मोरया आपला आहे’ ही भावना आली की भीती उरत नाही*
*‘मोरया आपला आहे’ ही भावना आली की भीती उरत नाही*
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’वर प्रवचनमाला समारोप
पुणे : मनुष्य भीतीमुक्त असला पाहिजे. भीती तेव्हाच नाहीशी होते, जेव्हा विश्वास निर्माण होतो. 'मोरया आपला आहे' ही भावना आली की भीती उरत नाही. मोरया सांगतात भीती सोडून दे. कारण जो घाबरलेला आहे, त्याला भीती मुक्त करण्यासाठी जे सांगितले जाते, त्यालाच 'गणेश गीता' म्हणतात, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ-वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर समारोप प्रसंगी निरूपण केले. श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात ही प्रवचनमाला संपन्न झाली. अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्यासाठी प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते.
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, मोरयाची कृपा म्हणजे तुमच्यातल्या वाईट गोष्टींचेसुद्धा सकारात्मकतेत रूपांतर होणे. तुमच्यातील अवगुणांचे गुणांमध्ये परिवर्तन होणे, हाच मोरयाच्या कृपेचा खरा अर्थ आहे. मोरया समजून घ्यायचा असेल, तर एकतर बालकासारखे निरागसत्व हवे किंवा नारदांसारखे दिव्य वैराग्य हवे. तेव्हाच तो अनुभवता येतो. मोरया सांगतात की हे सर्व भक्तीनेच साध्य होते
ते पुढे म्हणाले, मोरया भीती सोबत मोहही सोडायला सांगतात. मोह म्हणजे नको त्या गोष्टीकडे आकर्षित होणे. लोभ आणि मोह यात सूक्ष्म फरक आहे. लोभ म्हणजे नसलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करणे. दुसऱ्याचे पद, पैसा, प्रतिष्ठा, सामर्थ्य पाहून 'हे मलाही मिळावे' असे वाटणे म्हणजे लोभ. प्रयत्न करून ते मिळवण्याची इच्छा असणे चुकीचे नाही. पण मोह वेगळा आहे. नको त्या गोष्टीकडे ओढ निर्माण होणे, विवेक हरपणे आणि चुकीच्या आकर्षणात अडकणे, हाच मोह आहे.
सिद्धी-बुद्धी या दोन्हींपेक्षा मी माझ्या आनंदात आहे, हे वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे दारिद्र्य नव्हे. आपण अनेकदा शब्दांची सरमिसळ करतो. एखादा भिकारी माणूस म्हणजे वैराग्य असलेला व्यक्ती असे नाही. ज्याच्याकडे सर्व काही आहे, पण तरीही ते सोडण्याची तयारी आहे, त्याला वैराग्य म्हणतात, असेही त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment