वर्ल्ड थॅलेसेमिया डे आणि वर्ल्ड रेड क्रॉस डे निमित्त महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन
वर्ल्ड थॅलेसेमिया डे आणि वर्ल्ड रेड क्रॉस डे निमित्त महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन
पुणे,6 मे 2026 : इंडियन रेड क्रॉस सोसायटी,पुणे शाखा,थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टर (टीएसपीसी) आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड थॅलेसेमिया डे आणि वर्ल्ड रेड क्रॉस डे (8 मे )निमित्त महिनाभर सुरू राहणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टरच्या अध्यक्ष व रूबी हॉल क्लिनिक पुणे येथील वैद्यकीय सेवा सल्लागार डॉ.नीता मुन्शी, इंडियन रेड क्रॉस सोसायटी पुणे शाखेचे मानद सचिव आर.व्ही.कुलकर्णी आणि जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ.अतुल कुलकर्णी यांनी दिली.
या उपक्रमांची सुरूवात 8 मे रोजी सकाळी सह्याद्रि हॉस्पिटल,डेक्कन येथून आयएमए हॉलपर्यंत जनजागृती रॅलीने होणार असून,त्यानंतर आयएमए (नीतू मांडके हॉल) येथे थॅलेसेमिया या विषयावर सीएमईचे (वैद्यकीय शिक्षण सत्र) आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन येथे रोटरी क्लब पुणे सेंट्रलच्या सहकार्याने विशेष जनजागृती कार्यक्रम होणार असून सर्व मेट्रो स्थानकांवर स्टँडीज व पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. तसेच जनजागृतीसाठी अनेक इमारती व मेट्रो स्टेशन्स लाल रंगाच्या रोषणाईने प्रकाशित करण्यात येणार आहेत. यानंतर संपूर्ण महिनाभर विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, महाविद्यालयांमध्ये सुमारे 20 जनजागृती सत्रे आणि पुणे शहरात विविध संस्था व रूग्णालयांच्या सहयोगाने 30 ते 35 रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा रेड क्रॉस स्वयंसेवकांसाठी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले जाईल. 8 मे रोजी नेहरू मेमोरियल हॉल येथे सायंकाळी 7 वाजल्यापासून ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यातून उभारलेल्या निधीमुळे थॅलेसेमिया ग्रस्त मुलांसाठी विविध उपक्रमांना मदत होणार आहे.
थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टरच्या अध्यक्ष व रूबी हॉल क्लिनिक पुणे येथील वैद्यकीय सेवा सल्लागार डॉ.नीता मुन्शी म्हणाल्या की, थॅलेसेमिया हा एक गंभीर,परंतु तपासणी आणि समुपदेशनाद्वारे मोठ्या प्रमाणात टाळता येण्याजोगा अनुवंशिक आजार आहे. भारतात दरवर्षी हजारो बाधित बालकांचा जन्म होत असल्याने आणि वाहकांचे प्रमाण जास्त असल्याने,जागरूकता हेच आपले सर्वात मोठे साधन आहे. आमचे लक्ष तीन स्तंभांवर केंद्रित आहे - रक्त संक्रमणाच्या माध्यमातून आयुष्यभराच्या उपचार सहाय्याद्वारे काळजी घेणे, अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारख्या पर्यायांद्वारे उपचार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे,जागरूकता,तपासणी आणि समुपदेशनाद्वारे यावर नियंत्रण मिळवणे.लग्नापूर्वी व गर्भावस्थेतील एक साधी चाचणी आयुष्यभराचे दु:ख टाळू शकते. सामुदायिक सहभाग आणि सातत्यपूर्ण जागरूकतेच्या माध्यमातून,आपण सर्व मिळून थॅलेसेमिया-मुक्त भविष्याकडे वाटचाल करू शकतो.
जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ.अतुल कुलकर्णी म्हणाले की,या महिन्यातील प्रमुख उपक्रमांपैकी एक म्हणजे रक्तदान शिबिरे.उन्हाळ्यात सहसा रक्ताची खूप टंचाई जाणवते.विशेष करून,बीटा-थॅलेसेमिया मेजर असलेल्या थॅलेसेमिया रूग्णांना नियमित रक्तसंक्रमणाची आवश्यकता असते.अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरांमुळे थॅलेसेमिया आणि इतर रूग्णांना मोठा दिलासा मिळू शकेल.
Comments
Post a Comment