भरतनाट्यम्‌ नृत्याविष्कारातून श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी दर्शनरोमा परांजपे यांच्या ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ सादरीकरणाला रसिकांची दाद


भरतनाट्यम्‌ नृत्याविष्कारातून श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी दर्शन

रोमा परांजपे यांच्या ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ सादरीकरणाला रसिकांची दाद

 

पुणे : श्रीकृष्णाच्या बाललिला, प्रेम, विरह, स्मरण, भक्ती, खट्याळपणाचे दर्शन रसिकांनी भरतनाट्यम्‌ नृत्यशैलीतून अनुभवले. निमित्त होते रोमा परांजपे यांनी सादर केलेल्या ‘वरवूर’ शैलीतील ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ अर्थात ‘सर्व काही श्रीकृष्णाला अर्पण’ या अनोख्या कार्यक्रमाचे.

आपल्या प्रत्येक विचाराचे, कृतीचे, भावनेचे अर्पण परमेश्वराला करण्याचा हा भाव आहे. या नृत्यप्रस्तुतीतून श्रीकृष्णाचे विविध पैलू उलगडत गेले. गोकुळातील खट्याळ बालकृष्ण, वृंदावनातील मुरलीधर, गोपीजनांचा प्रियतम सखा आणि संपूर्ण सृष्टीचे मार्गदर्शन करणारे परमदैवत. भक्ती आणि श्रृंगार या रसांच्या माध्यमातून कृष्णाचे दिव्य आणि प्रियतम असे दोन्ही स्वरूप अनुभवण्याचा योग यानिमित्ताने रसिकांना आला. एस. एम. जोशी सभागृहात गुरुवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रोमा परांजपे १९ वर्षे अमेरिकेत भरतनाट्यम्‌चे शिक्षण घेत आहेत. त्यांनी गुरू विद्या रेखा श्रीनिवासन यांच्याकडे १४ वर्षे सखोल प्रशिक्षण घेतले. तसेच गुरू राधा यांच्या विशेष कार्यशाळांमधूनही आपले ज्ञान आणि कौशल्य वृद्धिंगत केले. सध्या त्या आचार्या प्रणती रामदोराई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगत शिक्षण घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा डोळे यांनी केले तर संयोजन भरतनाट्यम्‌ गुरू मीता पाठक यांचे होते.

अतिशय नेमक्या हालचाली, चपखल-बोलके हावभाव यामुळे उपस्थितांनी नृत्याच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या कृष्णाच्या गोष्टी सहजरित्या समजून घेतल्या. मीता पाठक यांनी भरतनाट्यम्‌ शैली, त्यातील विविध घराणी आणि या नृत्यशैलीतील बारकावे उपस्थितांना अतिशय सोप्या आणि नेमक्या भाषेत समजावून सांगितले.

श्री बालमुरली कृष्ण यांची रचना असलेल्या ‘पिरई अनियुम पेरुमान’ या भगवान गणेशाची आराधना करणाऱ्या स्तवनाने रोमा यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या नायिकेचे वर्णन करणारे ‘इनुम एन मनम' हे लालगुडी जी. जयरामन यांनी रचलेले पद वर्णन सादर केले. त्यानंतर ' विचितीवीरा' हे पदम आणि ' कालिंग नर्तन तिलाना' हेही अतिशय उत्तमरित्या सादर केले. रोमा यांचे आजोबा श्रीराम रानडे यांनी रचलेल्या ‘माझ्या सावळ्या विठू’ या गीतावर नृत्यसादर करत कार्यक्रमाची सांगता केली.

गुरू प्रणती रामदोराई यांनी शिष्या म्हणून रोमा कशाप्रकारे उत्साही आणि शिकायला तत्पर आहे त्याबद्दल सांगितले. श्रीराम रानडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर, प्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, रेखा माजगावकर उपस्थित होते.

 

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश