मृदंग वादनातून रसिकत्वाची जागृती : डॉ. भावार्थ देखणेसृजनसाधक पुरस्काराने सिद्धेश्र्वर उंडाळकर यांचा गौरव
मृदंग वादनातून रसिकत्वाची जागृती : डॉ. भावार्थ देखणे
सृजनसाधक पुरस्काराने सिद्धेश्र्वर उंडाळकर यांचा गौरव
पुणे : पखवाज वादनाच्या माध्यमातून सिद्धेश्र्वर उंडाळकर यांनी देशभर भ्रमंती करत मृदंग वादनाच्या माध्यमातून रसिकत्व जागृत केले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्र्वर माऊलींचे सान्निध्य लाभल्यामुळे रसिकत्वाला परतत्त्वाची जोडही मिळाली आहे, अशा शब्दात उंडाळकर यांच्या कार्याचे संत ज्ञानेश्र्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी कौतुक केले.
युवा कलाकारांच्या सहभागातून कार्यरत असलेल्या आणि अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासाठी समर्पित असलेल्या ‘सृजनसभा’ संस्थेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सृजनसाधक पुरस्काराने युवा मृदंगवादक सिद्धेश्र्वर उंडाळकर (आळंदी) यांचा सोमवारी (दि. २२) सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ तबला वादक भरत कामत आणि डॉ. भावार्थ देखणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. त्या वेळी डॉ. देखणे बोलत होते. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘सृजनसभा’ प्रमुख, संगीतकार होनराज मावळे अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या मुख्य प्रशासक अक्षदा इनामदार तसेच पं. दासोपंतस्वामी उंडाळकर मंचावर होते. ‘सृजनसभा’ या वार्षिक अहवालाचे प्रकाशन आणि सृजनसभा पब्लिकेशनचा शुभारंभ या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थेच्या कार्याचा गौरव करताना डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, मावळे कुटुंबियांच्या अंतरंगात ज्ञानेश्र्वरी आणि ज्ञानेश्र्वर माऊलींचा स्पर्श आहे. त्यामुळे संस्थेची प्रत्येक कलाकृती परतत्त्वाला पोहोचलेली आहे.
भरत कामत म्हणाले, सृजनगानमधील ‘सृजनगान मधील 'कलासार रसपान मधुर हे, रसिका तृप्त करी’ ही ओळ फार भावली. होनराज मावळे यांनी शास्त्रीय संगीतासाठी स्वतःला वाहून घेतले असून संस्थेच्या माध्यमातून विविध कार्ये तडीस नेत आहेत, याचे कौतुक वाटते. तरुण कलाकाराला माझ्या हस्ते गौरविण्यात आले हे मी माझे भाग्य समजतो.
अध्यक्षीय मनोगतात होनराज मावळे यांनी संस्थेच्या दोन वर्षातील वाटचालीचा आढावा घेत सुहृदांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अक्षदा इनामदार यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी अवगत केले. सुरुवातीस सृजनगणेशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर सृजनगान-ध्येय गीत अनुजा जोशी यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन कीर्ती जोशी यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सिद्धेश्वर उंडाळकर यांचे सादरीकरण झाले.
Comments
Post a Comment