इच्छाविरहित केलेली पूजा श्रेष्ठ*प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील 'भक्तीयोगा' वर प्रवचनमालेचा पाचवा दिवस
*इच्छाविरहित केलेली पूजा श्रेष्ठ*
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील 'भक्तीयोगा' वर प्रवचनमालेचा पाचवा दिवस
पुणे : श्रीमंत पद्धतीची पूजा, मानस पद्धतीची पूजा आणि सामान्य पत्र फूल पद्धतीची पूजा यात मानस पद्धती ची पूजा मोरयाला प्रिय आहे, कारण त्यात मन लावलेले असते. यात इच्छाविरहित केलेली पूजा श्रेष्ठ मानली जाते. मुक्तीचे कार्य पूर्ण होईपर्यंत मोरयांनी सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून जे आचरण केले जाते, त्यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमुळे मनाला समाधान प्राप्त होते. मन आणि बुद्धी पूर्णतः भगवंताला समर्पित करा. असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर पाचव्या दिवशी निरूपण केले. श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात ही प्रवचनमाला सुरु आहे. अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्याकरीता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, ज्याची जशी क्षमता आणि प्रवृत्ती आहे, त्यानुसार वेगवेगळे मार्ग सांगितले गेले आहेत. कृतिनिष्ठ व्यक्तींसाठी कर्मयोग सांगितला आहे; भावनानिष्ठ व्यक्तींसाठी भक्तियोग, तर विचारनिष्ठ व्यक्तींसाठी ज्ञानयोग सांगितला आहे. मात्र, या तिन्ही मार्गांमध्ये ‘योग’ म्हणजे भगवंताशी एकरूप होणे, हीच सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.
Comments
Post a Comment