बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

पुणे : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धम्म पहाट’ कार्यक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शांतता, समता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमातून बुद्धविचारांचा जागर पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

यंदा या कार्यक्रमाचे २० वे वर्ष असून, या विशेष प्रसंगी पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर तथा कार्यक्रमाचे आयोजक परशुराम वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, बार्टीच्या सुचिता शिंदे, माजी नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक निलेश आल्हाट, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, रमाई स्मारकाचे प्रमुख विठ्ठल गायकवाड, बबन जोगदंड, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, समितीचे सचिव दीपक म्हस्के, मिलिंद अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात चेतन चोपडे यांच्या नेतृत्वाखालील कलापथकाने ‘भीमा तुझ्या पाऊल खुणा’ या भीमगीतांच्या सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विकास साळवे, स्नेहल प्रधान यांच्यासह अन्य कलाकारांनी प्रभावी साथ दिली. ‘प्रथम नमो गौतमा’, ‘तुज प्रथम हे नमन गौतमा’, ‘अनुसरा शिकवण बुद्धाची’, ‘नमो बुद्धाय म्हणे’, ‘प्रबुद्ध हो मानावा’, ‘पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे’, ‘करू भीमाचे चिंतन इथे’, ‘बुद्ध-फुले-आंबेडकर सांगू आम्ही’, ‘भीम भगवान माझ्या झोपडीत शान आहे’ यांसारख्या गीतांनी वातावरण भारावून गेले.

तसेच, राजर्षी शाहू महाराजांवरील ‘माझा लोकराजा शाहू’ या रॅपसह विविध गीतांनी कार्यक्रमाला वेगळी उंची दिली. उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून सादर करण्यात आलेले शाहीर वामनदादा कर्डक यांचे ‘पाणी वाढ गं माय’, ‘लई नाय मागत’, ‘भर माझं इवलंसं गाडगं’ या गीतांनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.

यावेळी बोलताना उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, गेली वीस वर्षे ‘धम्म पहाट’ या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या सहकार्याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पुतळा, रमाईंचा पुतळा आणि संविधान उद्यान यांसारखे प्रेरणादायी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्याच्या जागतिक परिस्थितीत अनेक ठिकाणी युद्धजन्य वातावरण असताना भारतात बुद्धविचारांवर आधारित संविधानामुळे शांतता टिकून आहे. जगाला शांततेचा मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य बुद्ध विचारांमध्ये असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली, तर समारोप धम्म पालन गाथेने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के आणि महेश अचिंतवार यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश