सरदेसाई, यशोधन नाटेकर, ऋषिकेश पळसुलेदेसाई यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते.
‘कधी नाही देणार झाशी तुम्हाला’, ‘नमस्कार त्या झाशीच्या लक्ष्मीला’, ‘रे हिंद बांधवा’, ‘जय जय कार जय जय कार करो लक्ष्मी का’ अशी झाशीच्या राणीच्या गौरवार्थ गीते सादर करण्यात आली. शिवाजीनगरमधील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनींनी बँड आणि ढोलताशा वादन करून मानवंदना दिली.
पुणे शहराच्या सौंदर्यात भर घालणारा वीरांगना झाशीच्या राणीचा पुतळा कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेने दि. १७ जून १९५७ रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेला प्रदान केला. तेव्हापासून झाशीच्या राणीच्या जन्मदिनी आणि पुण्यतिथीला महापौरांच्या हस्ते प्रथम पुष्पहार अर्पण करण्याची प्रथा आहे.
प्रास्ताविकात अमित शहाणे म्हणाले, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, स्वाभिमान उंचवावा, सक्षम व्हावे. महिला सबलीकरणाचे महत्त्व जाणून या कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनींनाही दरवर्षी सामावून घेण्यात येते.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, अन्यायाविरुद्ध शक्तीनिशी लढले पाहिजे असा संदेश राणी लक्ष्मीबाई यांनी भारतीयांना दिला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा आपणा सगळ्यांनाच अभिमान आहे. त्यांचे कार्य कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे पुढील पिढीपिर्यंत पोहोचविण्यात येत आहे याचे कौतुक आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment