किल्ले रायगडाच्या संवर्धन आणि विकासाच्या नावाखाली अनागोंदी; रायगड विकास प्राधिकरण बरखास्तीची मागणी*


-----------
*किल्ले रायगडाच्या संवर्धन आणि विकासाच्या नावाखाली अनागोंदी; रायगड विकास प्राधिकरण बरखास्तीची मागणी*

पुणे, दि. २६ मे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आणि हिंदुस्थानच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धन आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. गेल्या ९ वर्षांत सुमारे ६०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही आजही गडावर समाधानकारक काम दिसत नसून अपेक्षित कामे पूर्ण झालेली नसल्याचा आरोप शिवरायांच्या सैन्यातील पायदळप्रमुख सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज लौकिक गोळे व ॲड. अर्चना मारणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. रायगड विकास प्राधिकरण तात्काळ बरखास्त करण्याची मागणी यावेळी रायगड बचाव समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी गेल्या रविवारी (२४ मे) ‘रायगड वाचवा’ अभियानांतर्गत पुण्यात भव्य दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी संताप व्यक्त करतांना गोळे म्हणाले की, शिवभक्त, इतिहासप्रेमी, सरदार घराण्यातील काही वंशज आणि स्थानिक नागरिकांकडून या भ्रष्ट कारभाराबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत असूनही रायगड विकास प्राधिकरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आज रायगडावर निकृष्ट कामे, भ्रष्टाचार, निधीचा अपव्यय, निष्काळजी प्रशासन आणि पर्यटकांच्या सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. पर्यटकांसाठी उभारण्यात आलेली स्वच्छतागृहे तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती, मात्र ती कधीच सुरू करण्यात आलेली नाहीत. आज ती मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून पुन्हा त्याच कामासाठी नव्याने निधी खर्च केला जात आहे. एकच काम दोन वेळा का करण्यात आले? असा सवाल रायगड विकास समितीने वारंवार उपस्थित केला आहे. गडावरील पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सुमारे १५ लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेले पिण्याच्या पाण्याचे फिल्टर अवघ्या एका महिन्यात बंद पडले असून आज त्यांची अवस्था भंगार स्थितीत झालेली आहे. तज्ज्ञांच्या चुकीच्या निर्णयांमुळे शासनाचे सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. रायगडावरील टकमक टोक येथील लोखंडी सुरक्षा जाळ्या (रेलिंग) गंजलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत असल्याने पर्यटकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. नव्याने बांधलेल्या पायरीमार्गालगतची संरक्षण भिंतही धोकादायक झाली आहे. यामुळे दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी रायगड विकास प्राधिकरण घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रायगड घेऱ्यातील २१ गावांमधील ऐतिहासिक वास्तू व वस्तूंचे जतन, वाघबिळ / नाचण टेप परिसरातील अश्मयुगीन अवशेषांचे संवर्धन, वणव्यांवर नियंत्रण आणि युनेस्कोच्या नियमांनुसार जागतिक वारसा प्रक्रियेला बाधा पोहोचणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. गडावरील काही ऐतिहासिक वास्तू नष्ट करण्यात आल्या आहेत. चुन्याचा घाणा, शिवकालीन दगडी जाळी यांसारख्या प्राचीन वास्तूंचे नुकसान झालेले असून, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पायऱ्या जतन करण्याऐवजी मातीखाली गाडण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याशिवाय नव्याने तयार करण्यात आलेल्या पायरीमार्ग व संरक्षण भिंतीच्या सांध्यांमध्ये माती भरल्याचे दिसून आली आहे. पारंपरिक संवर्धन पद्धतीनुसार ज्या ठिकाणी गूळ, चुना, बेलफळ यांसारख्या साहित्याचा वापर अपेक्षित होता, त्या पद्धतीने काम झाल्याचे प्रत्यक्षात आढळून आलेले नाही. प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या निवेदन, व्हिडिओंमध्ये आणि प्रकल्प अहवालामध्ये करण्यात आलेले दावे व प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचा आरोप रायगड बचाव समितीने यावेळी केला. याबरोबरच संतापाची गोष्ट म्हणजे रायगडावर सर्रास दारुच्या बाटल्या आढळून येत आहेत. त्यावर कोणतीही तपासणी किंवा चौकशी केली जात नसेल, तर सर्वच बाबतीत अनागोंदी माजली असल्याचे दिसते. याशिवाय बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या गाढवांवर अमानुष अत्याचार झाले आहेत. त्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा जास्त ओझे लादल्याने अनेक गाढवे जखमी झाली, काहींचा पाय घसरून मृत्यू झाला तर त्या मृत जनावरांना दरीत फेकून देण्यात आल्याने परिसरात आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. 
-----------------------
*रायगड बचाव समितीच्या प्रमुख मागण्या –*

१) किल्ले रायगड विकास प्राधिकरण त्वरित बरखास्त करण्यात यावे.
२) संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे.
३) सध्या सुरू असलेली निकृष्ट कामे त्वरित थांबवून १५ दिवसांच्या आत नवीन समिती स्थापन करण्यात यावी.
४) निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे व त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची व्याजासह वसुली करण्यात यावी.
५) सर्व कामांचे नियमितपणे स्वतंत्र विशेष तपासणी (थर्ड पार्टी ऑडिट) करण्यात यावे.
६) संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्यात यावी.
७) महिलांसाठी सुरक्षित व चांगली स्वच्छतागृहे तातडीने उपलब्ध करण्यात यावीत.
८) टकमक टोक व इतर धोकादायक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था तातडीने दुरुस्त करण्यात यावी.
९) गडावरील पाणी, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांवरील गैरव्यवस्थेची चौकशी करण्यात यावी.
१०) रायगड घेऱ्यातील २१ गावांमधील ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यात यावे.
११) वाघबिळ तथा नाचण टेपची गुहेत जाण्याचा मार्ग पर्यटकांच्या सोयीने सुरक्षित व्हावा. तसेच येथील अश्मयुगीन अवशेषांचे योग्य जतन करून सुरक्षित मार्ग उभारण्यात यावा.
१२) रायगडावरील वणवे रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
१३) युनेस्कोच्या नियमांनुसार जागतिक वारसा प्रक्रियेला बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी.
१४) गडावरील सुरक्षा तपासणी अधिक कडक करून दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश