गुरुपुष्यामृत योगावर मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या मृदा पूजनाचा मंगल सोहळा संपन्न*
*गुरुपुष्यामृत योगावर मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या मृदा पूजनाचा मंगल सोहळा संपन्न*
पुणे : मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळातर्फे दिनांक २२ मे २०२६ रोजी गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर श्रींची मूर्ती घडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या “मृदा पूजन” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा पवित्र विधी मंडळाचे मूर्तिकार श्री. अभिजीत धोंडफळे यांच्या रास्ता पेठ येथील स्टुडिओमध्ये संपन्न झाला. या मंगलमय सोहळ्याचा विधी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री वासुदेव बुवा बुरुसे यांच्या शुभहस्ते पार पडला.
हिंदवी धर्माच्या प्रसारासाठी १६,००० पेक्षा अधिक कीर्तनांद्वारे सेवा करणाऱ्या श्री बुरुसे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “माझ्या आयुष्यातील हा परमोच्च क्षण आहे. ज्या श्री कसबा गणपतीच्या परिसरात माझा जन्म झाला आणि मी वाढलो, त्या भगवंताच्या मृदा पूजनाची संधी मिळणे हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे.”
यावेळी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी शेटे, विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लोकसेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. श्रीधरभाऊ चव्हाण, रमणबाग युवा मंचाचे अध्यक्ष श्री. शांतिसागर निपुणगे उपस्थित होते.
अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला असून यानिमित्ताने आगामी गणेशोत्सवाच्या तयारीला शुभारंभ झाला.
Comments
Post a Comment