युरोपात नाट्योत्सवाचा जल्लोष - अभिमंचच्या युरोपियन एकांकिका स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद
युरोपात नाट्योत्सवाचा जल्लोष - अभिमंचच्या युरोपियन एकांकिका स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद
पुणे : युरोपात राहणाऱ्या मराठी रसिक प्रेक्षकांसाठी नेदरलँड्स येथे अभिमंच प्रस्तुत पहिली युरोपियन एकांकिका स्पर्धा नुकतीच मोठ्या दिमाखात संपन्न झाली. त्यात पुण्यातील स्पर्धकांनीही उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे परीक्षण १०० हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केलेले, नाट्यप्रेमी आणि महान कलाकार, श्री विजय केंकरे यांनी केले. त्यांच्यासोबतच नाट्यकलेचा सखोल अभ्यास असलेले माननीय सचिन कंटक यांनी सह परीक्षकांची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली.
अभिमंचतर्फे आयोजित या स्पर्धेत तब्बल १३ संघांनी आपली नाट्यकला सादर केली. सर्वसाधारणपणे एप्रिलमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतासह ब्रिटन, स्वित्झर्लंड, जर्मनी, आणि नेदरलँड या देशातील स्पर्धकांचा समावेश होता. आपल्या जन्मभूमीपासून इतक्या लांब राहूनसुद्धा आपल्यातल्या कलाकाराला वाव देण्याची अशी सुवर्णसंधी जेव्हा समोर दिसली, तेव्हा प्रत्येक संघाने या संधीच सोन करण्याच्या जिद्दीने स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून दिले.
या दोन दिवसांत एका पेक्षा एक उत्कृष्ट १३ एकांकिकांचा अनुभव रसिक प्रेक्षकांना मिळाला. एकांकिका स्पर्धेची खासियत म्हणजे प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी मोजून १ तास मिळाला. त्यात नेपथ्य मांडणी पण करावी लागली. वेगवेगळ्या विषयांवर सादर केलेल्या या एकांकिका म्हणजे नाट्यप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने एक मेजवानीच ठरल्या. नेपथ्य, अभिनय, दिग्दर्शन, कथा आणि तांत्रिक साहाय्य या सर्व स्तरांवर या एकांकिका इतक्या उत्कृष्ट होत्या की माननीय परीक्षकांना सर्वोत्तम एकांकिकांची निवड करणे अत्यंत कठीण गेले.
ही सुवर्णसंधी, हे व्यासपीठ हौशी कलाकारांना प्राप्त करून देण्यासाठी आणि ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी टीम अभिमंचने, म्हणजेच या स्पर्धेच्या आयोजकांनी अक्षरशः आपले सर्वस्व पणाला लावले. गेले ५-६ महिने संपूर्ण टीम कंबर कसून तयारीला लागली होती. एखाद्या कार्यक्रमाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी अनेक स्तरावर काम करावे लागते. या स्पर्धेसाठी योग्य थिएटर शोधण्यापासून, त्यामध्ये लागणारे तांत्रिक साहाय्य, आर्थिक गणित जुळवण्यासाठी लागणारी स्पॉन्सरशिप, प्रचार-प्रसार योजना तसेच या दोन दिवसांत सर्व संघांसाठी तसेच प्रेक्षकांसाठी खानपानाच्या व्यवस्था, तिकीट व्यवस्थापन या सर्व विभागांची कामे आयोजक टीमने प्रभावीपणे वाटून घेतली होती. आणि प्रत्येक विभागाने आपापले काम अगदी चोख पार पाडले.
भारताबाहेर, यूरोपमध्ये घरकाम, नोकरी-धंदा आणि मुलंबाळं सांभाळण्यासाठी भारतासारखी मदत मिळत नाही. त्यामुळे हे सर्व सांभाळून संपूर्ण टीमने गेल्या ५-६ महिन्यांत केलेले अथक प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत आहे. या नाट्योत्सवाला मिळालेलं यश इतके भव्य आहे की, युरोपात राहणाऱ्या मराठी रसिकांपासून ते आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत, प्रत्येकजण या कार्यक्रमाची प्रशंसा करत आहे. या नाट्योत्सवाचे नियोजन आणि आंमलबजावणी इतकी प्रभावी होती की, सर्व उपस्थित प्रेक्षक आणि सहभागी आनंदाने आणि आश्चर्याने भारावून गेले. टीम ‘अभिमंच’च्या अथक प्रयत्नांमुळे हा सोहळा केवळ यशस्वी ठरला नाही, तर मराठी नाट्यकलेचा आवाज जागतिक पातळीवर पोहोचवला आहे. यात शंका नाही की, नाट्योत्सवाची गोड आठवण दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनात आणि नाट्यप्रेमींमध्ये रुंजी घालत राहील.
विजेत्यांची यादी:
सर्वोत्कृष्ट लेखक:
प्रथम: रेश्मा विकास (पन्नादायी)
द्वितीय: हृषीकेश पालवे (मोह-माया)
तृतीय: तन्मय मेहेंदळे (Soulmates)
सर्वोत्कृष्ट संगीत:
प्रथम: पन्नादायी
द्वितीय: Soulmates
तृतीय: मोह-माया
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन:
प्रथम: रेश्मा विकास (पन्नादायी)
द्वितीय: अक्षय ढोले (दोन शूर)
तृतीय: सुजाता जोशी, विद्येश खळदकर (मोह-माया)
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना:
प्रथम: आशुतोष सप्रे (पन्नादायी)
द्वितीय: अभिज्ञ कडू (दोन शूर)
तृतीय: विक्रांत महल्ले, तन्मय मेहेंदळे (Soulmates)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य:
प्रथम: आसौमित्र शहा (दोन शूर)
द्वितीय: सचिन जोशी, तन्मय मेहेंदळे, शर्वरी मेहेंदळे (Soulmates)
तृतीय: मानसी बर्वे (मोह-माया)
सर्वोत्कृष्ट अभिनेता:
प्रथम: अक्षय ढोले (दोन शूर)
द्वितीय: सिद्धेश धर्माधिकारी (पन्नादायी)
तृतीय: आनंद शुक्ल
सर्वोत्कृष्ट नाटक:
प्रथम: पन्नादायी
द्वितीय: दोन शूर
तृतीय: मोह-माया
Comments
Post a Comment