अजरामर गाण्यांतून जागवल्या हेमंतकुमारांच्या आठवणी
अजरामर गाण्यांतून जागवल्या हेमंतकुमारांच्या आठवणी
पुणे : प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि निर्माते हेमंत कुमार यांच्या ‘बेकरार करके हमे यू न जाइए’, ‘ये नयन डरे डरे’, ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ अशा एकाहून एक अजरामर गीतांचा रसिकांनी आस्वाद घेतला. निमित्त होते हेमंत कुमार यांच्या जन्मदिनाचे.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार आणि कार्यक्रमाचे समन्वयक अजित कुमठेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हेमंतदांचा जन्म १६ जून १९२० रोजी वाराणसी येथे झाला. कुटुंबात गायनाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी आवड म्हणून गायनाला सुरुवात केली आणि या क्षेत्रात मोठे नाव कमावले. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दिला उजाळा देण्यासाठी पूना गेस्ट हाऊस येथे ‘ये नयन डरे डरे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आठवणीतील गाणी आणि गाण्यांच्या आठवणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. गायक हेमंत खणंग, दिपाली राजे, मनाली राजे आणि रेवती सुपेकर यांनी सुरेल आवाजात गाणी सादर केली. सरिता फडके यांनी अतिशय ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी त्यांनी हेमंत कुमार यांच्या गायकीतील बारकावे, आयुष्यातील किस्से, आठवणी सांगत कार्यक्रमाची रंगत वाढवली. हेमंतदांच्या सुरांच्या प्रवासाचा आनंद घेताना रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘ये रात ये चांदनी’, ‘हमने देख लिए इन आखों की’, ‘निंद ना मुझको आए’, ‘आ निले गगन के तले’, ‘जादूगार सैयाँ छोडो मेरी बैयाँ’ यासारखी एकाहून एक लोकप्रिय गाणी सादर करण्यात आली.
Comments
Post a Comment