प्रियांदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सचा SSC परीक्षेत घवघवीत यश
प्रियांदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सचा SSC परीक्षेत घवघवीत यश
पुणे, ९ मे २०२६ : प्रियांदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. प्रियांदर्शनी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, इंद्रायणीनगर; पुणे पोलीस पब्लिक स्कूल, शिवाजीनगर आणि प्रियांदर्शनी हायस्कूल, भोसरी या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल मिळवला.
इंद्रायणीनगर येथील प्रियांदर्शनी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला असून सर्व २४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ४८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, तर ९९ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळवले. एकूण १७९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. परिनिता आढाव हिने ९६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. ईशा नवले हिने ९५.६० टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक मिळवला. आर्या देसाई, धनश्री लोंढे आणि झरीन अन्सारी यांनी प्रत्येकी ९५.४० टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला.
पुणे पोलीस पब्लिक स्कूल, शिवाजीनगर येथील ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले, तर २२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले. सानिका हाके हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. गार्गी घाडगे हिने ९४.६० टक्के आणि जिग्नेश माळी याने ९३.४० टक्के गुण मिळवले.
या यशाबद्दल बोलताना इंद्रायणीनगर आणि शिवाजीनगर शाखेच्या प्राचार्या अॅड. अर्पिता दीक्षित म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षक-पालकांच्या सहकार्याचे हे यश आहे. विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत.”
भोसरी येथील प्रियांदर्शनी हायस्कूलचाही निकाल उल्लेखनीय लागला. साई ज्ञानेश्वर तानपुरे याने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. सोहम वसंत वासतकर आणि वेदांगी सचिन नेवासकर यांनी प्रत्येकी ९४.४० टक्के गुण मिळवले, तर पूर्वा गजानन मुर्तीकर हिने ९३.४० टक्के गुण मिळवले.
भोसरी शाखेच्या प्राचार्या फरझाना शेख म्हणाल्या, “विद्यार्थ्यांच्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले. सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन.”
प्रियांदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संस्थापक सचिव तरुणा इंद्रमन सिंग, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. राजेंद्र इंद्रमन सिंग, नरेंद्र इंद्रमन सिंग आणि डॉ. जितेंद्र सिंग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे आणि प्राचार्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment