मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उच्च जोखमीच्या रुग्णावरील गुंतागुंतीच्या स्टॅगहॉर्न किडनी स्टोनची यशस्वी शस्त्रक्रिया; मूत्रपिंडाची कार्यक्षमता राखण्यात यश
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उच्च जोखमीच्या रुग्णावरील गुंतागुंतीच्या स्टॅगहॉर्न किडनी स्टोनची यशस्वी शस्त्रक्रिया; मूत्रपिंडाची कार्यक्षमता राखण्यात यश
पुणे: मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथील युरोलॉजी विभागाने मोठा स्टॅगहॉर्न किडनी स्टोन, मूत्रपिंडाभोवती रक्तस्राव (पेरिनेफ्रिक हेमॅटोमा) आणि मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या सहव्याधींनी ग्रस्त असलेल्या 63 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिची मूत्रपिंडाची कार्यक्षमता जपण्यात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. या आव्हानात्मक शस्त्रक्रियेचे नेतृत्व मेडिकव्हर हॉस्पिटलचे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, लॅप्रोस्कोपिक आणि रेनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सुमित चौधरी यांनी केले.
सदर रुग्णाला मागील सहा महिन्यांपासून मूत्रपिंडातील खड्यांचा त्रास होता. त्याचबरोबर तिला मागील पाच वर्षांपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सुरुवातीला अन्य रुग्णालयात उपचारादरम्यान डाव्या मूत्रपिंडामध्ये मोठा स्टॅगहॉर्न स्टोन आणि त्यासोबत पेरिनेफ्रिक हेमॅटोमा असल्याचे निदान झाले. रक्तस्रावाचा धोका जास्त असल्याने तेथे खडा काढण्याची शस्त्रक्रिया करता आली नाही आणि तात्पुरत्या स्वरूपात डीजे स्टेंट बसविण्यात आला.
यानंतर रुग्णाला पुढील विशेष उपचारांसाठी मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीत डाव्या मूत्रपिंडाचा आकार तुलनेने लहान असल्याचे आढळले. त्यामध्ये सुमारे 4 x 3 सेंमी आकाराचा मोठा स्टॅगहॉर्न स्टोन, अतिरिक्त 1 सेंमीचा खडा आणि 5 x 2 x 2 सेंमी आकाराचा पेरिनेफ्रिक हेमॅटोमा आढळून आला.
या प्रकरणात मोठा स्टॅगहॉर्न स्टोन, मूत्रपिंडाभोवती रक्तस्राव, मूत्रपिंडाचा लहान आकार, मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या सहव्याधी आणि यापूर्वीचा अपयशी उपचार प्रयत्न या सर्व बाबींमुळे उपचार प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती.
रुग्णाची सखोल तपासणी आणि शारीरिक स्थिती स्थिर केल्यानंतर परक्युटेनियस नेफ्रोलिथोटॉमी (PCNL) या अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. रक्तस्रावाचा धोका, हेमॅटोमा आणि मूत्रपिंडाचा आकार यांचा विशेष विचार करून ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर राहिली. ऑपरेशननंतरच्या पहिल्या दिवशी पीसीएन ट्यूब काढण्यात आली, दुसऱ्या दिवशी फोलीज कॅथेटर काढण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी रुग्णाला डीजे स्टेंटसह चांगल्या प्रकृतीत घरी सोडण्यात आले.
याविषयी बोलताना डॉ. सुमित चौधरी म्हणाले, “पेरिनेफ्रिक हेमॅटोमासोबत असलेले स्टॅगहॉर्न कॅल्क्युली हे अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचे प्रकरण असते. वेळेवर उपचार न झाल्यास वारंवार संसर्ग, सेप्सिस, मूत्रपिंडाचे कायमस्वरूपी नुकसान आणि कार्यक्षमता कमी होण्याचा धोका वाढतो. योग्य नियोजन, अत्याधुनिक एंडोयुरोलॉजी तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय वैद्यकीय सहकार्याच्या मदतीने अशा उच्च जोखमीच्या रुग्णांवरही यशस्वी उपचार करणे शक्य आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, अशा गुंतागुंतीच्या किडनी स्टोनच्या रुग्णांना प्रगत एंडोयुरोलॉजी सुविधा उपलब्ध असलेल्या विशेष युरोलॉजी केंद्रांमध्ये वेळेत रेफर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान टाळून रुग्णाला उत्तम परिणाम मिळू शकतात.
Comments
Post a Comment