महाराष्ट्र ओपन पिकलबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवातअंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या स्पर्धेला राज्यातून मोठा प्रतिसाद
महाराष्ट्र ओपन पिकलबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात
अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या स्पर्धेला राज्यातून मोठा प्रतिसाद
मुंबई, १ मे २०२६ : भारतीय पिकलबॉल संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र पिकलबॉल संघटनेचे (एमपीए) अध्यक्ष राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी 'महाराष्ट्र ओपन' पिकलबॉल स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी उद्घाटन केले. ही राज्याची प्रमुख पिकलबॉल स्पर्धा असून, जागतिक पिकलबॉल क्रमवारीद्वारे प्रमाणित आहे.
या वेळी बोलताना शेलार म्हणाले, “खेळ आणि संस्कृतीमध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे आणि पिकलबॉल ही त्या वारशामध्ये पडलेली एक मोलाची भर आहे. पहिल्याच वर्षी जागतिक स्तरावर प्रमाणित अजिंक्यपद स्पर्धा आहे. या स्पर्धेत एक हजार स्पर्धकांचा सहभाग हे एमपीएचे मोठे यश आहे. राज्य सरकार या खेळाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आमचे खेळाडू राष्ट्रीय अजिंक्यपद आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्याचा तिरंगा फडकवतील, याची मला खात्री आहे.”
एमपीए अध्यक्ष राहुल कनाल म्हणाले, “राज्यातील पिकलबॉल आता एका महत्त्वाच्या वळणावर आहे आणि 'महाराष्ट्र ओपन' त्याचा केंद्रबिंदू आहे. आमच्या स्थापनेच्या पहिल्याच महिन्यात साडेसातशेहून अधिक सदस्य एमपीएशी जोडले गेले आहेत. आज आम्ही एक हजार स्पर्धकांसह आणि उच्च श्रेणीतील खेळाडूंसह पीडब्ल्यूआर-प्रमाणित राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आयोजित करत आहोत. ही तर फक्त सुरुवात आहे; महाराष्ट्राला भारतातील पिकलबॉलचे निर्विवाद पॉवरहाऊस बनवणे हे आमचे ध्येय आहे.”
सीमा सिंह म्हणाल्या, “महाराष्ट्र ओपन ही कोणत्याही उदयोन्मुख खेळाडूसाठी योग्य व्यासपीठ मिळाल्यावर काय साध्य करता येते, हे पाहण्याची उत्तम संधी आहे. महाराष्ट्र पिकलबॉल संघटनेचे भविष्य उज्ज्वल आहे आणि मला खात्री आहे की यामुळे पुढची पिढी या खेळाकडे वळेल आणि जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करेल.”
स्पर्धेविषयी महत्त्वाचे...
- ही स्पर्धा १ ते ३ मे दरम्यान चालणार आहे.
- या स्पर्धेत ३० हून अधिक श्रेणींमध्ये एक हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होत आहेत.
- यामध्ये गेल्या आठवड्यात नेपल्स, फ्लोरिडा येथे झालेल्या यूएस ओपन पिकलबॉल चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारी अर्जुन सिंग आणि आदित्य सिंग ही जोडीदेखील सहभागी आहे.
- भारताची दुसऱ्या क्रमांकाची महिला एकेरी खेळाडू मिहिका यादवदेखील या स्पर्धेत खेळणार आहे.
- या स्पर्धेतील विजेते या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
इतर निकाल
प्रो-कॅटेगरीमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात अहाना पंजाबी आणि अथर्व खिस्ती यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकले. अहानाने तिच्या अचूक ग्राउंड स्ट्रोक्सच्या जोरावर प्रियांका मेहताचा पराभव केला, तर पुरुषांच्या अंतिम फेरीत अथर्व खिस्तीने आरुष निपुरेचा पराभव केला. त्यापूर्वी, उपांत्य फेरीत आरुषने अर्जुन सिंगला पराभूत करून सनसनाटी विजय मिळवला, तर अथर्वने अनुभवी विशाल जाधवचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.
Comments
Post a Comment