द. मा. मिरासदार हे साहित्यविश्वातील मोठी स्मरणशिळा : राजा दीक्षित सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांना द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान
द. मा. मिरासदार हे साहित्यविश्वातील मोठी स्मरणशिळा : राजा दीक्षित
सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांना द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यविश्वातील एक मोठी स्मरणशिळा आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहासअभ्यासक व मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी काढले.
द. मा. मिरसदार प्रतिष्ठानच्या वतीने द. मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आयोजित केलेल्या द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी ‘गोष्ट इथे संपत नाही...’ हे कथाकथन करणारे युवा कथाकथनकार सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शिंदेशाही पगडी, शाल, तुळशीची माळ, विठ्ठलाची मूर्ती, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, द. मा. मिरासदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी, विश्वस्त हरीभाऊ मिरासदार, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बीएमसीसीचे माजी प्राचार्य डॉ. अनिरुद्ध देशपांडे होते. सर परशुराम महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात शनिवारी (दि. १६) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राजा दीक्षित यांनी द. मा. मिरासदार यांच्या साहित्यलेखनाचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले, द. मा. मिरासदार यांचे विनोदी लेखन विलक्षण होतेच पण त्याच्या जोडीला त्यांचे गंभीर लेखनही उत्कृष्ट होते. ग्रामीण जीवनाचे प्रत्ययकारी वर्णन त्यांच्या लेखनात येते. चित्रमयता हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. श्रेष्ठ विनोदकाराच्या हृदयात सहृदय माणूस आणि तत्वज्ञ असतो. द. मा. मिरासदारांच्या मोठेपणाचे हेच रहस्य होते.
योगेश सोमण म्हणाले, योग्य आणि ऐन उमेदीच्या वयात दोन युवकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे हे खरोखरीच कौतुकास्पद आहे. युवकांमध्ये कथाकथन हा प्रकार पुन्हा लोकप्रिय होताना दिसतो आहे हे आशादायी चित्र आहे. द. मा. मिरासदार हे माझ्या आयुष्यात पुस्तकरुपानेच आले. परंतु त्यांच्या कथा वाचताना लक्षात आले की त्या अगोदरच पटकथा आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या साहित्यिकाच्या जन्मशताब्दीनिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये वर्षभर विविध उपक्रमांचे आणि चांगल्या कथाकथनकारांचे कार्यक्रम आयोजित केले जातील.
अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, विनोदाच्या क्षेत्रात दादा असणाऱ्या द. मा. मिरासदार यांचे काम श्रेष्ठ होते. त्यांच्या विद्यार्थी प्रियतेची साक्ष अनेकदा आम्हाला मिळाली होती. त्यांनी दिलेले योगदान हे सर्वार्थाने मोठे आहे.
सत्काराला उत्तर देताना सारंग भोईरकर म्हणाले, सर्वार्थाने श्रेष्ठ आणि ज्येष्ठ साहित्यिक असलेल्या द. मा. मिरासदार यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही आनंदाची बाब आहे. गोष्ट इथे संपत नाही हा कार्यक्रम सुरू करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रेरणा आणि त्यांचा प्रभाव मोठा होता. आई वडिलांची पुण्याई आणि मित्रांची साथ यामुळेच आम्ही २६१ प्रयोगापर्यंत मजल मारू शकलो.
सारंग मांडके म्हणाले, आमच्यावरील जबाबदारी अधिक वाढली आहे याची जाणीव करून देणारा हा खूप मोठा सन्मान आहे. त्यादिशेने आम्ही या पुढील काळात नक्की प्रयत्न करू.
गोष्ट इथे संपत नाही या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली आणि त्या कार्यक्रमाचे वेगळेपण या दोघांनीही मुलाखतीतून उलगडले. प्रसाद मिरासदार यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला द. मा. मिरासदार यांच्यावरील चलचित्रफित दाखवण्यात आली. हरिभाऊ मिरसदार आणि रवींद्र मंकणी यांनी विठ्ठल मूर्ती देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक हरिभाऊ मिरसदार यांनी केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
चौकट
इतिहासाचे विकृतीकरण दुःखद – राजा दीक्षित
इतिहासाचे वेड असणाऱ्या दोन अभ्यासू अभियंत्यांचा पुरस्काराचे गौरव होतो आहे ही बाब नक्कीच चांगली आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत जे सामाजिक वैगुण्य दिसते ते मात्र अस्वस्थ करणारे आहे. महापुरुषांचे अपहरण आणि इतिहासाचे विकृतीकरण या बाबी अत्यंत दुःखद आहेत, जगाच्या इतिहासातील वादातीत व्यक्तिमत्त्व असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर वाद होणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खंत राजा दीक्षित यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment