विकसित भारतासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे : राजदीप सरदेसाईभारती विद्यापीठाचा ६२ वा वर्धापन दिन समारंभ संपन्न

विकसित भारतासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे : राजदीप सरदेसाई
भारती विद्यापीठाचा ६२ वा वर्धापन दिन समारंभ संपन्न

पुणे : विकसित भारताचे स्वप्न साकारायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात अग्रेसर होणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांबरोबरच उत्तम दर्जाचे शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ख्यातनाम पत्रकार, प्रख्यात लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई यांनी केले. 
भारती विद्यापीठाच्या ६२व्या वर्धापन दिन समारंभात पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल राजदीप सरदेसाई यांचा डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. दोन लाख एकावन्न हजार रुपये, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, समारंभाचे अध्यक्ष कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव, जी. जयकुमार आणि आमदार भीमराव तापकीर यावेळी उपस्थित होते. पुणे-सातारा रस्त्यावरील भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुल परिसरात रविवारी (दि. १०) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन आणि ‘विचार भारती’च्या वर्धापन दिन विशेषांकाचे तसेच विश्वभारती न्यूज लेटरचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आजच्या पत्रकारितेवर भाष्य करताना राजदीप सरदेसाई म्हणाले, दूरचित्र वाहिन्यांवरील पत्रकारितेत आवाज जास्त आणि वृत्त कमी अशी सध्याची परिस्थिती आहे. वृत्त वाहिन्यांवरून सातत्याने वादविवादाचे दर्शन घडत असते. ज्यामुळे युवा पिढीसमोर भारताविषयी चांगले चित्र उभे राहात नाही. पत्रकाराकडे राजकारणी व्यक्तींना प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि ताकद असणे आवश्यक आहे. 

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन बंधनकारक : चंद्रशेखर बावनकुळे…
वादळातही दिवा लावण्याचे कार्य डॉ. पतंगराव कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात केले आहे, असे गौरवोद्‌गार काढून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा असेल तर जसे शिक्षणाचे महत्त्व आहे तसेच जनतेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे हे महसूल खात्याचे कार्य आहे. लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शी सरकार चालवणे आवश्यक आहे. सरकार कुणा एका पक्षाचे नाही त्यामुळे मंत्री म्हणून इमानदारी आवश्यक आहे. सरकारचे कार्य समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचले पाहिजे. बदलते तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे शासनासाठी बंधनकारक आहे. भारती विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य ज्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासह दिल्लीतही पोहोचले आहे त्याप्रमाणेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात भारती विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य जोमाने सुरू व्हावे यासाठी ट्रिट-बीट पॉलिसीच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता मार्ग काढू, अशी ग्वाही बावनकुळे यांनी या प्रसंगी दिली.

शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याचा प्रयत्न : दादा भुसे…
सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी भारती विद्यापीठामार्फत आराखडा निर्माण केल्यास त्याचा स्वीकार राज्य शासनाकडून केला जाईल, अशी ग्वाही देऊन दादा भुसे म्हणाले, पंतप्रधानांच्या स्वप्नातील विकसित भारत घडविण्यासाठी सामान्य पालकाच्या पाल्यालाही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहेत. सर्व राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य केल्यास हे स्वप्न साकार होण्यास मदत होईल. ते पुढे म्हणाले, देशाविषयी आदर, निष्ठा जागृत करण्याकरिता आज संस्कारांची गरज आहे. यासाठी प्राथमिक स्तरापासून मूल्य शिक्षण देण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे बदलत्या तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारात उद्याच्या सक्षम भारतासाठी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देखील देण्यात येणार आहेत. शालेय स्तरावर शुद्ध पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, उत्तम इमारती देण्याबरोबरच शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे कमी करण्याचा प्रयत्न आहे. मराठी शासकीय विद्यालये पटसंख्या कमी असल्याने बंद पडत आहेत, अशा वेळी विद्यार्थ्यांमध्ये भाषाविषयक प्रेम जागृत करून व्यावहारिक शिक्षण देण्याचा मानस आहे. 

डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, बहुजनांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज महाराष्ट्रासह देशाच्या उभारणीत भारती विद्यापीठातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात योगदान देत आहेत याचा अभिमान आहे. शंभरहून अधिक पेटंटस्‌ तसेच शंभर कोटीहून अधिक रिसर्च ग्रॅन्ट भारती विद्यापीठाला प्राप्त झाल्या आहेत. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन भारती विद्यापीठाचे कार्य निरंतरपणे सुरू असून देशाची पिढी घडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. के. डी. जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तुरकर, प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा. जागृती ठाकूर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश