बाणेर रोडवरील पावसाळी पूर्वतयारीचा आढावा; अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची संयुक्त पाहणी*
*बाणेर रोडवरील पावसाळी पूर्वतयारीचा आढावा; अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची संयुक्त पाहणी*
*-सनी निम्हण यांच्या पुढाकारातून संयुक्त पाहणी; पीएमआरडीए, मेट्रो आणि महापालिकेला तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश*
पुणे, दि. १२ जून २०२६ : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाणेर रोड परिसरातील वाहतूक व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा तसेच मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी हॉटेल ग्रीन पार्क ते विद्यापीठ चौक या मार्गाची संयुक्त पाहणी केली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान विद्यापीठ चौक तसेच हॉटेल महाबळेश्वर परिसरात गतवर्षीच्या पावसाळ्यात पाणी साचल्याने निर्माण झालेल्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यापीठ चौकापासून संपूर्ण मार्गावरील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व परिणामकारक होण्यासाठी पीएमआरडीए व मेट्रो प्रशासनाने चार दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
तसेच सिंध सोसायटी व नॅशनल सोसायटीसमोरील मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडून असलेला बांधकामाचा मलबा आणि राडारोडा यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय विस्कळीत झालेले दुभाजक, असमतल रस्ते, नादुरुस्त पदपथ, कमी झालेली रस्त्याची रुंदी तसेच आयसर संस्थेसमोरील बंद पडलेली पावसाळी वाहिनी या बाबींचीही पाहणी करण्यात आली. संबंधित विभागांनी या सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही करून कामे पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
विद्यापीठ चौक परिसर हा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असून येथे व्हीव्हीआयपींची वारंवार ये-जा होत असते. या पार्श्वभूमीवर औंधकडे जाणाऱ्या जंक्शनजवळ पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले खोदकाम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले.
बाणेर रोड परिसरातील वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील जलनिस्सारणाच्या अडचणी तसेच मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत सनी निम्हण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांनी या प्रश्नांच्या निराकरणासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार संबंधित विभागांच्या समन्वयातून ही संयुक्त पाहणी आयोजित करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी मेट्रो विभाग, पथ विभाग, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वय साधून पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच पावसाळी वाहिन्या, चेंबर्स आणि जलनिस्सारण व्यवस्थेची तातडीने साफसफाई करण्यात यावी व पदपथांवरील राडारोडा हटवून नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ हालचालीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
या संयुक्त पाहणीस अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर,नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड,नगरसेविका सपना छाजेड, पीएमआरडीएचे उपअभियंता गजानन पाटील, PITCMRL चे उपअभियंता सुमित यादव, प्रकल्प व्यवस्थापक योगेश मंद्रा, सेक्शन इंचार्ज राज धनशेट्टी तसेच पीएमआरडीए, मेट्रो, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
Comments
Post a Comment